घरताज्या घडामोडीआदर्श वैद्य...

आदर्श वैद्य…

Subscribe

प्रत्येकाच्या जीवनपटात काही निवडक व्यक्ती येतात ज्यांना आपण कधीही विसरू शकत नाही. अशा खास व्यक्तिमत्त्वाची माणसे माझ्याही आयुष्यात आहेत. त्यामधीलच एक नाव म्हणजे आमच्या गावचे नावाजलेले हकीम अथवा वैद्य आणि माझ्या आजोबांचे खास मित्र इस्माईल चाचा. हिंदू, मुस्लीम अशा जातीपातीच्या बंधनात न अडकता दारावर मदत मागायला येणार्‍या रोग्यांची मनोभावे सेवा करणारे आमचे चाचा आदर्श वैद्यच होते. तसे माझे आजोबाही वैद्य होते. छोट्या छोट्या आजारांवर उपचार करायचे, परंतु इस्माईल चाचा यांचा आयुर्वेदातील व्यासंग दांडगा होता.

मी अवघी आठ वर्षांचीं असेन तेव्हा चाचांना पहिल्यांदा पाहिले. सडपातळ देहयष्टी, गोरा रंग, करडे डोळे, डोक्यावर सफेद रंगाची जाळीची गोलाकार टोपी, अंगात सुती कापडाचा खास शिवून घेतलेला कोट अन् चौकडीची नक्षी असलेली लुंगी. त्यांच्या त्या कोटाच्या एका खिशात विडीचे बंडल आणि लायटर हमखास असायचे. चाचा वैद्यकी करायचे, परंतु त्याही आधी उत्तम कव्वालीकार म्हणून त्यांची ख्याती होती. ते गावोगावी कव्वालीचे कार्यक्रम करीत हिंडायचे. तर असे हे अवलिया.

त्यांनी हे वैद्यकीचे व्रत हाती घेतले त्यासंदर्भातली रोचक गोष्ट मी माझ्या वडिलांकडून ऐकली होती. ती म्हणजे चाचा यांचे वडीलही पंचक्रोशीत उत्तम हकीम म्हणून नावारूपाला आले होते. कालांतराने त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्याजवळ नित्यनेमाने इलाज करून घेण्यासाठी येणारे बरेचसे रुग्ण त्यांच्या दरवाजावर येऊन निराशेने परतू लागले. असेच काही दिवस घडल्यावर एका रात्री चाचांच्या स्वप्नात त्यांचे वडील आले व हुकूम देत म्हणाले की, बेटा मी घेतलेले रुग्णसेवेचे व्रत, तो वारसा तू पुढे चालव. परमेश्वराला साक्षी ठेवून मनापासून काम कर. तुझ्या हाताला नक्की गुण येईल.

- Advertisement -

या प्रसंगानंतर चाचांनी आत्मविश्वासाने वडिलांच्या वैद्यकीची सर्व धुरा सांभाळायचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही ते अगदी शेवटपर्यंत. चाचांकडे लोक कावीळ, त्वचारोग, सर्पदंश, श्वान चावल्यास, पचनक्रियेसंदर्भातील तक्रारी आदी आजारांवर आयुर्वेदिक इलाज करून घेण्यासाठी यायचे. दिवस असो वा रात्र त्यांच्याकडे येणारा गर्दीचा ओघ कधीही रिकाम्या हाताने घरी परतला नाही. बरं हे उपचार चाचा विनामूल्य करायचे. लोकांच्या चेहर्‍यावरचे समाधान हीच खरी कामाची पावती असे त्यांचे ब्रीद होते. एकाही रुपयाची अपेक्षा न करता अखंड रुग्णसेवेचा हा यत्न त्यांनी सुरू ठेवला होता.

आम्ही गणपतीला गावी गेलो की चाचांकडे हमखास जाणे व्हायचे. लहानपणी त्यांच्याकडे गेल्यावर ते आवर्जून आम्हाला चॉकलेट्सचा खाऊ द्यायचे. बरं ही चॉकलेट्स खास दुबईतून त्यांच्या मुलाने पाठवलेली असल्याने त्या खाऊबद्दल विशेष अप्रूप वाटे. याव्यतिरिक्त त्यांच्या ठेवणीत असलेले सुगंधी अत्तर अगदी लाजवाब असायचे. माझे लग्न झाले त्यावर्षी मी आणि माझे पती चाचांना भेटून त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. त्यांच्या पत्नीने आम्हाला घरी बोलावून प्रेमाने पाहुणचार केला. माझ्या पतीचे कौतुक केले. निघताना एक साखरेने भरलेले ताट व एकावन्न रुपयांचा आहेर माझ्या हातावर ठेवून तोंडभरून आशीर्वाद दिला. हे आदरातिथ्य पाहून आम्ही भारावलोच. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणसाचे माणसाशी जे आपुलकीचे नाते असते ते असे. त्यामुळेच एकमेकांच्या धार्मिक सणाविषयीही आम्हाला तितकीच आस्था होती.

- Advertisement -

चाचांच्या दरवाजावर श्रीमंत-गरीब असा भेदभाव नव्हता. एखादा चारचाकी घेऊन येणारा धनाड्य इसम असो वा फाटक्या कपड्यातील गरीब गावकरी असो चाचा सर्वांवर समान उपचार करायचे आणि हो त्या श्रीमंतांकडूनदेखील कुठल्याच प्रकारचे सहाय्य न घेता विनामूल्यच उपचार करायचे. त्यामुळे अनेक गावात, गावातून शहरात प्रत्येक स्तरावर त्यांनी माणसे जोडली वा कृतज्ञतेच्या, विश्वासाच्या धाग्याने आपसूकच ती जोडली गेली. मी माझ्या आजोबांना पाहिले नव्हते. समजायला लागल्यापासून चाचांची प्रतिमाच आजोबांच्या जागी दिसली. आमच्या कुटुंबाबद्दल त्यांना विशेष लळा होता. कधी चुकून त्यांची भेट घेतली नाही तर हक्काने रागवायचे. नेहमी मायेने विचारपूस करायचे. वडीलधारी व्यक्ती म्हणून सल्ला द्यायचे.

हा लेख लिहिताना चाचांसोबतच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला, परंतु आता ह्या लेखाच्या शेवटच्या टप्प्यात उतरताना जीव कासावीस होतोय. कारणही तसेच आहे. गणपती सणाचे दिवस म्हणजे सप्टेंबर महिना होता. मी, माझे वडील, पती व मुले सर्व मिळून सालाबादप्रमाणे त्यांना भेटायला गेलो. चाचा सवयीप्रमाणे त्यांच्या घरासमोरील
दर्ग्याजवळ बसले होते. तिथे बसून ते रोज नमाज पठन करीत व येणार्‍या प्रत्येक रुग्णाच्या, आप्तेष्टांच्या उत्तम आरोग्य, आयुष्यासाठी प्रार्थना करीत असत. मी व माझे कुटुंबीय जातीभेद पाळत नाहीत. आमच्यासाठी ईश्वरी शक्तीचा, सकारात्मकतेचा अंश मग तो जिथे कुठे, कुठल्याही धर्मात असो तो वंदनीयच आहे. तर आम्ही दर्ग्यावर डोके टेकवून प्रार्थना केली. समोर बसलेल्या चाचांना प्रेमाने साद घालून विचारले की, चाचा, तब्येत कशी आहे. बेस हाव ना..?
कारण त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. चाचांनी डोळ्यांत पाणी आणून म्हटले की, बाय माझा काय खरा नाय आता. माझ्या माघारी इथे येत राव्हा. इसरू नका ह्या वास्तूला.

जणू काही आपला मृत्यू होणार आहे याची चाहूल त्यांना लागली होती. त्यांचे ते शब्द ऐकल्यावर मलाही अश्रू अनावर झाले. आजोबा- नातीच्या ऋणानुबंधांचा धागा त्या अश्रूत भिजत होता. मनाला कसेबसे आवरत चाचांना नमस्कार करून साश्रू नयनांनी निरोप दिला. बाहेर कोसळणार्‍या पावसात दु:खी अंतकरणातले दोन थेंब मिसळून जड पावलं उचलत घर गाठले. त्यानंतर बरोबर दोन महिन्यांनी म्हणजे डिसेंबरमध्ये गावाहून निरोप आला, चाचा वारले. हे होणार आहे ह्या गोष्टीची कल्पना होती, तरीही प्रत्यक्ष घटना घडल्यावर मात्र भयंकर अस्वस्थता जाणवली. अचानक आयुष्यातील जवळची व्यक्ती देहरूपातून मुक्त होऊन आपल्याला सोडून निघून जाते त्यावेळी जी भयानक अवस्था निर्माण होते ती अनुभवणे म्हणजे जिवंतपणी नरकच. या धक्क्यातून बाहेर यायला काळ हेच औषध असते.

चाचांना जाऊन आता दोन वर्षे झाली. अजूनही गावी गेल्यावर त्यांना शब्द दिल्याप्रमाणे त्यांच्या धार्मिक वास्तूला आम्ही भेट देतो. त्यांच्या आवडीची मिठाई तिथे प्रसाद म्हणून ठेवतो. माझी नजर इस्माईल चाचांना शोधत असते. मग दर्ग्याशेजारी बसून चाचा गालात स्मित करीत आमच्याकडे पाहत आहेत असा भास होतो अन् ऋणानुबंधांच्या रेशमी वस्त्राचा धागा आणखी एक वीण घेतो. वाचकहो, तुमच्याही आयुष्यात अशी अविस्मरणीय व्यक्ती जरूर असेल, नाही का?

-कस्तुरी देवरुखकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -