घरफिचर्ससारांशसोशल मीडिया आणि ट्रोलिंग...नावात दडलंय काय?...

सोशल मीडिया आणि ट्रोलिंग…नावात दडलंय काय?…

Subscribe

हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि त्याची पत्नी नेहा मांडलेकर यांना त्यांच्या मुलाच्या नावावरून ट्रोल करण्यात आलंय. तुम्ही हिंदू असूनही मुस्लीम नाव कसं ठेवलं?, हेच नाव ठेवायचं असेल तर तुम्ही अफगाणिस्तान, पाकिस्तानात निघून जा, या आणि अशा हजारो कमेंट्स आणि प्रश्नांनी या दोघांना वेढलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर टाकलेला हा दृष्टिक्षेप...

-आशिष निनगुरकर

लोकप्रिय मराठी अभिनेता आणि लेखक चिन्मय मांडलेकरला त्याच्या मुलाच्या नावाने ट्रोल केलं जात आहे. चिन्मयने आपल्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवलं आहे. यावरून सोशल मीडियावर चिन्मय आणि त्याची पत्नी नेहा जोशी-मांडलेकर यांना खालच्या पातळीवर ट्रोल करण्याय येतंय. चिन्मय मांडलेकर आणि नेहा मांडलेकर या दोघांनीही मुलाचे नाव जहांगीर का ठेवले याबद्दल अनेकदा स्पष्टीकरण दिले आहे, पण पुन्हा एकदा हा मुद्दा बाहेर काढण्यात आला आहे. यावर नेहा मांडेलकरने एक व्हिडीओ शेअर करीत ट्रोलर्सला उत्तरही दिलंय. शेक्सपियरने म्हटलं होतं की नावात काय आहे? पण तो आता भारतात आला असता तर त्याला सांगितलं असतं की बघ बाबा नावात काय काय आहे, असंच म्हणावं लागेल.

- Advertisement -

नेहा मांडलेकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला चिन्मय मांडलेकरसह मनवा नाईक, गौतमी देशपांडे या कलाकारांनी लाईक केलं आहे. तसेच अनेक चाहतेही लाईक्स करीत नेहाला पाठिंबा देताना दिसत आहेत. चिन्मय आणि नेहा मांडलेकरला मनसे चित्रपट कर्मचारी सेनेनेही पाठिंबा दिला आहे. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.

मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे त्याला सोशल मीडियावर एक विशिष्ट वर्ग ट्रोल करीत आहे आणि ही गोष्ट मनाला लावून घेत चिन्मयने यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही, असं जाहीर केलं आहे, पण खरंतर ही आपल्यासाठी अत्यंत खेदाची बाब आहे. त्याचा मुलगा ११ वर्षांचा आहे, पण त्यावरून चिन्मयला आताच का ट्रोल केलं जावं? गेली ११ वर्षे कुठे होते हे ट्रोलर्स? खरंतर चिन्मयने त्याच्या मुलाचं नाव काय ठेवावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, यात बोलणारे हे ट्रोलर्स कोण? असे मनसेने म्हटले आहे.

- Advertisement -

जेव्हापासून समाजाची मक्तेदारी घेतलेल्या ह्या बावळट ट्रोलर्सचा सोशल मीडियावर सुळसुळाट झाला आहे त्याचा नाहक त्रास इमाने-इतबारे काम करणार्‍या अनेकांना होत आहे. याआधीही देशात अनेक मोठे कर्तृत्ववान व्यक्ती जहांगीर नावाने होऊन गेले आहेत. फक्त मराठी कलाकारांचं खच्चीकरण करायचं आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका-टिप्पण्या करून त्रास द्यायचा हे काही बरं नाही.

मनसे चित्रपट कर्मचारी सेना चिन्मयच्या बाजूने ठाम उभी आहे. चिन्मयला विनंती करेन की सोशल मीडियावरच्या ह्या बावळट-बिनडोक ट्रोलर्सचं मनावर न घेता तू तुझं हवं असलेलं काम अविरत सुरू ठेवावं, असं शालिनी ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

मुलाच्या नावाने ट्रोल केलं जात असल्याने चिन्मयनं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका न साकारण्याच्या निर्णय घेतला आहे. चिन्मय म्हणाला की, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. माझ्या मनावर दगड ठेवून मी हा निर्णय घेतला. माझा मुलगा हा फक्त ११ वर्षांचा आहे आणि त्याला तर या गोष्टीची समजदेखील नाही, पण हे सगळं आम्ही कसं काय सहन करू शकतो? मी याआधीदेखील मुलाखतीत अनेकदा बोललो आहे, मग आताच का अशा प्रकारची ट्रोलिंग होतेय? खरंतर अशा प्रकारच्या ट्रोलिंगवर कायदा आणायला हवा.

सोशल मीडिया सुरू झाल्यापासून ट्रोलर्स ही जणू काही समाजाला लागलेली एक कीड आहे. कोणी यांना थांबवू शकत नाही. त्यामुळे इतरांना या सगळ्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. छत्रपती शिवरायांची माफी मागून फक्त माझ्या कुटुंबाच्या काळजीसाठी मी या भूमिकेतून रजा घेतोय. माझ्या मुलाचे नाव जहांगीर असूनही मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो आणि हे लोकांच्या रोषाचे कारण असेल तर मी महाराजांची भूमिका करणार नाही, असे चिन्मय मांडलेकरने स्पष्ट केले. मांडलेकर कुटुंबीयांना ट्रोल करताना काही जणांनी द्वेष पसरवणार्‍या कमेंट्सदेखील केल्या आहेत.

तुम्ही हिंदू असूनही मुस्लीम नाव कसं ठेवलं?, हेच नाव ठेवायचं असेल तर तुम्ही अफगाणिस्तान, पाकिस्तानात निघून जा, या आणि अशा हजारो कमेंट्स आणि प्रश्नांनी या दोघांना वेढलं आहे. जहांगीर या शब्दाचा अर्थ ‘जगज्जेता’ असा होतो. त्यामुळे एखाद्या दाम्पत्याला त्यांच्या मुलाचं नाव जहांगीर असं ठेवावं वाटलं तर ते का कुणाला चुकीचं वाटावं? असा प्रश्नदेखील नेहा मांडलेकरने सोशल मीडियावर विचारला आहे. चिन्मय मांडलेकर यांच्या मुलाचे नाव जहांगीर आहे असं कळल्यावर त्यांना ट्रोल करण्यात आलं. नेहा यांनी व्हिडीओ बनवून त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

चिन्मय मांडलेकर यांना त्यांच्या मुलाच्या नावावरून ट्रोल केलं जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी दोन वर्षांपूर्वी जहांगीरच्या नावावरून त्यांच्यावर काही नेटकर्‍यांनी टीका केली होती. त्यावेळी नेहा मांडलेकर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून या टीकाकारांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. आताही त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून जहांगीरचं नाव जहांगीर का ठेवलं याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मुळात स्वत:च्या मुलाच्या नावाचं स्पष्टीकरण जगाला द्यावं लागणं, ते देत असताना स्वतःचा धर्म, जात पुन्हा पुन्हा सांगावी लागणं हा प्रकार दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. १२ जानेवारी २०२३ला नेहा जोशी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून याबाबत पहिल्यांदा लिहिलं होतं.

एका कमेंटचा स्क्रिनशॉट टाकून त्यांनी ही पोस्ट लिहिली होती. या कमेंटमध्ये चिन्मयवर त्याच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यावरून टीका केली होती. त्यात कमेंट करणार्‍याने असं लिहिलं होतं की ‘मला तर चिन्मय मांडलेकरने पोराचं नाव जहांगीर ठेवलंय हेच खटकलं.’ या कमेंटला समर्थन देणार्‍या कमेंट्सही त्याखाली होत्या. याचाच एक स्क्रिनशॉट शेअर करीत नेहा यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलं की, ‘प्रिय ट्रोलर्स, याचा आता कंटाळा आलाय. अजून किती काळ तुम्ही नऊ वर्षांच्या मुलाला लक्ष्य करणार आहात? प्रत्येक वेळी त्याच्या वडिलांचा नवा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी हे का केलं जातं?

जहांगीर रतनजी दादाभाई टाटा हे देशद्रोही नव्हते. या देशासाठी या महापुरुषाने जे काही मिळवलं त्याचा अनेकांना लाभ झाला. आमच्या मुलाचं नाव आम्ही त्यांच्या नावावरून ठेवलेलं आहे आणि आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे.’ या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना वकील असीम सरोदे म्हणाले की, एकीकडे आपण विश्वगुरू होण्याच्या, विश्व नागरिक होण्याच्या गप्पा मारतो. आता विश्वात्मके देवो असंही आपण म्हणतो, पण आपण मुळीच वैश्विक वगैरे काही नाहीत. आपण अत्यंत गावठी आणि मागास विचारांचे लोक आहोत हेच या ट्रोलिंगवरून दिसतं.

त्यामुळे नावाचे अर्थ आणि त्या अर्थानुसार जगणं हा भाग दूरच राहतो आणि त्या नावाला ते मुस्लीम नाव आहे, ते ख्रिश्चन नाव आहे असं करून आपण प्रत्येक नावाला धर्मांमध्ये विभागून दिलेलं आहे. त्याचा त्रास मलाही झाला. खरंतर संस्कृतमध्ये असीम हा शब्द वापरला जातो, हिंदीतही ‘भगवान की असीम कृपा होगी’ असं म्हणतात, पण याची काहीही कल्पना नसलेल्या लोकांना असं वाटतं की असीम हे नाव मुस्लीमच आहे. त्यामुळे मग त्या नावाच्या माणसाचा द्वेष करणं, त्याला तुझ्या आईचे कुणासोबत काही संबंध होते का असं विचारणं, त्याच्या कुटुंबीयांना त्रास देणं असे प्रकार केले जातात.

सरोदे पुढे म्हणाले की, चिन्मय आणि त्याच्या बायकोला आलेला अनुभव विदारक आहे. सध्या भारतात प्रत्येक गोष्टीत धार्मिक विद्वेष शोधायचा प्रयत्न केला जातो. सध्या भारतात एक अशी झुंड तयार झालीय जी तुम्हाला तुमचा धर्म, तुमची जात सांगायला बाध्य करीत आहे. नेहा मांडलेकर यांनीही त्यांच्या व्हिडीओत सुरुवातीला त्यांची जात सांगितली. कारण त्यांना त्यांच्या मुलाच्या म्हणजेच जहांगीरच्या भविष्याची काळजी असावी.

अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणाला की, त्याने मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून चिन्मय मांडलेकर त्याच्या मुलावर वेगळे संस्कार करतोय का? तो भारतीय संस्कृतीमधलेच संस्कार करतोय. आजची परिस्थिती कशी आहे याचा सगळा विचार करूनच तो त्याचं संगोपन करतोय. त्याला वाईट गोष्टींपासून परावृत्त करतोय. त्याला चांगल्याच गोष्टी शिकवतोय. मग नावाने काय फरक पडतो?

तुम्ही जर एखाद्या व्यक्तीच्या मुलाच्या नावावरून त्याला ट्रोल करणार असाल तर तुम्हाला इतिहास माहिती आहे का? ‘जहांगीर’ हे नाव का ठेवलं हे त्याने फार आधीच सांगितलेलं आहे. तुम्ही इतिहास चाचपडून बघा आणि तुमच्यामध्ये खरंच हिंमत असेल, तर तुमचा खरा चेहरा घेऊन समोर येऊ द्या. तुम्ही खोटी नावं, खोटी अकाऊंट्स बनवून ट्रोल करणार. तुम्हाला आम्ही किती महत्त्व द्यायचं? असा सवाल उपस्थित करीत पुष्कर श्रोत्रीने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

दरम्यान, चिन्मय मांडलेकरने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या शिवराज अष्टक मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. आजवर या मालिकेतील एकूण पाच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. चिन्मयने घेतलेल्या या निर्णयामुळे आता अष्टकातील उर्वरित चित्रपटांचं काय होणार? महाराजांची भूमिका कोण साकारणार? अशा कमेंट्स करीत अभिनेत्याच्या चाहत्यांनी त्याला हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. हे ट्रोलिंगचं ‘नाव’ प्रकरण सध्या फार चर्चेचा विषय झाला आहे.

-(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -