घरताज्या घडामोडीटाईम ट्रॅव्हल

टाईम ट्रॅव्हल

Subscribe

‘टाईम ट्रॅव्हल’ ही एक संकल्पना आहे जिणे शतकानुशतके मानवी कल्पनाशक्तीला मोहित केले आहे. यात काळाच्या पुढे किंवा मागे जाण्याच्या कल्पनेचा समावेश आहे अन् विज्ञान कल्पित साहित्य आणि चित्रपटात त्याचा शोध घेण्यात आला आहे. सामान्य सापेक्षता आणि वर्महोल्स यांसारखे सिद्धांत सूचित करतात की भविष्यात टाईम ट्रॅव्हल शक्य आहे, परंतु ते प्रत्यक्षात आणण्याचे तंत्रज्ञान सध्या तरी अस्तित्वात नाही.

एच. जी. वेल्स याने १८९५ साली लिहिलेल्या ‘द टाईम मशीन’ या कादंबरीत वेळेच्या प्रवासाचे सर्वात जुने चित्रण आढळते, ज्यामध्ये एक शास्त्रज्ञ अशी मशीन तयार करतो ज्यामुळे त्याला भविष्यात प्रवास करता येतो असे त्यात वर्णन केले आहे. खरंतर यानंतरच ‘टाईम मशीन’ हा शब्द जास्त लोकप्रिय झाला. ही एक अशी मशीन होती की त्या माध्यमातून टाईम ट्रॅव्हल केला जाऊ शकत होता. टाईम ट्रॅव्हल म्हणजे चालू वेळेच्या तुलनेत वेगळ्या वेग प्रवाहात प्रवास करणे. या कादंबरीमुळे त्यावेळच्या बर्‍याच तत्त्वज्ञानी आणि चिकित्सक लोकांना विचारात पाडले आणि त्यामुळे याबद्दल अनेक शोधनिबंध लिहिले गेले तसेच ‘टाईम ट्रॅव्हल’वर आधारित अनेक चित्रपटही बनवले गेले.

सारासार विचार केला तर दोन प्रकारचे ‘टाईम ट्रॅव्हल’ असू शकतात. एकतर भविष्यात टाईम ट्रॅव्हल करणे आणि दुसरे म्हणजे भूतकाळात ‘टाईम ट्रॅव्हल’ करणे. आधी आपण भविष्यात टाईम ट्रॅव्हल करायचा विचार थोडा सायन्सच्या दृष्टिकोनातून समजून घेऊ. भविष्यात टाईम ट्रॅव्हल करण्याची संकल्पना ही अल्बर्ट आईनस्टाईनच्या ‘थेरी ऑफ स्पेसिअल रेलॅटिव्हिटी’ याचा आधार घेऊन पुढे आलेली दिसते. टाईम डायलेशन (वेळ विस्तार) ही संकल्पना सर्वात आधी आईनस्टाईनने मांडली होती. त्याने हे मांडण्याआधी असे गृहीत धरले जायचे की वेळ ही एक स्थिर गोष्ट आहे (TIME IS CONSTANT). प्रसिद्ध सायंटिस्ट आयझॅक न्यूटननुसार कुठल्याही स्थळाचा विचार न करता म्हणजे आपण जमिनीवर असो, अवकाशात असो, खोल समुद्रात असो, कुठल्या वेगळ्या ग्रहावर असो, विमानात असो किंवा अगदीच अतिप्रचंड वेगाने उडणार्‍या मिसाईलमध्ये असो काळाचा प्रवाह हा प्रत्येक ठिकाणी स्थिर आहे, पण अल्बर्ट आईनस्टाईनने न्यूटनच्या या संकल्पनेला सर्वप्रथम छेद दिला.

- Advertisement -

आईनस्टाईननुसार वेळ ही स्थिर गोष्ट नाही, तर वेळ ही एका पाण्याच्या प्रवाहासारखी आहे. ज्याप्रमाणे नदीत पाणी काही ठिकाणी हळू वाहते, तर काही ठिकाणी जोरात वाहते अगदी तसाच वेळेचा प्रवाहही आहे, जो वेग (स्पीड) आणि गुरुत्वाकर्षण (ग्रॅव्हिटी) यावर अवलंबून असतो. म्हणजेच आईनस्टाईनच्या म्हणण्यानुसार जर वेग किंवा गुरुत्वाकर्षण बदलले गेले तर वेळेला हळू किंवा जोरात केले जाऊ शकते. यालाच म्हणतात ‘टाईम डायलेशन.’ हेच साध्या भाषेत समजून घ्यायचे तर जर आपण एखाद्या विमानात बसलोय जे खूपच वेगाने प्रवास करीत आहे तर आपल्यासाठी वेळ हळू होऊन जाईल, हे त्या व्यक्तीच्या तुलनेत जो त्या वेगाने प्रवास करत नाही. हे समजायला थोडे अवघड वाटत आहे म्हणून आपण एक उदाहरण बघू. समजा तुमच्याकडे बरोबर एकाच वेळेवर सेट केलेली दोन सारखी घड्याळं आहेत. त्यातील एक आपण जर पृथीवरच ठेवले आणि दुसरे त्या विमानात ठेवले जे विमान पृथ्वीला चक्कर मारून पुन्हा त्याच ठिकाणी उतरले. आता जर आपण त्या दोन्ही घड्याळातील वेळेची तुलना केली तर असे लक्षात येईल की विमानातील घड्याळ हे पृथ्वीवर ठेवलेल्या घड्याळाच्या तुलनेत काही नॅनो सेकंद मागे पडलेले दिसेल. म्हणजेच विमानातील घड्याळ तुलनेने थोडे हळू चालले. कारण त्यात ‘कायनेटिक टाईम डायलेशन’ झाले.

हे उदाहरण खरंतर १९७१ मध्ये प्रयोगातून सिद्धही केले गेलेय. ते ‘Hafele and Keating एक्सपेरिमेंट’ म्हणून ओळखले जाते आणि या प्रयोगाने आईनस्टाईनने सांगितलेला ‘टाईम डायलेशन’ सिद्धांत तंतोतंत खरा आहे हे सिद्ध केले होते, पण याचा अर्थ असा नाही की वेळ खरंच हळू होत आहे त्या घड्याळासाठी जे विमानात ठेवले होते, तर याचा अर्थ असा होतो की वेळ ही एक सापेक्ष गोष्ट आहे. पृथ्वीवरून आपण ते निरीक्षण नोंदवत आहोत म्हणून आपल्या सापेक्ष तो वेळ कमी होत आहे, पण विमानात असलेल्या माणसासाठी मात्र तो त्याचप्रमाणे सुरू आहे जसा वेळ जात आहे. सैद्धांतिकदृष्ठ्या बघितले तर जर आपण असे एखादे रॉकेट बनवू शकलो की जे प्रकाशाच्या वेगाने प्रवास करू शकेल अन् जर ते रॉकेट त्याच वेगाने दहा वर्षे अवकाशात उडत राहून जेव्हा पुन्हा पृथ्वीवर येईल तेव्हा मात्र पृथ्वीवर जो वेळ असेल तो नऊ हजार वर्षांनंतरचा असेल. थोडक्यात वैज्ञानिकदृष्ठ्या आपण असे म्हणू शकतो की आपण भविष्यकाळात टाईम ट्रॅव्हल करू शकतो, पण त्यासाठी आपल्याला प्रकाशाच्या वेगाने उडू शकणारे एखादे विमान हवे असेल, जे सध्या तरी उपलब्ध नाही, पण भविष्यात टेक्नॉलॉजी प्रगत होऊन काय घडू शकेल हे आता सांगता येणार नाही.

- Advertisement -

जर असे विमान भविष्यात बनूही नाही शकले तरीही काही हरकत नाही. कारण आईनस्टाईनच्या म्हणण्यानुसार अजून एक मार्ग आहे टाईम ट्रॅव्हल करायचा आणि तो म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून. जसे वेगात गेल्याने टाईम डायलेशन होते तसेच गुरुत्वाकर्षण शक्ती कमी जास्त झाल्यानेही टाईम डायलेशन होऊ शकते. जेवढी जास्त गुरुत्वाकर्षण शक्ती तेवढे जास्त टाईम डायलेशन होते. ही संकल्पना डिटेल समजण्यासाठी 3D व्हिज्युअलायझेशन हा एक उत्तम पर्याय आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा (९.८०७ M/S2) ज्युपिटरची गुरुत्वाकर्षण शक्ती (२४.७९ M/S2 ) जास्त आहे. त्यामुळे आपण जर पृथ्वीसापेक्ष ज्युपिटरच्या जवळ जाऊ तितकाच आपल्याला वेळ हळू प्रवाही होताना दिसून येईल. थोडक्यात जरी आपण प्रकाशाच्या वेगाने उडणारे विमान नाही बनवू शकलो पण आपल्याला जर भविष्यात टाईम ट्रॅव्हल करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला काही काळ ज्युपिटरजवळ काढावा लागेल किंवा अजून अशा वस्तूजवळ जिची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा जास्त आहे. सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण शक्ती ही ‘ब्लॅक होल’ (कृष्ण विवर) मध्ये असते. तेथे वेळ अजूनच हळू होऊन जातो. हीच संकल्पना ‘Interstellar’ या सिनेमामध्येही दाखवली गेली आहे. त्यात ब्लॅक होलजवळील एका ग्रहावर घालवलेला प्रत्येक तास हा आपल्या पृथ्वीवरील सात वर्षांएवढा असतो असे दाखवले गेले आहे. एवढे टाईम डायलेशन तेथे त्या ब्लॅक होलच्या प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे घडत असते. शास्त्रीयदृष्ठ्याही ही एक खरी घटना आहे, पण तो एक चित्रपट होता आणि ब्लॅक होलच्या इतक्या जवळ कुणी राहू शकेल याबद्दल आपण आताच काही सांगू शकत नाही.

जसे भविष्यात टाईम ट्रॅव्हल संभव आहे तसेच भूतकाळातही वास्तववादी टाईम ट्रॅव्हल शक्य आहे का? तर याला उत्तर आहे नाही, पण भूतकाळातली झलक मात्र आपण बघू शकतो. याला वैज्ञानिकदृष्ठ्या पुरेसा आधार आहे. दोन खूप लांबवरच्या ठिकाणी प्रवास करायला प्रकाशाला बराच वेळ लागतो. खूप लांबवरच्या म्हणजे प्रकाशवर्ष दूर. समजा अशा एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी आपण प्रकाशाच्या आधी पोहचू शकलो आणि पुन्हा मागे त्या प्रकाशाकडे बघू शकलो तर त्या अनुषंगाने आपण भूतकाळातील गोष्टी बघू शकू. अर्थातच हे वैज्ञानिकदृष्ठ्या बरोबर असले तरीही प्रकाशापेक्षा वेगाने आपण सध्यातरी प्रवास करू शकत नाही.

आणखी एक लोकप्रिय सिद्धांत म्हणजे वर्महोल्सची संकल्पना, जी स्पेसटाईमद्वारे शॉर्टकट आहे. वर्महोल हे आपल्या विश्वातील दोन दूरच्या बिंदूंमधील बोगद्यासारखे असते जे एका बिंदूपासून दुसर्‍या बिंदूपर्यंत प्रवासाचा वेळ कमी करते. एका आकाशगंगेतून दुसर्‍या आकाशगंगेत लाखो वर्षांचा प्रवास करण्याऐवजी योग्य परिस्थितीत कोणीही सैद्धांतिकदृष्ठ्या वर्महोलचा वापर करून प्रवासाचा वेळ तास किंवा मिनिटांपर्यंत कमी करू शकतो, परंतु ते काही अजून सिद्ध झाले नाही. याव्यतिरिक्त टाईम ट्रॅव्हलची संकल्पना अनेक विरोधाभास आणि नैतिक चिंता निर्माण करते, ज्यामुळे तो एक जटिल आणि बहुआयामी विषय बनून जातो.

‘टाईम ट्रॅव्हल’च्या संबंधित काही रोचक नोंदी

GPS उपग्रह हे सदासर्वदा पृथ्वीभोवती वेगाने भ्रमण करीत असतात. तसेच पृथ्वीवरच्या वस्तूंच्या तुलनेत हे उपग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून लांबही असतात. त्यामुळे उपग्रहांवर दोन्ही प्रकारे टाईम डायलेशन घडताना दिसून येते. म्हणूनच शास्त्रज्ञांना उपग्रहांसाठी खास वेळेचे गणित करून त्यानुसार त्यातील घड्याळात वेळ सेट करून घ्यावी लागते. तसे केले नाही तर उपग्रहातील घड्याळ आणि पृथ्वीवरील घड्याळ यातील वेळेत तफावत निर्माण होऊन GPS प्रणालीच्या कम्युनिकेशनमध्ये गडबड होऊ शकते.

सर्वात जास्त वेळ ‘टाईम ट्रॅव्हल’ करण्याचं श्रेय सध्या तरी रशियाचा अंतराळवीर गेनाडी पडालका याच्या नावावर आहे. कारण अंतराळात सर्वाधिक दिवस घालवण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तो पाच मोहिमांमध्ये एकत्रित ८७८ दिवस पृथ्वीबाहेरील कक्षेत होता. तो तेथील कक्षेत प्रतिताशी २८००० किलोमीटर या वेगाने प्रवास करीत होता. सांख्यिकीयपणे बघितले असता त्याने ०.०२ सेकंद भविष्यात प्रवास केला आहे. म्हणजेच पृथ्वीवरील लोकांच्या तुलनेत आज त्याचे वय ०.०२ सेकंदाने कमी आहे.

‘टाईम ट्रॅव्हल’चा दाखला देत १९७९ साली प्रदर्शित झालेल्या सुपरमॅन या सिनेमामध्ये असे दाखवले गेले होते की सुपरमॅन प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने उडतो आणि चालू वेळेच्याही मागे जाऊन पोहचतो.

– अमोल जगताप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -