घरफिचर्सदिवाळी अंकांचे भवितव्य काय

दिवाळी अंकांचे भवितव्य काय

Subscribe

व्यावसायिक दृष्टीने बघितलं तर दिवाळी अंकाचं गणित जमतच नाही. म्हणजे दिवाळी अंक हे केवळ वाचकांनी विकत घेतलेल्या रकमेतून पूर्णत्वास जातील असे नाही. त्यासाठी जाहिरातदार हवेत. त्या जाहिरातदारांनी वेळेवर पैसे द्यायला हवेत. या सर्वच गोष्टींचा विचार करता काही गोष्टी आवाक्याच्या बाहेर होऊन जातात. आजही दिवाळीच्या सुमारास निदान चारशेच्या आसपास दिवाळी अंक निघतात. त्याचा वाचकवर्ग ही एक चिंतेची बाब आहे. त्यात आता ई - दिवाळी अंक ही संकल्पना मूळ धरते आहे. त्यामुळे ही संकल्पना जर फोफावत गेली तर लिखित दिवाळी अंकांचे भवितव्य काय ?

दिवाळी जसजशी जवळ येऊ लागते तसतशी अनेक गोष्टींची आतुरता लागते, त्यातील काही भौतिक गोष्टी आपल्या जिव्हाळ्याचा असतात त्या म्हणजे कपडे, दागिने, घरातील चादरी, पायपुसनी यापासून ते टीव्ही, फ्रीज इथपर्यंत. काळानुसार सामान्य नागरिकांच्या गरजा जशा वाढत गेल्या तशा या भौतिक गोष्टी खरेदी करण्याकडे माणसाचा कल वाढला, या सर्व भौतिक गोष्टींना आपलेसे करताना एक गोष्ट आपण विसरत गेलो. किंबहुना, त्या गोष्टीकडे आता आपलं लक्षच जात नाही. कदाचित ती गोष्ट आता मूलभूत गरजेची नसल्याने त्याकडे फारसं लक्ष देता येत नाही, ती म्हणजे दिवाळी अंक. सामान्य माणसाच्या दिवाळी खरेदीतला हा एक अविभाज्य घटक. दिवाळीच्या इतर खरेदीबरोबर सामान्य माणूस एकतरी दिवाळी अंक विकत घ्यायचा, वाचायाचा. इतरांबरोबर दिवाळी अंक देवघेव करायचा. पण बदलणार्‍या सामाजिक जाणिवेबरोबर ही गोष्ट आता दिसेनाशी होत चालली आहे.

१९०९ च्या दिवाळीमध्ये ‘मनोरंजन’ या मासिकाने पहिला दिवाळी अंक काढला. या गोष्टीला आता नाही म्हणता १११ वर्षे झाली. काशीनाथ रघुनाथ आजगावकर या सावंतवाडी येथून मुंबईत आलेल्या माणसाने १८८५ साली मनोरंजन मासिक काढले आणि त्या मासिकाच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने या मासिकाचा दिवाळी विशेषांक काढला. या अंकात बालकवींची ‘आनंदी आनंद गडे’ ही कविता होती. वि. स. गुर्जर यांची सुप्रसिद्ध ‘वधुंची अदलाबदल’, नावाचं नाटक अशा अनेक दर्जेदार साहित्य या अंकात होतं. यानंतरच्या काळात पहिल्या महायुद्धानंतर म्हणजे १९२० नंतर बरेच दिवाळी अंक बाजारात येऊ लागले. अनेक दिवाळी अंक हे तेव्हा मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर येथून प्रकाशित होत असल्याचे आपणास आढळेल. त्यावेळचा वाचकवर्ग तसा जुजबी होता म्हणजे दिवाळी अंक घेऊन वाचणारा वर्ग हा थोडा उच्चभ्रू समाजव्यवस्थेतील होता. वाचकवर्ग वाढला तो स्वातंत्र्योत्तर काळात. जसजसे दिवाळी अंकाचे स्वरूप बदलले, त्यांचे विषय बदलले तसे वाचकवर्ग दिवाळी अंकांची वाट बघू लागला .

- Advertisement -

१९६० नंतरच्या काळानंतर तर परिस्थिती फार चांगली होती. म्हणजे अतिसामान्य माणसाची अभिरुची दिवाळी अंकातूनच व्यक्त होऊ लागली. अनेक कार्यालयात दिवाळी अंक विकणारी मुलं आणि ते विकत घेऊन वाचणारे वाचक दिसू लागले. अनेक दिवाळी अंक कार्यालयाच्या वाचनालयात उपलब्ध होत होते. तेथील कार्यालयातील कर्मचारी ते क्लेम लावून वाचत. अगदी फस्ट क्लासने प्रवास करणारा मराठी माणूस या सुमारास आपल्या बॅगेतून दिवाळी अंक काढून आपलं उतरण्याचे ठिकाण येईपर्यंत वाचत बसत. कार्यालयात त्या अंकातील एखाद्या कवितेवर, कथेवर चर्चा होत असे.

मला आठवतं, मी विक्रोळीला रहात असताना ‘ठकठक’ या बाल मासिकाचा दिवाळी अंक यायचा. तो मी एका बैठकीत वाचून काढत असे. माझ्यासारखे अनेक बालवाचक होते जे असे अंक वाचायचे. माझे काका त्यांच्या बँकेच्या वाचनालयातून दिवाळी झाल्यानंतरदेखील पुढील दोन – अडीच महिने दिवाळी अंक घरी घेऊन येत आणि मी ते वाचत असे. या अंकातूनच मधु मंगेश कर्णिक, शन्ना नवरे, व्यंकटेश माडगूळकर, गिरीजा कीर, प्रा. प्रवीण दवणे हे लेखक परिचयाचे झाले. वाचनाचे गारूड मानगुटीवर बसले ते या दिवाळी अंकाच्या वाचनाने. त्यावेळी देखील महाराष्ट्राच्या विविध भागांतून जवळपास तीनशे-साडेतीनशे दिवाळी अंक बाजारात येत. दादरचे आयडियल किंवा गिरगावात दिवाळी अंक विकत घेण्यासाठी झुंबड उडायची. ‘जत्रा’, ‘आवाज’ सारखे दिवाळी अंक तर घरातले बहुतेक अगदी महिलासुद्धा वाचायच्या. दुपारी लायब्ररीतून खाकी कव्हर घातलेले हे दिवाळी अंक वाचता वाचता या भगिनींचा डोळा लागायचा. इतपत ही वाचन संस्कृती टिकून होती. काही लेखक तर एकाएका वर्षी पंचवीस तीस दिवाळी अंकासाठी लेखन करत.

- Advertisement -

ही वाचनसंस्कृती अगदी २००० च्या आसपास बर्‍यापैकी होती. शतक बदललं आणि लोकांची अभिरुची बदलली. प्रिंट मीडियापेक्षा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रभाव समाजावर वाढू लागला. त्यातूनच वाचनसंस्कृती ओढगस्तीकडे लागली. एकेका बैठकीत दिवाळी अंकाचा फडशा पडणारे वाचक कमी होऊ लागले. तरुण पिढीला दिवाळी अंकात तेवढा उत्साह उरला नाही. आज साधारणपणे विचार केला तर असे आढळून येते की रेल्वेतून प्रवास करताना पूर्वी डब्यात पंचवीसएक जण वर्तमानपत्र वाचायचे आता एकही दिसत नाही. अनेकजण हातात मोबाईल घेऊन गाणी तरी ऐकतात किंवा गेम तरी खेळतात.

अशातच समाज माध्यमांनी धुडगूस घातला आहे. म्हणजे समाजमाध्यमावर आलेल्या पोष्टी वाचून जर वाचकाचे समाधान होत असेल तर तो दिवाळी अंक घेऊन कशाला वाचेल? हा एक मोठ्ठा प्रश्न उभा आहे. आज जर सर्व्हे केला तर दिवाळी अंक वाचते कोण? तर जी मंडळी लिहीत आहेत तीच आपल्या मित्रांचे अंक विकत घेऊन वाचत आहेत. त्यात सामान्य, अतिसामान्य लोक जे निव्वळ वाचक आहेत अशी मंडळी कमीच आहेत. यावेळी संपादक पुन्हा वाचनालयाचा आधार घेतात. बरं जी अवस्था दिवाळी अंकाची तीच अवस्था वाचनालयांची. कितीतरी वाचनालये सभासद नाहीत म्हणून बंद पडत आहेत. वाचनालये बंद पडणं ही गोष्ट म्हणजे त्या शहराचा सांस्कृतिकदृष्ठ्या र्‍हास होतं आहे, असे समजण्यास हरकत नाही.

व्यावसायिक दृष्टीने बघितलं तर दिवाळी अंकाचं गणित जमतच नाही. म्हणजे दिवाळी अंक हे केवळ वाचकांनी विकत घेतलेल्या रकमेतून पूर्णत्वास जातील असे नाही. त्यासाठी जाहिरातदार हवेत. त्या जाहिरातदारांनी वेळेवर पैसे द्यायला हवेत. या सर्वच गोष्टींचा विचार करता काही गोष्टी आवाक्याच्या बाहेर होऊन जातात. आजही दिवाळीच्या सुमारास निदान चारशेच्या आसपास दिवाळी अंक निघतात. त्याचा वाचकवर्ग ही एक चिंतेची बाब आहे. त्यात आता ई – दिवाळी अंक ही संकल्पना मूळ धरते आहे. त्यामुळे ही संकल्पना जर फोफावत गेली तर लिखित दिवाळी अंकांचे भवितव्य काय?

हल्ली मोठमोठ्या कवी-लेखकांना फेसबुकवर किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून वाचता येतं, मग ठरवतादेखील येतं की, या साहित्यिकांचा लेख किंवा कथा, कादंबरी अंश या दिवाळीच्या अंकात आहे तर तो अंक घ्यावा का? यामुळे वाचकांच्या अभिरुचीला मर्यादा आलेल्या आहेत. त्यामुळे दिवाळी अंकांच्या खपावर त्याचा परिणाम झाला आहे.

आजही सामान्य वाचकाला विचारलं कोणाच्या कविता वाचल्यात? यांचं उत्तर बालकवी, मर्ढेकर, बापट, करंदीकर आणि पाडगावकर यांच्यापुढे जात नाही. गद्यसाहित्य इनामदार, शिवाजी सावंत आणि रणजित देसाई यांच्यापर्यंत येऊनच संपतं. नवीन पिढी काय लिहिते, काय समस्या मांडते त्यांचे विषय काय? हे फार महत्त्वाचे आहे. अनेक पिढीतील लेखकांचे लेखन हे दिवाळी अंकातूनच लोकांसमोर आले. आज समाजमाध्यमावर सर्रास लेखन वाचायला मिळते. त्यामुळे लिहा आणि टाका, लिहा आणि टाका. त्यामुळे लिखाणाची नीटशी बैठक अजून जमत नाही. दिवाळी अंकातील लेखनामुळे लिखाणाची बैठक समृद्ध होत जाते. जेव्हा साहित्य हा समाजजीवनाचा आरसा बनते तेव्हा ते साहित्य लोकांच्या पसंत पडते आणि ते टिकते.

आज प्रस्थापित दिवाळी अंकदेखील वाचक नाहीत असं म्हणताना दिसतात, परंतु अशाही परिस्थितीत मला चार दिवाळी अंकांचा इथे मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. पुण्यातून प्रसिद्ध होणारा, प्रतीक पुरी याने संपादित केलेला ‘अक्षरलिपी’, जळगावच्या ‘वाघूर’ नदी काठच्या नामदेव कोळी या माझ्या मित्राने प्रकाशित केलेला ‘वाघूर’. पुण्याच्या मोतीराम पौळ याचा ‘अक्षरदान’ आणि ठाण्यातील मित्रवर्य गीतेश शिंदे यांचा ‘अधोरेखित’. हे चारही अंक आजच्या काळातील महत्त्वाचे अंक. या चारही संपादकांना प्रतिभेचे वरदान लाभले आहे. त्यांना साहित्याची उत्तम जाण आहे. पण आपले अंकाच्या प्रती विकण्यासाठी आणि अंक तयार करण्यासाठी काय ढोर मेहेनत घ्यावी लागते याच्या कहाण्या त्यांच्याकडूनच ऐकाव्या.

साठीच्या जवळपास त्या दशकात वाचक वर्ग होता; पण वाचकांची आर्थिक सुबत्ता नव्हती. आजच्या पिढीची, निदान शहर संस्कृतीत जन्मलेल्या पिढीकडे आर्थिक सुबत्ता आहे, पण वाचनसंस्कृती नाही. आज दिवाळी अंकाच्या हजार प्रती विकताना नाकी नऊ येतात. कारण यांच्याकडे सेलिब्रिटी लेखक नाहीत असे नाही, पण या अंकांची जाहिरात ते करणार कसे ?

एखाद्या टीव्ही चॅनेलचा दिवाळी अंक वार्षिक खपाचे सर्व विक्रम मोडतो, याला कारण ते त्या तत्सम कलाकाराच्या आयुष्यात रस घेतात, इथे तो प्रकार नाही. निव्वळ साहित्य या एका संकल्पनेवर आज दिवाळी अंक खपत नाहीत ही मराठी साहित्याच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे. ही परिस्थिती बदलायला हवी तर त्यासाठी नवीन वाचक वर्ग निर्माण झाला पाहिजे. कारण साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साहित्य नसून ते सामाजिक जाणिवा प्रगल्भ करणारे महत्त्वाचे अस्त्र आहे. यासाठी वाचकांनी नवीन दिवाळी अंक संपादन करणार्‍यांच्या मागे उभे रहायला हवे. दिवाळी अंक त्या त्या काळातील वाचनसंस्कृती जोपासण्याचे महत्त्वाचे काम करत असतात.

अशा अनेक दिवाळी अंकांचा इथे उल्लेख करावासा वाटतो, ज्यांनी वाचकांची अभिरुची जपून उत्तम साहित्य वाचायला दिले. उदा. मौज, दीपावली, हंस, कालनिर्णय, कथाश्री अनेक दैनिकांनी त्यांचे दिवाळी अंक काढून त्यात भर टाकली. ज्यातून अनेक मराठी लेखक-कवी नावारूपाला आले. आज मुळातच मराठीची अवस्था बघता या वाचनसंस्कृतीची काळजी वाटते. म्हणजे मराठी माध्यमातून कोणी शिक्षण घेताना दिसत नाही. महाविद्यालयात मराठी ऐवजी ऐच्छिक विषय म्हणून माहिती आणि तंत्रज्ञान किंवा एखादा व्होकेशनल विषय मुलं घेताना दिसतात. या सर्व गदारोळात दिवाळी अंकांचे भविष्य काय ? … आज जो वाचक साठीला पोचला आहे तो निदान वाचतोय, बाकीच्या तरुण पिढीचं काय? हे एक मोठ्ठं आव्हान पुढे असणार आहे. हे मात्र नक्की.

आजही दिवाळी म्हटली की, लेखकांची कथा, कविता संपादक मंडळींना देण्याची घाई आठवते. संपादक मंडळींची अमूक लेखकाकडून साहित्य मिळवण्यासाठी होणारी धडपड डोळ्यासमोर येते. मराठी साहित्याला इथवर आणण्यासाठी त्यांनी केलेली खटपट आठवली की अंगावर काटा येतो .. हे सर्व समाजास्तव … त्यांची धडपड व्यर्थ न जावो ….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -