घरफिचर्ससारांशलोकसंस्कृतीचा उदय!

लोकसंस्कृतीचा उदय!

Subscribe

आपल्या भाषेतून, आपल्या जगण्यातून, आपल्या वर्तनातून मानवी संस्कृती झिरपत असते. ती सदैव प्रवाही असते. म्हणूनच प्रत्येक काळात संस्कृतीची रूपे, तिचा चेहरा आपण बदललेला पाहतो. काही बाबतीत मात्र आपली संस्कृती अत्यंत कठोर असते. ती बदलत नाही. एकाच व्यापक अशा भूभागात अनेक संस्कृती नांदत असतात. त्यांच्या चालीरीती आणि जगण्याची पद्धत खूप वेगळी असते. या सामूहिक प्रकटनातूनच लोकसंस्कृती निर्माण होते. या लोकसंस्कृतीची रूपे न्याहाळणेही खूप गमतीशीर असते. त्याची माहिती करून घेण्याच्या उद्देशानेच या लेखमालेचा श्रीगणेशा या नवीन वर्षात आपण करीत आहोत.

-डॉ. अशोक लिंबेकर

संस्कृतीची संकल्पना बहुआयामी असल्याने तिची सर्वसमावेशक व्याख्या आजवर कुणालाही करता आली नाही. संस्कृतीमध्ये जशी विविधता आहे तशीच तिच्या धारणेतही आहे. किंबहुना संस्कृती म्हणजे काय हे माहीत नसले तरी आपण तिच्याबद्दल बोलतो. तिचे गोडवे गातो, तर कधी कधी तिच्या नावाने शंखही करतो. मानवी जीवनाला समग्रपणे व्यापणारी ही धारणा असल्याने मानवी जीवनाचा आणि संस्कृतीचा संबंध माणसाच्या पूर्वापार चालत आला आहे. माणसाच्या उत्क्रांत अवस्थेपासून त्याची संस्कृती बदलत आली आहे. त्यामुळे माणूस, निसर्ग आणि माणसाच्या जगण्याशी संबंधित असणारे सर्व घटक संस्कृतीने व्यापले आहेत.

- Advertisement -

या निसर्गात माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की त्यालाच बुद्धीचे, प्रतिभेचे, कल्पनेचे वरदान लाभल्याने त्याने आपले जीवन इतर मानवेतर सृष्टीपेक्षा वेगळे बनवले. त्यामुळे निसर्गातील इतर सृष्टी आणि त्यांचे जीवन स्थिर राहिले. त्यात कोणताही बदल झाला नाही. ते स्थायी स्वरूपात आजही जसे आहे तसेच राहिले, पण माणसाचे मात्र तसे झाले नाही. तो प्रत्येक युगात, प्रत्येक टप्प्यावर बदलत गेला. उदा. पक्षी आपल्या निवार्‍यासाठी घरटे बांधतात. ती घरटी आजही जशी आहे तशीच आहेत. त्यात कोणताही बदल झाला नाही, परंतु निसर्गत:च तयार झालेल्या गुहेत राहणारा माणूस मात्र आज उंचच उंच इमारतीमध्ये येऊन स्थिरावला. एवढेच नाही तर परगृहावर जाऊन राहण्याची स्वप्ने तो बघत आहे. त्याच्या राहण्याच्या, खानपानाच्या पद्धती बदलत गेल्या. हे सर्वच बाबतीत आपणास सांगता येते.

रानटी अवस्थेत असणारा माणूस कसा उत्क्रांत होत गेला याचे ज्ञान आपल्याला मानववंशशास्त्र करून देते. डार्विनचा मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत आपण शिकलेलो असतो, पण अशा सिद्धांतावरून मानवी प्रगतीबाबत आपण काही अनुमान करीत असलो तरी संस्कृती म्हणजे काय हे मात्र आपणास निश्चित सांगता येत नाही. असे असले तरी आपण जे जगतो किंवा आपल्या जगण्याशी निगडित असणारे विविध घटक किंवा ‘आपली जीवन जगण्याची पद्धत म्हणजे संस्कृती’ अशी संस्कृतीची अगदी सोपी व्याख्या आपण करू शकतो.

- Advertisement -

ब्रिटिश आपल्याकडे आले आणि भारतीय माणूस बदलत गेला. नवे ज्ञान, साहित्य, भाषा, वेशभूषा याने त्यात कितीतरी बदल झाला. ब्रिटिश येण्यापूर्वी भारतीय माणूस कसा होता आणि आज कसा आहे? हा बदल आपण पाहत, अनुभवत आलो आहोत. आज आधुनिकीकरणानंतर उत्तर आधुनिकतेपर्यंत आपण येऊन पोहचलो आहोत. त्यामुळे माणसाच्या जगण्याच्या धारणा बदलल्या आहेत आणि काही धारणा मात्र अजूनही तशाच पक्क्या आहेत.

जीवन जगण्याच्या पद्धती म्हणजे संस्कृती असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा माणूस जगत असताना ज्या गोष्टी करीत असतो त्यांचा समावेश संस्कृतीत होतो. यातून साधी अभिवादनाची पद्धतसुद्धा आपली संस्कृतीच असते. माणसाचे जगणे जसे अनेक बाह्य घटकांनी युक्त असते तसेच त्यात आंतरिक घटकही महत्त्वाचे असतात. यालाच भौतिक आणि मानसिक घटक असेही आपणास म्हणता येते. भौतिक घटकामध्ये जे परिवर्तन, विकास आज आपण पाहतो ते सर्व घटक येतात, तर मानसिक घटकात आपल्या अध्यात्मासह अनेक अंगे येतात. चंद्राला चांदोमामा म्हणणे हेही त्यात येते. मानसिक संकल्पनेतून अशा अनेक गोष्टी विकसित झाल्या.

नीती-अनीती, श्रद्धा-अंधश्रद्धा, पाप-पुण्ये, देव-धर्म दैवते, जप-तप अशा अनेक गोष्टी यात समाविष्ट झाल्या. भौतिक बाबीत विज्ञान महत्त्वाचे मानले गेले. बुद्धीच्या, कल्पनेच्या बळावर माणसाने जसे विज्ञान शोधले, त्यातून आपला भौतिक विकास साधला, तशाच त्याने काही कल्पनेतून बाधक गोष्टीही निर्माण केल्या. चार्तुवर्ण्य व्यवस्था हे त्याचे ठळक उदाहरण. कारण जो माणूस पूर्वी एकच होता, माणूस हीच त्याची जात होती, तर पुढे जात-पात, वर्ण हे भेद कसे निर्माण झाले आणि या भेदक व्यवस्थेलाही आपण पुढे संस्कृती म्हणूनच का गौरवले? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. थोडक्यात संस्कृतीच्या पोटातूनच काही विकृतीही निर्माण झाल्या. त्याचा निर्माता कोण तर माणूसच!

भारतीय संस्कृती म्हटले की एक बहुआयामी, विविधरंगी जीवन पद्धती आपल्यासमोर येते. भारतीय संस्कृतीतील विविधतेतील एकतेचे आपण नेहमीच गुणगान करतो. कारण भारतीय माणसाची राष्ट्रीय ओळख जरी भारतीय असली तरी त्याला त्याची प्रादेशिक ओळखही असते. या प्रादेशिकतेतही पुन्हा अनेक भेद संभवतात. जसे की परदेशात गेलो की आपण भारतीय असतो. तसे भारतातील इतर राज्यात आपली ओळख महाराष्ट्रीय, पंजाबी, केरळी, बिहारी अशीही असते. पुन्हा सध्या महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तरी आपण मराठवाडी, कोकणी, खान्देशी, वर्‍हाडी, घाटी असे अनेक भेद आपण करतो. एकाच मराठी भाषेच्या अनेक बोलीही आपण अनुभवतो.

एक राष्ट्र एक भाषा, एक राष्ट्र एक वेश असे आपले अजूनही नाही. त्यामुळेच खानपान, वेशभूषा, जातीपाती, सणवार-उत्सव, देव-दैवते-उपचार, आचारधर्म, विधी-विधाने, कुटुंब समाज, विवाह पद्धती असे अनेक बाबतीत एकाच राष्ट्रात अनेक भेद झालेले आपण पाहतो. यातूनच संस्कृतीची विविधरंगी रूपे आपण अनुभवत असतो. संस्कृतीची ही विविध रूपे पाहणे, त्याची माहिती करून घेणे या उद्देशानेच या लेखमालेचा श्रीगणेशा या नवीन वर्षात आपण करीत आहोत. लेखमाला सुरू होण्याच्या पहिल्या कृतीला श्रीगणेशा म्हणणे हेही आपल्या संस्कृतीचेच, आपल्या भाषेचे अविभाज्य अंग हे आपणास कळते, पण परदेशी व्यक्तीला हे कळणार नाही. आपल्या भाषेतून, आपल्या जगण्यातून, आपल्या वर्तनातून मानवी संस्कृती झिरपत असते. ती सदैव प्रवाही असते.

भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय नद्या, पुराणे, वेद, अद्वैत, वेदांत, तत्त्वज्ञान, भारतीय भक्ती परंपरा, भारतीय भाषा, शिक्षण, कला, साहित्य, इतिहास, व्यापार यांसह मानवी जीवनाचा आणि त्याच्या विविध अंगांचा शोध आपण घेणार आहोत. सत्य, शिव, सुंदरतेबरोबरच ‘वसुधैव कुटुंबकम’ अशी व्यापक जीवनधारणा असलेली आपली संस्कृती आज ग्लोबलायझेशनच्या काळात आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा आपण थक्क होतो. म्हणूनच रामायण, महाभारतासारखी महाकाव्ये आणि त्यांनी प्रभावित झालेलं लोकमानस, आपली जीवनमूल्ये आणि त्याचा प्रभाव किंवा त्यात होत असणारे बदल, पाप-पुण्याच्या, आत्मा-परमात्मा-लौकिक-अलौकिक अशा कल्पना, चार पुरुषार्थ हे सर्व गुंतागुंतीचे विषय सहज समजावून सांगणारे आपले थोर महात्मे आणि त्यांच्या नावाने जपली-जोपासली जाणारी आपली विविधरंगी संस्कृती समजावून घेऊया ‘रंग संस्कृतीचे’ या सदरात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -