घरफिचर्ससमाजसुधारक अनंत हरि गद्रे

समाजसुधारक अनंत हरि गद्रे

Subscribe

अनंत हरि गद्रे हे वार्ताहर, लेखक, नाटककार व थोर समाजसुधारक होते. त्यांना नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक मानले जाते. त्यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1890 रोजी कोकणातल्या देवरूख या गावात झाला. अनंत हरी गद्रे शिक्षणासाठी पुण्यात आले. येथे त्यांचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन महाविद्यालय अशा नामवंत ठिकाणी झाले. राम गणेश गडकरी व श्री. म. माटे हे त्यांचे सहाध्यायी होते. अनंत हरी गद्रे नाट्यसृष्टीत येण्यापूर्वी मराठी रंगभूमी ही मोठ्या नाटकांची होती. तेव्हाचे नाटक पाच सात अंकांचे आणि रात्रभर चालणारे असे. लोकांना त्याची सवय झाली होती. दरम्यानच्या काळात तीन तासात भरपूर मनोरंजन करणारे बोलपट आले आणि लोक नाटके पहायच्याऐवजी सिनेमे पाहू लागले.

तशातच संगीत नाटकांत गाण्यांना दिलेल्या ‘वन्समोअर’मुळे रेंगाळत चाललेल्या गाण्यांचाही लोकांना कंटाळा येऊ लागला. परिणामी मराठी रंगभूमी संकटात सापडली. अशा रंगभूमीच्या पडत्या काळात रंगभूमीला सावरण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांपैकी अनंत हरी गद्रे हे एक होते. रात्रभर चालणार्‍या नाटकांपेक्षा गद्रे यांनी एक, दीड ते तीन तासात संपणार्‍या नाटिका लिहायला सुरुवात केली. त्यांच्या प्रेमदेवता या पहिल्या नाटिकेचा १ ऑगस्ट १९३० रोजी बालमोहन संगीत मंडळीने केलेला पहिला प्रयोग हा, या नाटिकेच्या वेगळेपणामुळे आणि त्याला लागणार्‍या कमी वेळामुळे प्रेक्षकांना पसंत पडला. त्यांच्या नाटिकांचे प्रयोग ‘नूतन संगीत मंडळी’ आणि गद्रे यांनी स्थापित केलेली ‘मुंबई नाटिका संगीत मंडळी’ या अन्य नाट्यसंस्थाही करीत असत.

- Advertisement -

गद्रे यांच्या कार्याला दिशा मिळाली, ती लोकमान्य टिळक मंडालेचा कारावास संपून १९१४ मध्ये पुण्यात परतले तेव्हापासून. टिळकांच्या राजकारणात त्यांना आपण मदत करावी असे त्यांना वाटू लागले. दरम्यान, चरितार्थासाठी त्यांनी सुगंधी द्रव्याचे एक दुकानही काढले होते. पत्रकारिता हे टिळकांचे राजकारण चालवण्याचे साधन होऊ शकते याचा साक्षात्कार त्यांना अच्युतराव बळवंतराव कोल्हटकर यांच्यामुळे झाला. अच्युतराव खंदे टिळकभक्त व हाडाचे पत्रकार. गद्रे यांनी अच्युतरावांना गुरुस्थानी मानले व ‘संदेश’मधूनच पत्रकारितेचे धडे गिरवले. १९२२ मध्ये सुरू झालेल्या मौज या साप्ताहिकातील त्यांची संपादकीयेही लोकप्रिय झाली. १९३४ मध्ये सुरू केलेल्या ‘निर्भीड’ या आपल्या दुसर्‍या साप्ताहिकातून गद्रे यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार करीत स्पृश्यास्पृश्यता आणि केशवपनासारख्या वाईट चालींवर कडाडून टीका केली.

दलित आणि सवर्णांमधील सामाजिक दरी मिटवण्यासाठी ‘झुणका-भाकर चळवळी’सारखे प्रयोग गद्रे यांनी केले. ‘झुणका-भाकर’ चळवळीमध्ये समाजाच्या सर्व थरांतील, सर्व जातींचे लोक एकत्र येऊन भोजन करीत असत. झुणका-भाकर सहभोजन आणि स्पृश्यास्पृश्य सत्यनारायण ही दोन तंत्रे त्यांनी त्यासाठी वापरली. सामाजिक क्षेत्रांत सहासन, सहभोजन, सहपूजन, सहवसन आणि सहबंधन (आंतरजातीय विवाह) या पंचशीलांचा पुरस्कार गद्रे यांनी केला. अशा दृष्ठ्या समाजसुधारकाचे ३ सप्टेंबर १९६७ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -