घरफिचर्ससारांशकेकींना भेटलेली चाळीसगावची चेटकीण!

केकींना भेटलेली चाळीसगावची चेटकीण!

Subscribe

‘चाळीसगावची चेटकीण’ हे चित्र जगभर गाजले. या फोटो निर्मितीमागील कहाणीही तशीच रंजक अशी आहे. एके दिवशी सकाळच्या उन्हात केकी आपल्या घराच्या अंगणात बसलेले आणि त्याच वेळी एक पिंजारल्या केसांची, अत्यंत कृश, चेहर्‍यावर सुरकुत्या असलेली काळीकुट्ट फासेपारधीन त्यांच्यासमोर आली. केकीच्या वाढलेल्या केसावरून आणि एकूण त्यांच्या अवतारावरून तिला ते वैद्य वाटले होते. केकींनी तिला बसायला सांगितले आणि त्या बाईच्या मानेवर आपल्या आईचा पांढरा स्कार्फ घालून त्यांनी तिचे ऐंशीहून अधिक फोटोग्राफ घेतले. त्यातील एक फोटो म्हणजेच त्यांचे गाजलेले जगप्रसिद्ध फोटोचित्र The witches of Chalisgaon! म्हणजेच चाळीसगावची चेटकीण.

-डॉ. अशोक लिंबेकर

थोर चित्रकार कलामहर्षी केकी मूस यांना टेबल टॉप फोटोग्राफीचे जनक म्हटले जाते. या प्रकारातील त्यांची १३००८ इतकी छायाचित्रे उपलब्ध आहेत. टेबल टॉप फोटोग्राफीमध्ये वास्तवातील दृश्यांचा आभास निर्माण केलेला असतो. यासाठी छाया प्रकाशाचा सुरम्य, यथोचित मेळ घालून ही दृश्ये टेबलवर सेट करून साकारली जातात. यासाठी त्यांनी दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंचा उपयोग केला.

- Advertisement -

विशेष म्हणजे या प्रकारातील त्यांच्या अनेक चित्रांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. अनेक आंतरराष्ट्रीय मानांकने, फेलोशिप्स त्यांना आदराने बहाल करण्यात आल्या. त्यांच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांना आलेली अनेक पत्रे, लिफाफे फोडली गेली तेव्हा त्यात त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांचा समावेश होता, पण या चित्रकाराच्या दृष्टीने पुरस्कार महत्त्वाचे नव्हते. केकी असे का वागले? त्यांची दुनिया कोणती होती? त्यांच्या

कलानिर्मितीमागील प्रेरणा काय होत्या? जवळजवळ ५० वर्षे ते आयसोलेशनमध्ये का राहिले? कलानिर्मिती सोडून कोणत्याच लौकिक गोष्टीत त्यांना का रस नव्हता? की निलोफरने साथ सोडली म्हणून हे झाले? याचे उत्तर येणार्‍या काळात प्रकाशित होऊ घातलेल्या त्यांच्या ‘when I Shed My Tears’ या त्यांनी लिहून ठेवलेल्या आत्मचरित्रातून मिळेलच. त्यांचे हे हस्तलिखित प्रकाशनार्थ दिल्याचे मूस प्रतिष्ठानकडूनच समजले.

- Advertisement -

त्यांचे हे आत्मचरित्र मौलिक तर आहेच, परंतु कला आणि कलावंत यांच्यातील अन्योन्य संबंधाचा प्रेरक इतिहास या हस्तलिखितात दडलाय असे वाटते. तूर्तास तरी तो उजेडाची वाट पाहत आहे. १९८३मध्ये महाराष्ट्र शासनाने केकीवरचा Life and Sketch of Keki हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. त्यांच्या या आत्मचरित्राच्या प्रकाशनाची जबाबदारी उचलणे हेही वास्तविक पाहता शासनाचेच उत्तरदायित्व होते.

केकी यांनी जरी स्वत:ला त्यांच्या Ribront Ritreet या त्यांच्या वास्तूत बंदिस्त करून घेतले असले तरी इतर कलाप्रेमींसाठी त्यांचा दरवाजा सतत खुला होता. अनेक मान्यवरांनी त्यांच्या घरी जाऊन या मनस्वी कलावंताची भेट घेतली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तर चाळीसगाव जंक्शनवर ट्रेन थांबवून मधल्या चाळीस मिनिटांत केकींची भेट घेतली होती आणि या कलावंताचा गौरव केला होता.

केकीने पंडित नेहरूंचे केलेले टेबल टॉप प्रकारातील ‘नॉन पॉलिटिकल फेस ऑफ नेहरू’ हे छायाचित्र तेव्हा खूपच गाजले. लोकनायक जयप्रकाश, बाबा आमटे, साने गुरुजी, आचार्य दादा धर्माधिकारी, पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, ना. सी. फडके, बालगंधर्व, कुमार गंधर्व अशा कितीतरी साहित्यिकांनी, कलावंतांनी केकीची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतलेली. यातील अनेकांची खास छायाचित्रे केकीने काढली आहेत. केकीच्या सहवासातील त्यांच्या काही मित्रांची छायाचित्रेहीही त्यांनी घेतली आहेत. यात रेल्वे स्टेशनवरील हमाल आहे.

तसाच स्टेशनबाहेरील भिकारीही. अठराविश्वे दारिद्य्र काय असते? किंवा लाज झाकण्या इतकीही वस्त्रे ज्याच्या अंगावर नाहीत अशी अगदी वस्त्रांची लक्तरे झालेल्या एका भिकार्‍याचा फोटो केकीने काढला. या फोटोत तो भिकारी आपली लाज झाकण्यासाठी आपल्या डोळ्यावर हात आडवा धरतो. हे चित्र इतके करुण आणि भीषण आहे की आपल्या डोळ्याच्या कडा हे दारिद्य्र, माणसाची ही अवस्था पाहून पाणावतात. त्यांची ही छायाचित्रे लक्षवेधक तर आहेतच, परंतु ती तितकीच उत्कट आणि आशयघन आहेत.

सामान्य विषयातील आरपार सौंदर्य न्याहळण्याची आणि तिला कलात्मक दर्जा देण्याची कल्पकता, सौंदर्यदृष्टी केकींकडे होती. म्हणूनच ते सध्या घरगुती वस्तूंनाही कलेच्या माध्यमातून जागतिक परिमाण देऊ शकले. त्यांनी घरातील ड्रायफ्रूट, कप, कानातले डूल, बूट, ट्रे यांसारख्या अनेक वस्तू चित्रासाठी वापरात आणल्या. साध्या बोकडाच्या डोळ्यातील भावनांना त्यांनी ग्रेट फिलॉसॉफरचा दर्जा दिला. यासंदर्भात त्यांची नॉटी बॉय, जेलीसियस ट्री आणि स्त्री-पुरुषांच्या एकात्म भावाचे, त्यांच्या एकरूपतेचे दर्शन घडवणारी काष्ठशिल्पे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काही चित्रांना जागतिक आयाम प्राप्त झाले. मोनालिसाच्या चित्रासारखीच ती गाजली. त्यांची ‘रेड गर्ल’ आणि ‘चाळीसगावची चेटकीण’ ही चित्रे त्या बाबतीत महत्त्वाची आहेत.

एका सामान्य फासेपारधी स्त्रीला त्यांनी या चित्रातून जगभर पोहचवले. या चित्राच्या निर्मितीमागील कहाणीही तितकीच उत्कंठावर्धक आहे. वास्तविक केकीने जी हजारो छायाचित्रे निर्माण केली त्या सर्वांच्या निर्मितीमागील कहाणी लिहिली गेली असती तर कला क्षेत्रातील एक नवा प्रयोग आणि एक अनोखा कला निर्मितीकोशच ठरला असता. त्यांच्या सहवासात काही काळ वास्तव्य केलेल्या कमलाकर सामंत, रवींद्र पवार या केकी मूस प्रतिष्ठानच्या स्नेह्यांकडून आज ही माहिती मिळत आहे. सांस्कृतिक दृष्टीने हे आपले संचित आहे. नाहीतर हा अमूल्य ठेवा तसाच काळाच्या फ्रेमबाहेर गेला असता.

‘चाळीसगावची चेटकीण’ हे चित्र जगभर गाजले. या फोटो निर्मितीमागील कहाणीही तशीच रंजक अशी. एके दिवशी सकाळच्या उन्हात केकी आपल्या घराच्या अंगणात बसलेले आणि त्यावेळी एक पिंजारल्या केसांची, अत्यंत कृश, चेहर्‍यावर सुरकुत्या असलेली काळीकुट्ट फासेपारधीन त्यांच्यासमोर आली. केकीच्या वाढलेल्या केसावरून आणि एकूण त्यांच्या अवतारावरून तिने त्यांना वैद्य समजले होते. ती पुढे आली आणि तिने तिच्या सांधेदुखीवरील औषध मागितले.

केकी काही हकीम, वैद्य नव्हते, पण त्यांनी तिला टाळले नाही. त्यांच्यातील चित्रकाराने तिला पाहिले, जोखले आणि त्यांच्या डोक्यात क्लिक झाले. अरे आपल्याला पाहिजे तसा चेहरा आज मिळालाय. त्यांच्यातील छायाचित्रकार जागा झाला. त्यांनी तिला घरात बोलावले आणि तिला सांगितले, माझ्याकडे तुला द्यायला काहीच दवा नाही, पण या माझ्या यंत्राच्या माध्यमातून तुला मी जगभर पोहचवतो. एक काम कर. मी सांगतो तशी बैस. मी तुझ्यावरून हे यंत्र फिरवतो आणि काय जादू, पुढल्या काही वेळेतच त्या बाईच्या मानेवर आपल्या आईचा पांढरा स्कार्फ घालून त्यांनी तिचे ऐंशीहून अधिक फोटोग्राफ घेतले.

त्यातील एक फोटो म्हणजेच त्यांचे गाजलेले जगप्रसिद्ध फोटोचित्र The witches of Chalisgaon! या फोटोच्या बदल्यात केकीने त्या फासेपारधीनीकडील सर्व वस्तू विकत घेतल्या. दवा मिळाली नाही, पण सर्व वस्तू विकल्या गेल्या म्हणून लाखमोलाची दुवा देऊन ही पारधीन आनंदाने तिथून गेली. केकीनेही त्यांचा शब्द खरा केला आणि ही चाळीसगावची फासेपारधीण जगभर पोहचली. जगातल्या म्युझियममध्ये गेली. आपला चेहरा असा अजरामर होईल असे तिला वाटले असेल का? मुळीच नाही. तिच्यासाठी महत्त्वाचे होते ते तिच्या वस्तूंच्या बदल्यात तिच्या हातात केकीने दिलेले ते पाच रुपयांचे नाणे!

(समाप्त )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -