घरफिचर्सजागतिक आरोग्य संघटनेचे भवितव्य

जागतिक आरोग्य संघटनेचे भवितव्य

Subscribe

जागतिक पातळीवर करोनाने धुमाकूळ घातला असताना संयुक्त राष्ट्रसंघाचे काय सुरू आहे, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. त्याला कारणही तसेच आहे. जगभर करोनाने युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली आहे. महासत्ता अमेरिकेपासून युरोप, चीनपर्यंत अनेक देश आज या करोनाशी झुंजत आहेत. अशावेळी जगभर शांतता राहावी, कुठेही युद्ध होऊ नये, या गरिब विकसनशील देशांनाही विकासाची फळे चाखायला मिळावीत, त्यांना स्वातंत्र्य मिळावे या उद्देशाने स्थापन झालेला संयुक्त राष्ट्रसंघ, अशा परिस्थितीत काय करतोय, हे विचारणे स्वाभाविकच आहे. विशेषत: संयुक्त राष्ट्रांचा इतिहास पाहिला तर या आतापर्यंत कुठलेही युद्ध थांबवता आलेले नाही. उलट जागतिक नेते म्हणवणार्‍या देशांनी नेत्यांनी आपापले मतलब साधण्यासाठी हाती आलेल्या अधिकाराचा वापर केला. आपल्या हस्तक छोट्या देशांना हाताशी धरून आपली सत्तेची साठमारी चालू केली आणि त्यामुळेच आज जगाचे प्रश्न समजू न शकणारे लोक अशा संस्थांचे म्होरके होऊन बसलेले आहेत. महाशक्ती वा पुढारलेले देश होते, त्यांच्याच कलाने जग चालत होते.

तिथल्या राजकीय संकल्पना व वैचारिक तात्विक भूमिका उर्वरित जगावर राष्ट्रसंघाच्या माध्यमातून लादल्या जात होत्या. पुढे त्यांना संस्थात्मक व कायद्याचे रुप देण्यासाठी विविध जागतिक करार झाले आणि त्यातून आणखी अनेक आंतरराष्ट्रीय संस्था संघटना अस्तित्वात आल्या. डब्ल्यूएचओ किंवा जागतिक आरोग्य संघटना त्यापैकीच एक आहे. जगाला भेडसावणार्‍या आरोग्य विषयक समस्यांचे एकत्रित उपाय करण्यासाठीची ही संघटना मागल्या काही दशकात निरूपयोगी ठरलेली आहे. करोनाने तर तिचे पुरते वस्त्रहरण केले आहे. ह्या नव्या विषाणूचा उद्भव किंवा फैलाव आणि त्याने महामारी भयावह रूप धारण करण्यापर्यंत ही संघटना काहीही करू शकलेली नव्हती. म्हणून आज अवघ्या जगाला करोनाने विळखा घातला आहे. चीनमध्ये त्याचा उदभव झाला आणि परिस्थिती क्रमाक्रमाने हाताबाहेर होत गेली, तरी जागतिक आरोग्य संघटना जगाला पुर्वसूचना देऊ शकली नाही. वेळीच कुठले निर्णय घेऊ शकली नाही. कारण ती संघटना सर्व देशांचे प्रतिनिधीत्व करीत नसून तिथे स्थानापन्न झालेल्या मुठभरांचे हितसंबंध जपणार्‍या वा पोसणार्‍या श्रीमंत देशांसाठी ही संस्था आतापर्यंत काम करत राहिली. त्यामुळे आज अवघ्या जगासाठी ती पुरती निरूपयोगी ठरली आहे.

- Advertisement -

याच जागतिक आरोग्य संघटनेचे म्होरके चीनच्या इच्छेसमोर झुकले आणि त्यांनीच अवघ्या जगाला करोनाच्या फैलावाच्या शक्यतेविषयी अंधारात ठेवलेले आहे. त्याचे परिणाम कोट्यवधी लोकांना भोगावे लागत आहेत. सुदैव असे, की जे देश जागतिक आरोग्य संघटनेकडून इशारा मिळण्यापर्यंत वा घोषणा होण्यापर्यंत थांबले नाहीत, त्या देशांना करोना फारसा भेडसावू शकलेला नाही. उलट जागतिक आरोग्य संघटना किंवा तत्सम राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने मागल्या सात दशकात उभ्या राहिलेल्या तशाच जागतिक संघटनांच्या आहारी गेलेल्या देशांना करोनाने पुरते जमीनदोस्त करून टाकलेले आहे. त्यांना आपल्यावर येऊ घातलेले संकट ओळखता आले नाही, की उपायही वेळीच अंमलात आणता आले नाहीत. उलट जागतिक आरोग्याने महामारी जाहीर केल्यावर वेळ गेलेली होती. ३० डिसेंबर रोजी पहिला रुग्ण मिळाल्याचे स्पष्ट होऊनसुद्धा त्याविषयी कोणतीही माहिती चीन सरकारतर्फे देण्यात आली नव्हती. पण शहरातील परिस्थिती ढासळत होती हे उघड होते. अखेर २३ जानेवारी रोजी शी झेन्ग ली या महिला शास्त्रज्ञाने वुहानमध्ये पसरलेला व्हायरस वटवाघुळामुळे पसरला असल्याचा निष्कर्ष एका पेपराद्वारे जारी केला. हा पेपर पुढे ३ फेब्रुवारीच्या अंकामध्ये नेचर या नियतकालिकाने छापला आहे.

शी झेन्ग ली वुहान शहरातील व्हायरॉलॉजी संस्थेमध्ये या विषयावर संशोधन करतात. त्यांच्यासोबत काम करणार्‍या चमूने असे म्हटले होते की वुहानमध्ये मिळालेला व्हायरस आणि सार्सचा विषाणू हे दोन्ही मानवी शरीरात प्रवेश मिळवण्यासाठी एकच ‘चावी’(पासवर्ड) वापरतात. वटवाघुळात मिळणार्‍या व्हायरसशी या व्हायरसचा जिनोम क्रम ९६.२% मिळताजुळता आहे. हे प्रसिद्धीस देणार्‍या शी झेन्ग ली यांनी जणू असे सूचित केले होते की विषाणूचा संसर्ग नैसर्गिकरित्या झाला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष विषाणूच्या रोग्यांवरून उडून वुहान शहरातील समुद्री जीव विक्रीच्या बाजाराकडे वेधण्यात आले. या बाजारामुळे साथ आली असल्याच्या निष्कर्षाला चीनच्या सरकार दरबारी मान्यता मिळू लागली. खरे म्हणजे या बाजारात समुद्री जीव विकले जातात व तिथे वटवाघुळे विकली जात नव्हती हे सत्य आहे; पण त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्याची पद्धती अवलंबली गेली. उपचारासाठी येणार्‍या रूग्णांना देखील तुम्ही यापूर्वी वुहान बाजारामध्ये कधी गेला होतात – गेला नसाल तर तुम्हाला हा रोग नाही असे म्हणून परत पाठवले जात होते. अशा तर्‍हेने एक वातावरण तयार करण्यात आले. साहजिकच रोगाच्या लागणीविषयी लोक जागृत होऊ नयेत म्हणून लक्ष भलतीकडे वळवण्याचे काम जणू चालू होते. या घोषणेसोबतच वुहान शहरात संपूर्ण संचारबंदी २३ जानेवारी रोजी घोषित करण्यात आली.

- Advertisement -

खरे म्हणजे ज्या विषाणूचा संसर्ग होताना दिसत होते त्याच्याच अभ्यासामध्ये संस्थेचे शास्त्रज्ञ संशोधनाचे काम करत होते. मग हा संसर्ग तिथून तर झाला नाही ना ही शंका प्रथम यायला पाहिजे होती. अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांनी त्यावरील उपायाबद्दल सोडा पण निदान त्याच्या लागणीबाबत सरकारी वैद्यकीय सेवेला सतर्क करायला हवे होते. असे काहीही होताना दिसले नाही. उलट संस्थेकडील सर्व व्हायरसचे नमुने सीलबंद करण्यात आले. आपल्याकडे सुमारे १४०० हून अधिक नमुने असल्याचे ही संस्था एककाळ अभिमानाने सांगत असे – परंतु वेळ येताच या संबंधीचे ट्विट डिलिट करण्यात आले. नमुने सीलबंद करण्याने काय झाले? साथीच्या बातम्या येत होत्या पण जागतिक आरोग्य संघटनेने त्याकडे सोयीस्कर डोेळेझाक केली. चीननमुने सील करून तज्ज्ञांच्या हाती काही लागता नये याची तरतूद केली गेली. याच सुमाराला राष्ट्रीय टीव्ही वाहिन्यांवरून साथीबद्दल स्पष्टपणे बोलणार्‍या डॉक्टर मंडळींची निंदानालस्ती सुरू झाली.

अशा तर्‍हेने खर्‍या बातम्या दडपल्या जाऊ लागल्या. चीनमध्ये यापूर्वी आलेल्या मोठ्या साथी हाँगकाँग शहराजवळील ग्वाँगडाँग प्रांतामधून पसरत असत असे दिसते. पण ही साथ मध्यवर्ती भागामधून अन्यत्र पसरत होती. ही बाब विचित्र होती. आणि तेही असे एक स्थान जिथून व्हायरस संशोधनाची संस्था अवघ्या काही किलोमीटरवर काम करते. जर हा व्हायरस नैसर्गिक अपघाताने पसरला असेल तर ही लपवाछपवी चीन सरकारला का बरे करावी लागत होती? चीन लपवालपवी करत असतानाही जागतिक आरोग्य संघटना मात्र चीनची बाजू घेण्यात मग्न होती. चीनला त्यांना टोकले नाही की, त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली नाही. त्याचा परिणाम असा झाला की, करोना जगभर पसरला. ज्या उद्देशाने जागातिक आरोग्य संघटना स्थापन झाली होती तिलाच हरताळ फासण्यात आला. आता जगभर जागतिक आरोग्य संघटनेबद्दल मत तयार होऊ लागले आहे. त्यामुळे आगामी काळात ही संघटनाच बरखास्त झाली तर फारसे नवल वाटायला नको.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -