घरताज्या घडामोडीअस्वस्थतेचा गीतकार पीयूष मिश्रा

अस्वस्थतेचा गीतकार पीयूष मिश्रा

Subscribe

एकच व्यक्ती सर्व क्षेत्रात उत्तम असू शकत नाही. काही वर्षांत एखादाच असा व्यक्ती येतो जो एकाचवेळी विविध क्षेत्रात निपुण असतो. बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर सुरुवातीच्या काळात काम करणारे बहुतांश लोक, हे त्याच प्रकारातले होते. अभिनेता, गायक, दिग्दर्शक अशा विविध भूमिका साकारणारी अनेक माणसं आपण अनुभवली आहेत. ज्या व्यक्तीबद्दल आज लिहितोय, तो व्यक्तीदेखील एक उत्तम अभिनेता, गायक, कवी, संवाद लेखक आणि गीतकार आहे. त्याच्या गीतकार या एकाच पैलूवर लिहिताना बाकी सगळ्या गोष्टींकडे इच्छा नसतानाही दुर्लक्ष करावं लागणार आहे, कारण हे नाव गीतकार म्हणून संख्येत जरी कमी असलं तरी दर्जात मात्र अव्वल आहे. पीयूष मिश्रा, हे नाव कॉलेजच्या पोरांना नक्कीच माहिती असणार, निवडणुका आल्या की नेत्यांच्या प्रमोशनल व्हिडीओमध्ये ऐकू येणारं पीयूष मिश्रा यांनी लिहिलेलं आणि गायलेलं गाणं, ‘आरंभ है प्रचंड’ कुणी ऐकलं नसेल असं शक्य नाही, पण या एकाच गीतापुरता त्यांचा गीतकार मर्यादित नाहीये, पीयूष मिश्रा हे ते नाव आहे ज्याने कधीकाळी पार्लेजीसाठी ‘रोको मत,टोको मत’ लिहिलं होतं, तर कधी ब्लॅक फ्रायडेसाठी...

२००० साली आलेल्या ‘पागल’ पासून ते मागच्यावर्षी आपटलेल्या ‘शमशेरा’मधील हुंकारापर्यंत, पियुष मिश्रा विद्रोहाचा गीतकार आहे. जो दुःख मांडतो, जो प्रेम नाकारून बंड स्वीकारतो. कोक स्टुडिओमधलं हुस्ना, घर असो किंवा गँग्स ऑफ वासेपूरमधलं एक बगल में चांद होगा, पियुष मिश्राच्या गाण्यात दुःख, विरह, प्रेम आणि विद्रोह हे सगळं एकत्र पहायला मिळतं. आपल्या समकालीन गीतकारांपेक्षा पियुष मिश्रा काहीसे वेगळे आहेत, त्यांच्या गाण्यात येणारे शब्द हे बोलीभाषेतले असतातच, पण त्यातही ते असे असतात, जे तुम्ही याआधी कुठल्या एखाद्या गाण्यात ऐकले नसतील. डाव्या विचारसरणीशी संबंध असल्याने त्यांच्या गाण्यात राजकीय विषयावर भाष्य असतेच आणि त्यामुळे त्यांचं प्रत्येक गाणं काहीसं खास बनतं.पियुष मिश्राच्या गाण्यांच्या बाबतीत सगळ्यात जास्त भावणारी गोष्ट म्हणजे, त्यांनी लिहिलेलं गाणं जर ते स्वतःच गात असतील तर त्याची मजा काही और असते.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिकलेल्या पियुष मिश्रा यांना सहवास लाभला तो NK शर्मा यांचा आणि तिथंच त्यांच्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव पडला, जो आजही त्यांच्या गाण्यातून आपल्याला दिसतो. २००० साली पहिल्यांदा गीतकार म्हणून पियुष मिश्राने दिल पे मत ले यार सिनेमासाठी ‘पागल’ नावाचं गाणं लिहिलं, पण ना गाणं चाललं ना सिनेमा.. त्यांना गीतकार म्हणून ओळख मिळाली ती तब्बल ७ वर्षांनी .. हे तेच वर्ष होतं जेव्हा ब्लॅक फ्रायडे रिलीज झाला आणि त्या सिनेमासाठी सगळी गाणी इंडियन ओशन सोबत लिहिली ती पियुष मिश्रा यांनी.. याच सिनेमातलं ‘अरे रुक जा रे बंदे’ हे गाणं आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये सापडतं. गाण्याच ते कडवं ज्यात ‘अरे मंदिर यह चुप है, अरे मसज्जिद यह गुमसुम, इबादत तक पड़ेगी हो, समय की लाल आँधी, कब्रिस्तान के रास्ते, अरे लटपट चलेगी हो’ हे तर कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही. केवळ अंगावर शहरे आणणारे शब्द लिहिणंच ही पियुष मिश्रांची खासियत नाही, म्हणूनच अनेक व्यावसायिक सिनेमातदेखील त्यांची गाणी येतात आणि तीदेखील लोकांना आवडतात. उदाहरणादाखल त्यांनी आजा नचलेचे टायटल साँग लिहिलेलं, जे अनेकांना माहिती नसेल.

- Advertisement -

नवाजुद्दीन , मनोज वाजपेयीसाठी लिहिणार्‍या या गीतकाराने माधुरी दीक्षित, रणबीर कपूर यांच्यासाठीदेखील लिहिलंय. याच व्यावसायिक सिनेमांमधील आणखी एक गाणं जे हिट झालं ते म्हणजे विशाल दादलानीच्या आवाजातलं टशन सिनेमाचं टायटल साँग, हा सिनेमा रिलीज होऊन १५ वर्षे उलटली तरी हे गाणं लक्षात आहे. सिनेमा कुणाचा? त्यात काय झालं? यापेक्षा अधिक तर हे गाणं चाललं. यशराज फिल्म्ससाठी बर्‍याचवेळा गाणी लिहिण्याची संधी पियुष मिश्रा यांना मिळाली, आजा नच ले पासून ते मागच्यावर्षी आलेल्या समशेरापर्यंत यशराज बॅनरच्या अनेक सिनेमांसाठी पियुष मिश्राने गाणी लिहिलीत आणि तीसुद्धा गाजलीत. गीतकाराचं एक गाणं कधी कधी त्याला ओळख मिळवून देतं, ते गाणं कदाचित त्याने लिहिलेलं सर्वोत्तम गाणं नसेलही, पण लोकांना आवडलं तर तेच त्याच सर्वोत्तम गाणं म्हणून ओळखलं जातं.

पियुष मिश्रा हे नाव गीतकार आणि गायक म्हणून लोकांपर्यंत पोहोचलं ते गुलाल सिनेमातल्या गाण्यांमुळे, याच सिनेमातील ‘आरंभ है प्रचंड’ गाणं ऐकलं नसेल असा कदाचितच एखादा युवक तुम्हाला सापडेल, पण गुलालमध्येच पियुष मिश्रांनी काही खास गाणी लिहिलीत, ज्यांचा अर्थ आरंभ है प्रचंड पेक्षाही अधिक महत्वाचा होता, साहिर लुधियानवी यांना श्रद्धांजली म्हणून लिहिलेले याच सिनेमातील ‘दुनिया’ हे गाणं ऐकलं की झोप उडते आणि माणूस विचार करायला लागतो. बॉलिवूडचे इतर गीतकार जिथं त्यांच्या शब्दातून आपल्याला स्थैर्य, आराम, शांतता, प्रेम असं काहीसं देण्याचा प्रयत्न करतात, तिथं पियुष मिश्रांची गाणी नीट ऐकली तर माणसाला झोप लागत नाही, त्यांचे शब्द भिडतात आणि विचार करायला लावतात. गल्लीतला कुत्रा, रस्त्याचं गटार आणि असे अनेक विशेषणे जी व्यावसायिक सिनेमांच्या गाण्यांत आपण कधीच ऐकलेली नसतात, ती पियुष मिश्रांच्या गाण्याची खासियत आहे.

- Advertisement -

गँग्स ऑफ वासेपूर सिनेमा पियुष मिश्रासह अनेक कलाकारांसाठी खास होता, हा एक असा सिनेमा आहे ज्याने आपल्याला अनेक उमदा अभिनेते दिले. याच सिनेमासाठी पियुष मिश्राने लिहिलेली गाणी गाजली, त्यातलं पहिलं गाणं म्हणजे इक बगल में चांद या गाण्यात त्यांनी वापरलेली भाषा आणि विशेषणं खास होती. ‘इक बगल में नींद होगी, इक बगल में लोरियाँ, हम चाँद पे रोटी की चादर डाल कर सो जाएँगे और नींद से कह देंगे लोरी कल सुनाने आएँगे’ या एका ओळीत त्यांनी जे काही मांडलंय ते विचार करायला लावणारं आहे. याशिवाय गँग्सच्या दोन्ही भागात त्यांनी कह के लुंगा, बहुत खूब, इलेकट्रीक पिया आणि मनमौजी अशी गाणीदेखील लिहिली आहेत. सिनेमाच्या गाण्यांव्यतिरिक्त त्यांनी कोक स्टुडिओसाठी डॆहील काही गाणी रेकॉर्ड केलीत, ज्यातलं हुस्ना हे माझं आवडतं गाणं. या गाण्याचेही लिरिक्स खास आहेत, पाकिस्तानात असलेल्या आपल्या प्रेयसीला भारतातून प्रियकर पत्र लिहितो आणि त्यात तो प्रश्न विचारतो ‘रोता है रातों में पाकिस्तां क्या वैसे ही जैसे हिन्दोस्तां ओ हुसना’ गाण्याच्या या एका ओळीत पियुष मिश्रांच्या लेखणीची ताकद दिसते. पियुष मिश्रा हे गीतकार आहेत, पण ते आपल्याला स्वप्नात शांत झोपू देत नाहीत, ते प्रेयसीला खिलता गुलाब म्हणत नाही, ना त्यांना कुठली सुंदर विशेषणं देतात. त्यांचे शब्द चढलेली उतरवतील आणि अस्वस्थ करतील, म्हणून हा अस्वस्थतेचा गीतकार आहे.

– अनिकेत दिगंबर म्हस्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -