घरफिचर्ससारांशआर्थिक साक्षरतेसमोरील आव्हाने आणि उपाय

आर्थिक साक्षरतेसमोरील आव्हाने आणि उपाय

Subscribe

आपल्या प्रत्येकालाच लवकरात लवकर अर्थसंपन्न व्हावेसे वाटते आणि तसा प्रत्येकाचाच तो प्रयत्न असतो. स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग, मुकेश अंबानी, नारायण मूर्ती, अंबानी, टाटा असे सगळे उद्योजक व धनवान व्यक्ती अनेकांचे आयडॉल असतात. अशा बुद्धिमान, कष्टाळू व चतुर व्यक्तींकडून शिकण्यासारखे खूप काही असते, परंतु अर्थसाक्षरतेचे काही मूलभूत नियम पाळले तर आपणही समृद्ध व विविध आर्थिक जबाबदार्‍या यथायोग्य पार पाडून सुखासमाधानाचे आयुष्य नक्कीच जगू शकतो. लाखो भारतीयांनी ते यशस्वीपणे करून दाखवले आहे, परंतु आपले त्यांच्याकडे लक्ष नसते किंवा आपल्याला त्यांचे नायकत्व समजत नाही. असे दुर्लक्षित नायक कदाचित तुमच्या शेजारी सोसायटीत, गल्लीत राहत असतील, तुमच्या नातेवाईकांत, मित्रांमध्ये, परिचितांमध्ये असे लोक असतील आणि तुम्हाला त्यांच्या यशाचा पत्ताच नसेल, ते नेमके काय करतात आणि काय करणे टाळतात हे समजून घेणे म्हणजेच अर्थसाक्षर होणे.

–राम डावरे

अर्थसंपन्न कसे व्हायचे व त्यासाठी काय काय करावे लागते याची आर्थिक साक्षरता बर्‍याच लोकांकडे नसते आणि त्यामुळे बरेच लोक अर्थसंपन्न होत नाहीत. अर्थसंपन्न होण्यासाठी आर्थिक साक्षरता हा फार महत्त्वाचा भाग आहे, परंतु अशी आर्थिक साक्षरता मिळवण्यासाठी खूप सारी आव्हाने आहेत. त्यासाठी खूप सारी आर्थिक शिस्त, संयम लागतो. त्या आव्हानांवर उपाय काय आहेत याचा विचार आपण आज करणार आहोत.

- Advertisement -

अर्थसंपन्न होण्यासाठीची काही आव्हाने खालीलप्रमाणेः

१. स्पष्ट आर्थिक उद्दिष्टे नसणे : असा विचार करा की तुम्हाला पुण्याला जायचे आहे, परंतु तुम्ही निघालात आणि तुमच्या घरासमोरील एका सर्कललाच दिवसभर चकरा मारत आहात, तर तुम्ही पुण्याला पोहचणार का? असेच अर्थसाक्षरतेबद्दल असते. आपल्याला आपले उद्दिष्टच माहीत नसते की आपल्याला कुठे जायचे आहे आणि कशासाठी जायचे आहे. गुंतवणुकीबाबतही तसेच आहे. तुमच्याकडे स्पष्टपणे लिखित उद्दिष्टे नसल्यास ती पूर्ण कशी होणार.

जसे की गुंतवणुकीचे लक्ष्य किंवा गुंतवणुकीचा उद्देश काय आहे हे जर तुम्ही ठरविले नाही तर तुम्ही आर्थिकदृष्ठ्या यशस्वी होण्याची शक्यता नाही. म्हणूनच तुम्ही तुमचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी धोरण आखण्यापूर्वी तुम्ही गुंतवणूक का करीत आहात किंवा बचत का करीत आहात, तुम्ही किती बचत करण्याची योजना आखत आहात, तुम्ही किती काळासाठी गुंतवणूक/बचत करीत आहात इत्यादी गोष्टी शोधणे आवश्यक आहे. आपण हेदेखील लक्षात ठेवले पाहिजे की स्वत:ची आर्थिक उद्दिष्टे ठरविताना आपण वास्तववादी असणे आवश्यक आहे. जर तुम्ही स्वतःसमोर अशक्य उद्दिष्टे ठेवली तर तुम्ही स्वतःला अपयशाकडे न्याल. तुमचे उत्पन्न किती आहे व पुढे त्यात किती वाढ होणार आहे याचा विचार करूनच आर्थिक उद्धिष्ट ठेवले पाहिजे. तुमच्या वयानुसार तुमचे आर्थिक उद्दिष्ट हे वेगवेगळे असते. बरेच लोक उत्पन्नातून बचत तर करतात, पण कशासाठी बचत आणि गुंतवणूक करायची हेच ठरलेले नसते.

- Advertisement -

२. खर्चावर नियंत्रण ठेवण्यात असमर्थता : तुमच्या उत्पन्नाच्या सवयीपेक्षा तुमच्या खर्च करण्याच्या सवयीच तुम्हाला लवकर अर्थसंपन्न बनवतात. आर्थिकदृष्ठ्या यशस्वी होण्यासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अडथळा आहे. आवेगपूर्णपणे खर्च करणे हा तुमच्याकडे असलेल्या कोणत्याही आर्थिक योजनांचा नाश करण्याचा एक निश्चित मार्ग आहे. तुम्ही खर्च करण्यापूर्वी पुरेसा विचार केला नाही किंवा योजना आखली नाही, तर तुमची आर्थिक उद्दिष्टे कायमच चुकतील. दुर्दैवाने जगात कोणतेही असे मशीन नाही की जे तुम्हाला तुमची खर्च करण्याची इच्छा नियंत्रित करू शकेल. त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवावेच लागेल. खर्च करण्याच्या तुमच्या आवेगावर नियंत्रण ठेवण्याचा एक संभाव्य मार्ग म्हणजे कुठलाही खर्च करताना तुमची इच्छा आणि गरज यातील फरक ओळखणे. त्यासाठी एक सोपा प्रश्न स्वतःला विचारणे की या खर्चाशिवाय मी जगू शकतो का? याचे उत्तर जर होय असेल तर ती तुमची इच्छा आहे आणि उत्तर नाही असेल तर ती तुमची गरज आहे. तुम्ही जर बचत करीत असाल तर तुम्ही यशाच्या मार्गावर आहात.

३. गुंतवणूक रिटर्न्स (परतावा) आणि टॅक्सेस : आपल्या यशाची इतरांशी तुलना करणे हा मानवी स्वभाव आहे आणि जर तुम्हाला असे आढळले की तुमचे परतावे तुमच्या मित्राच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या तुलनेत कमी आहेत, तर तुम्ही तुमची गुंतवणूक बदलू शकता. महागाई दर आणि तुमच्या गुंतवणुकीचा परतावा याचे गणित समजून घेणे आवश्यक आहे. आज एखादी वस्तू घ्यायला १०० रुपये लागत असतील तर ती वस्तू १० वर्षांनंतर त्याच किमतीला मिळणार नाही. त्या वस्तूची किंमत वाढलेली असेल. त्या महागाईवाढीच्या दरापेक्षा तुमच्या गुंतवणुकीवरील परतावा हा नेहमी जास्तच हवा. दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अतिपरताव्याच्या लोभापायी कुठेही गुंतवणूक करू नये. बाजारातील अनेक फसव्या गुंतवणूक योजनांमध्ये अनेकांचे लाखो-करोडो रुपये बरबाद झाले आहेत हे समजून घ्यावे. गुंतवणूक परतावा काढताना संभाव्य टॅक्सेसचा विचार होणे आवश्यक आहे. रिअल इस्टेट गुंतवणूक करताना हा विचार जरूर करावा. जेवढे टॅक्सेस जास्त तेवढा तुमचा गुंतवणूक परतावा कमी असतो.

४. जास्त कर्ज घेणे : कर्ज घेणे आता फार सुलभ झाले आहे, परंतु कर्जाची परतफेड करून तुमच्याकडे बचत आणि गुंतवणूक यासाठी काही उरत नसेल तर कर्ज घ्यायचे की नाही याचा निर्णय फार महत्त्वाचा आहे. आपले उत्पन्न भविष्यात खूप वाढेल या चुकीच्या आशेपायी भरपूर कर्ज काढले जाते व नंतर त्याची परतफेड होत नाही. वर स्वतःला विचारलेला प्रश्न परत विचारा की मी गरजेसाठी कर्ज काढत आहे की फक्त माझ्या इच्छा, हौसमौज करण्यासाठी कर्ज काढत आहे. तुमचे उत्पन्न, तुमचे वय, तुम्हाला कर्जाची किती डाऊन पेमेंट येणार आहे, कर्जाचा हप्ता किती येणार आहे, कर्जाचा कालावधी किती असणार आहे, कर्जाचा व्याजदर किती असणार आहे या सर्वांचा अभ्यास करूनच कर्ज घ्यायचे की नाही हे ठरवायचे आहे. तुमचे येणारे सर्वच उत्पन्न जर कर्ज फेडण्यात जाणार असेल तर गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे काहीही उरणार नाही. तसेच एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेण्याची वेळ येत असेल तर तुमचा कर्ज निर्णय चुकला असेच म्हणावे लागेल. घसारा होणार्‍या मालमत्तांसाठी कर्ज घेताना योग्य विचार होणे गरजेचे असते, जसे की कार लोन, मशिनरी लोन इत्यादी.

५. आपत्कालीन परिस्थितीसाठी अपुरे नियोजन ः आणीबाणी ही जीवनाची वास्तविकता आहे. त्यासाठी योग्य नियोजन न केल्याने तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करता येणार नाहीत. आणीबाणीसाठी आर्थिकदृष्ठ्या तयार राहण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे. पुरेसा आरोग्य विमा घेणे आणि आपत्कालीन निधी तयार करणे. तुमच्याकडे पुरेसा आरोग्य विमा असल्यास वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत तुमची बँक शिल्लक शून्य होणार नाही. तसेच बिले भरण्यासाठी प्रचंड कर्ज घेण्याच्या शक्यतेपासून तुम्ही स्वतःला वाचवाल. आरोग्य आपत्कालीन परिस्थिती विम्याने हाताळली जाऊ शकते, परंतु नोकरी गमावण्यासारख्या इतर आपत्कालीन परिस्थितीही येऊ शकतात.

त्यामुळे तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असणे आवश्यक आहे. इमर्जन्सी फंड तुम्हाला पैशांची चिंता न करता कठीण काळातून प्रवास करण्यास अनुमती देईल, परंतु लक्षात ठेवा की तुमच्याकडे पुरेसा मोठा निधी असणे आवश्यक आहे. म्हणूनच असे सुचवले जाते की तुमचा आपत्कालीन निधी म्हणून तुमच्याकडे किमान ६ महिन्यांच्या घरखर्चासाठी लागणारी रक्कम ही आपत्कालीन निधी म्हणून सहज उपलब्ध असली पाहिजे. व्यावसायिकांचे फिक्स असे काही उत्पन्न नसते. त्यांनी तर हा निधी बाजूला ठेवलाच पाहिजे आणि तो नसेल तर मग पर्सनल लोन, मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून लोन घेण्याची वेळ येते.

६. महागाई ( इन्फ्लेशन) : अदृश्य अडथळा ः अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर महागाई म्हणजे भविष्यात वस्तूंची किंमत अधिक वाढते आणि कालांतराने तुमच्या बचतीचे मूल्य कमी होते. याचा अर्थ असा की जर तुम्हाला तुमचा सध्याचा खर्च नंतरच्या तारखेला टिकवून ठेवायचा असेल, तर तुम्ही आता जे खर्च करीत आहात त्यापेक्षा जास्त खर्च करावा लागेल. चलनवाढीचा तुमच्या गुंतवणुकीवर दीर्घकालीन परिणाम होतो. कारण तुमच्या गुंतवणुकीचा वास्तविक परताव्याचा दर महागाईमुळे कमी होतो. महागाईचा भडका, महागाईने आर्थिक नियोजनाचा विचका, सरकार महागाई नियंत्रणात आणण्यात अपयशी यांसारख्या बातम्यांचा आपल्यावर विविध माध्यमांतून मारा होत असतो.

महागाई म्हणजे काय हे ढोबळमानाने आपल्याला माहिती असते, पण आपल्या गुंतवणुकीवर आणि पर्यायाने आपल्या आर्थिक भविष्यावर महागाई दूरगामी परिणाम करीत असते. वाढत्या महागाईबद्दल राज्यकर्त्यांवर आगपाखड करताना आपण स्वतः काय उपाययोजना करणे आवश्यक आहे याचा विचारही करायला हवा. अटळ ते स्वीकारा, या युक्तीप्रमाणे महागाई असणारच आहे हे कटू वास्तव स्वीकारून आपले गुंतवणूक निर्णय घ्यायला हवेत.

वरील काही अडचणी व त्यावरील उपाय नीट समजून घेतले तर आपणही लवकर अर्थसंपन्न होऊ शकतो. आर्थिक शिक्षण म्हणजे फक्त आर्थिक बातम्या वाचणे नव्हे. तुम्हाला देशाचा जीडीपी, अर्थव्यवस्थेची वाढ यांसारख्या गोष्टींची ताजी माहिती नसली तरी एकवेळ चालेल, पण आपल्या स्वतःचे आर्थिक आरोग्य निश्चित करणार्‍या सोप्या बाबींची माहिती नक्कीच हवी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -