घरफिचर्ससत्तालोलुपांचा पक्ष!

सत्तालोलुपांचा पक्ष!

Subscribe

भारतीय राजकारणात संघाची विचारधारा घेऊन उतरलेल्या भारतीय जनता पक्षाचा पसारा जसजसा वाढतो आहे तसतसा त्या पक्षातल्या शिस्तीला उतरती कळा येत आहे. कोणीही उठावं आणि भाजपत प्रवेश करावा आणि भाजपच्या बड्या नेत्यांनी अशा व्यक्तींचं भरभरून स्वागत करावं, असं चित्र खुलेआम दिसू लागलं आहे. इतर पक्षांमध्ये तुम्ही काहीही करा, तिथे तुम्ही नालायक असाल पण आमच्याकडे आलात की पावन होता, असं सूत्र भाजपने अंगिकारलं आहे. करून करून भागलो देवपूजेला लागलो, असं हे भाजपतलं चित्र आहे. म्हणूनच कोणालाही त्या पक्षात प्रवेशाचे मार्ग खुले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपमध्ये प्रवेश घेतलेल्यांची जंत्री पाहता त्या पक्षाला आणि पक्षाच्या नेत्यांना अशा व्यक्तींना पक्षात प्रवेश दिल्याबाबत काहीही वाटत नाही. इतर राजकीय पक्षांना दुषणं देणारी भाजपची मंडळी आता उघडपणे या बदमाशांचं समर्थन करताना दिसत आहेत. पूर्वी हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत घडायचं. आता ते भाजपत खुलेआम घडत आहे. हा घातक पायंडा आहे, हे कोणीतरी भाजप नेत्यांना सांगण्याची आवश्यकता आहे. शिस्तीचा पक्ष म्हणून ज्या पक्षाचा बोलबाला होता तो आता पुसू लागलाय. सत्तेचा वापर करायचा. गडगंज कमाई करायची आणि कारवाईची शक्यता दिसू लागताच सत्तेवर येईल त्या पक्षात घुसायचं असं गणित सध्या राज्यात सुरू आहे. काँग्रेस राजवटीत त्या पक्षाबरोबर एकनिष्ठ असलेले सत्ता जाताच टोपी फिरवून भाजपच्या कळपात येऊन बसले. ही लोकं इतकी निर्लज्ज आहेत की त्यांना कशाचं काहीच वाटत नाही. कालचे सभापती आजचे टोपीबदलू होऊ शकत असतील तर कोणाकडून काय अपेक्षा कराव्यात? आत्मसन्मान तर या सगळ्यांनी केव्हाच वेशीवर टांगला आहे. विशेष म्हणजे कुठलीही नीतीमत्ता न राखता भाजपचे नेते अशा व्यक्तींना प्रवेश देताना मागचं पुढचं पाहत नाहीत. भारतीय जनता पक्ष यापूर्वी इतक्या खाली आला नव्हता. अटलबिहारी वाजपेयी यांचं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार देशात होतं. त्याच काळात महाराष्ट्रात युती सरकार कार्यरत होतं. तेव्हाही पक्ष प्रवेशाची अशी रीघ होती. पण तेव्हाच्या भाजपने या बदमाशांना संधी दिली नाही. कारण तेव्हा पक्षात आणि सरकारमध्येही शुचिर्भूतता जागृत होती. तेव्हा कारवायाच्या धमक्या दिल्या जात नव्हत्या. मुख्यमंत्री सेनेचा असूनही त्या पक्षाने आणि त्या पक्षाच्या मुख्यमंत्र्याने माजोरी दाखवली नव्हती. आज भाजपकडे लागलेली रीघ पाहता भाजप कुठल्या थराचं राजकारण करतो आहे, ते स्पष्ट दिसतं.
पक्षाचं बदलतं स्वरूप त्याला कारण असावं. ही रुपं अनेक आहेत. एक तर पक्षाची शिस्त बिघडलीच आहे. आणि दुसरं म्हणजे सत्तेसाठी काहीही, हे गणित भाजपने पध्दतशाीर अंगिकारलं आहे. संघाच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांच्या पक्षाला सत्तेची इतकी हाव लागली की आता भाजपचे कार्यकर्ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. अगदी मुख्यमंत्रीच २५ वर्षे मीच मुख्यमंत्री असं सांगत असतील तर इतरांनी काय घोडं मारलंय? पूर्वी जे चित्र काँग्रेस पक्षाचं होतं त्याहून अधिक ते भाजपचं झालं आहे. पक्ष प्रवेशासाठी काँग्रेसकडून कोणावर ईडीची आणि सीबीआयची पिडा आल्याचं आठवत नाही. सत्ता मिळालेल्या भाजपने हे सगळे मार्ग पध्दतशीर अवलंबले आहेत. सत्ता राबवण्यासाठी भाजपचे नेते या थराला जातील, असं वाटत नव्हतं. आजची स्थिती ही भाजपच्या एकूणच शुचिर्भूततेचा पोलखोल करणारी आहे. इतर पक्षांमध्ये राहून घोटाळे केलेले नेते सत्ताधारी पक्षांमध्ये का जातात? कारण त्यांनी बिघडवलेल्या हिशोबाची आणि केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची त्यांना भीती वाटत असते. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यावर ज्या नेत्यांनी त्या पक्षात प्रवेश घेतला त्यांचा इतिहास असाच काळवंडलेला आहे. मनसेने ज्यांचं पुनर्वसन केलं ते प्रवीण दरेकर असोत की मुली पळवून नेण्याची भाषा करणारे राम कदम असोत. ही माणसं एकाच माळेतील. आता विजयसिंग मोहिते, राधाकृष्ण विखे, मधुकरराव पिचड, लक्ष्मणराव ढोबळे या लक्ष्मणाचा अवतार समजणार्‍या नेत्यांचे हात दगडाखाली आहेत. मूळ पक्षाला सोडून भाजपवासी झालेल्या या सगळ्यांच्या कुंडल्या भाजपच्या म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहेत. त्यांनी अचानक भाजपत प्रवेश का केला याचं उत्तर ते ज्या संस्थांशी संबंधित आहेत त्या संस्थांच्या चौकशीत अडकलं आहे. सामान्य ठेवीदारांच्या पैशांची वासलात लावणार्‍या इतर बँकांच्या मुसक्या आवळण्याची भाषा करणार्‍या भाजपला मुंबई मध्यवर्ती बँक दिसली नाही. भाजपला या बँकेत झालेला भ्रष्टाचार माहीत नव्हता, असं अजिबात नाही. त्यांना ते चांगलं ठावूक होतं. चौकशीचा ससेमिरा लावून तिथल्या पदाधिकार्‍यांना नामोहरम करायचा एककलमी कार्यक्रम भाजपने राबवला आणि त्याची फलश्रृती या नेत्यांच्या भाजप प्रवेशात झाली. आता हे नेते भाजपच्या व्याख्येत भ्रष्टमुक्त झाले. इतरांच्या भ्रष्टाचारावर तोंड फोडून बोलणार्‍या किरीट सोमय्या आणि आशिष शेलार यांचे ते जिगरी दोस्त बनले. घाटकोपरचे आमदार राम कदम यांचा प्रवेश भाजपसाठी तेव्हा चर्चेचा ठरला होता. भर विधान भवनात एका पोलीस अधिकार्‍याला बदडणारे म्हणून कदम ओळखले जातात. त्यांच्या मालमत्तेविषयी अनेकदा चर्चा होत असते. एकेकाळी भाजपच्या आर्थिक कमाईचे कदम हे सूत्रधार मानले जातात. मनसेला ठोकरून कदम भाजपमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांच्या एकूण ‘उद्योगा’ची पंचाईत स्पष्ट दिसत होती. कार्यकर्त्यांहून पक्षाला पैसे प्यारे ठरू लागल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या विरोधाला किंमत राहिली नाही.
केंद्रात सत्ता आल्यावर माजी मंत्र्यांपैकी बबनराव पाचपुते, विजय गावित, सुनील देशमुख, शिवाजीराव नाईक असे अनेकजण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपवासी झाले. त्यांच्या प्रवेशाच्या कहान्या अनेक आहेत. सत्तेत असताना अनेक आरोप या मंत्र्यांवर झाले. त्या प्रकरणांची चौकशी झाली तर नको ते बालंट यायचं या भीतीने त्यांनी सत्तेचा आसरा घेतला. राजकारणात उट्टं काढण्याची पध्दत नव्हती. आता भाजपचं राजकारण वेगळंच आहे. तो पक्ष कोणाचीही चौकशी करू शकतो. कोणालाही आत टाकू शकतो, याची खात्रीच या नेत्यांना पटली आहे. विरोधकांचीच काय पण आपल्या सहकारी शिवसेनेचीही गय भाजप करत नाही, हे अनेकदा स्पष्ट झालं आहे. मुंबई महानगरपालिकेत पारदर्शी कारभार व्हावा, असं सांगणारे त्यांच्याच पक्षाचे नेते सीबीआय चौकशीच्या
धमक्या देत होते. मुंबईतल्या सत्तेत शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून भाजपचे नेते बसले होते. तेव्हा त्यांना पारदर्शकतेचा पुळका आला होता. ही पारदर्शकता कशाने खातात हे भाजपने सांगावं हे अजबच म्हटलं पाहिजे. दुर्दैवाने गैर काम केलेल्या या नेत्यांच्या अगतिकतेचा फायदा भाजपने आणि त्यांच्या नेत्यांनी घेतला आहे. एखाद्याचा राग त्याच्यावर अनेक चौकशा लावून प्रगट केला जातो. ती व्यक्ती हैराण झाली की पक्षात येण्याचा मार्ग मोकळा. अशी ही खेळी याआधीच्या युती सरकारच्या काळातही नव्हती. शिवसेनाप्रमुखांनी अशा खुनशी राजकारणाला कधी थाराच दिला नाही. आता मात्र सत्तेच्या नाड्या भाजपच्या हाती असल्याने त्यांचं राजकारण नको त्या वळणावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -