घरफिचर्ससारांशआदिशक्तीची हीच पूजा

आदिशक्तीची हीच पूजा

Subscribe

नवरात्र घरोघरी अतीव आनंदाने, उत्साहाने, श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला जाणारा सण. खासकरून स्त्रीशक्तीला अभिवादन करणारा, स्त्रीशक्तीचा महिमा वर्णन करणारा आणि स्त्रीला देवीचं रूप समजून तिचा आदर, पूजाअर्चना करण्याचे दिवस. नवरात्र म्हणजे घरगुती स्वरूपातच नाही तर सामाजिक स्तरावरदेखील, मंडळांमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन, स्पर्धा, दांडिया, होमहवन, पूजापाठ यामुळे वातावरण चैतन्यमय झालेले असते. या नऊ दिवसांत प्रत्येकाला जाणीव होते की स्त्री शक्ती आहे, स्त्री भक्ती आहे, स्त्रीला नाना उपमा, उपाध्या देऊन तिला विविध पुरस्कार, विविध सन्मान बहाल केले जातात. स्त्रीचं महात्म्य सांगणारं भाषण प्रत्येक जण या कालावधीत करीत असतो, पण प्रत्येक पुरुष व्यासपीठावर त्याच्या भाषणात स्त्रीबद्दल जे बोलतो तसेच त्याच्या घरात तो वागतो का? हा खूप मोठा मजेशीर विषय आहे.

–मीनाक्षी जगदाळे

नवरात्रात सहभागी झालेल्या प्रत्येक स्त्रीला खरंच तिच्या घरात कायमस्वरूपी देवीचा दर्जा, देवीसारखाच आदर मिळतोय का? हा आजच्या लेखामधील विचारमंथनाचा मुद्दा आहे. घरातील लक्ष्मीरूपी सुनेने, मुलीने, आईने, घरातील महिलेने प्रत्येक नवरात्र कसं व्यवस्थित करावं, त्यासाठी काय काय तयारी करावी, काय खरेदी करावी, कोणत्या रीतीभाती, कुलाचार, कुलधर्म, पूर्वापार चालत आलेल्या पद्धती पाळाव्यात, सगळ्या कुटुंबात कसं मिळून मिसळून हा सण साजरा करावा याबाबत तिला अनेक उपदेश केले जातात आणि अपेक्षादेखील ठेवल्या जातात.

- Advertisement -

अगदी एका वर्षाच्या लहान कुमारिकेपासून ते वयस्कर महिलेपर्यंत प्रत्येक स्त्रीजन्माला वंदन करणारं हे नवरात्र. हे सर्व करण्यासाठी, अमलात आणण्यासाठी घरोघरी लेकी सुना काटेकोर नियम पाळणे, अहोरात्र मेहनत घेणे, देवीच्या कृपेने, आशीर्वादाने तरी आपल्या आयुष्यातील दुःख कमी होतील या भाबड्या अपेक्षेने स्वतःची प्रचंड धावपळ आणि दगदग करीत असतात.

नवरात्र घरोघरी अतीव आनंदाने, उत्साहाने, श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला जाणारा सण. खासकरून स्त्रीशक्तीला अभिवादन करणारा, स्त्रीशक्तीचा महिमा वर्णन करणारा आणि स्त्रीला देवीचं रूप समजून तिचा आदर, पूजाअर्चना करण्याचे दिवस. नवरात्र म्हणजे घरगुती स्वरूपातच नाही तर सामाजिक स्तरावरदेखील, मंडळांमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन, स्पर्धा, दांडिया, होमहवन, पूजापाठ यामुळे वातावरण चैतन्यमय झालेले असते. या नऊ दिवसांत प्रत्येकाला जाणीव होते की स्त्री शक्ती आहे, स्त्री भक्ती आहे, स्त्रीला नाना उपमा, उपाध्या देऊन तिला विविध पुरस्कार, विविध सन्मान बहाल केले जातात. स्त्रीचं महात्म्य सांगणारं भाषण प्रत्येक जण या कालावधीत करीत असतो, पण प्रत्येक पुरुष व्यासपीठावर त्याच्या भाषणात स्त्रीबद्दल जे बोलतो तसेच त्याच्या घरात तो वागतो का? हा खूप मोठा मजेशीर विषय आहे.

- Advertisement -

मुळात घरातील महिलांच्या या परिस्थितीला फक्त पुरुष जबाबदार कधीच नसतो, तर इतर महिलादेखील एकमेकांना कमी लेखणे, एकमेकींना घालून पाडून बोलणे, चहाड्या चुगल्या करणे, एकमेकींची निंदा करणे यात आघाडीवर असतात.

महिलाच महिलांना किंमत देत नाहीत. त्याच एकमेकींना समजावून सांभाळून घेत नाहीत. त्यांनाच एकमेकींबद्दल आपुलकी, प्रेम आस्था नाही, तर कशाला करता नवरात्रीमध्ये उपवास? घरातल्या लेकी सुनांच्या डोळ्यांत जर तुमच्यामुळे पाणी येत असेल तर कशाला करता सकाळ-संध्याकाळ आरत्या? एक स्त्रीच दुसर्‍या स्त्रीच्या वेदनेचे कारण बनत असेल, तिचा जीव रोज जळत असेल तर तुम्हाला देवीसमोर केलेल्या होमाचे आणि त्यात जळणार्‍या समिधांचे काय फळ मिळणार आहे? एका बाजूला जप तप, साधना, ध्यान धारणा करायची आणि दुसर्‍या बाजूला घरातील स्त्रीचा अवमान करायचा यात महिलाच अग्रेसर असल्याचे दिसतात.

एका स्त्रीने दुसर्‍या स्त्रीबद्दल मनात तिरस्कार, राग, चीड, द्वेष, सूडभावना, चुकीचे विचार ठेवून देवीला कितीही पूजलं तरी ती कधीच प्रसन्न होणार नाही. देवी तुमच्या घरात फक्त नऊ दिवस नाही तर वर्षभर आहे, चोवीस तास आहे, जी तुमची सून आहे, लेक आहे, बहीण आहे, पण आपल्या संकुचित वृत्तीला हे वास्तव स्वीकारायचं नाही. एकमेकींना दोष देणार्‍या महिला, एकमेकींवर आरोप करणार्‍या महिला पाहिल्या की असं वाटतं खरंच यांना दुर्गा, सप्तशती किंवा देवी महात्म्य समजलं आहे का? निदान त्यांनी ते खरंच मनःपूर्वक वाचून अभ्यासलं आहे का?

या नवरात्रात आपण हा विचार जरूर करावा की आपल्या घरातील कोणतीही स्त्री जर अंतःकरणातून सुखी, समाधानी नसेल, फक्त तडजोड म्हणून आयुष्य जगत असेल, तिला तिचं अस्तित्व नसेल, तिचं मन मारून ती दुःख पचवत असेल, ती तिच्या हक्क आणि अधिकारांपासून वंचित असेल, तिला तिचं स्थान मिळत नसेल तर आपण नवरात्रात कितीही वेळा कितीही देवींची पूजा, उपवास, साधना आणि प्रार्थना केली तरीही देवी आपल्याला इच्छित फळ देईल का? ती आपल्याला शुभ आशीर्वाद देईल का? आपल्या घरातील दैवी शक्तीला म्हणजेच आपल्या गृहलक्ष्मीला अंधारात ठेवून, त्रासात ठेवून आपण देवीच्या मूर्तीसमोर कितीही दिवस दिवा जाळला तर आपल्या आयुष्यात प्रकाश पडेल का? या विषयावर विचार होणे अपेक्षित आहे.

आजच्या कलियुगात स्त्रीला देवी म्हणून नाही, पण निदान माणूस म्हणून वागणूक मिळणं आवश्यक आहे असे वाटते. निदान प्रत्येक स्त्रीला तिचे मूलभूत हक्क, अधिकार मिळतील, पत्नी म्हणून, मुलगी म्हणून, आई म्हणून, बहीण म्हणून तिला तिच्या नात्याप्रति असलेलं अस्तित्व मिळेल, ओळख मिळेल, मान सन्मान मिळेल इतका प्रयत्न आपण करू शकतो. कोणत्याही स्त्रीचा अवमान होणार नाही, ती आपल्यासोबत सुरक्षित राहील, तिला कधीच आत्महत्या करावीशी वाटणार नाही, ती एकटी पडणार नाही, तिला कधीच आयुष्याचा कंटाळा येणार नाही, तिची घुसमट होणार नाही यासाठी आपण नवरात्रीपासून प्रयत्न करूयात.

कोणत्याही स्त्रीला लाचारी पत्कारावी लागणार नाही, हतबल व्हावं लागणार नाही, मजबुरीमुळे कोणत्याही स्त्रीला तिच्या चारित्र्याशी तडजोड करावी लागणार नाही, समाज तिच्या दुःखाचं भांडवल करून तिचा गैरफायदा घेणार नाही,

तिच्यावर होणारे शारीरिक, मानसिक बलात्कार थांबतील, तिची पिळवणूक, फसवणूक थांबेल, तिच्यावर होणारे प्राणघातक हल्ले बंद होतील, तिला खोटं आमिष दाखवलं जाणार नाही या सर्व बाबींची दखल घेऊन जर येत्या नवरात्रीपासून आपण काम केलं तर निश्चितच ती आदिमाया, आदिशक्तीची खरी पूजा असेल आणि त्यातून आपल्याला प्रसादरूपी जो आशीर्वाद मिळेल तो नक्कीच आपलं कल्याण करेल. (समाप्त)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -