घरफिचर्सआक्षेपकहो,मानवतेला धर्माचे लेबल कशाला?

आक्षेपकहो,मानवतेला धर्माचे लेबल कशाला?

Subscribe

फ्रान्सिस दिब्रिटो ख्रिश्चन धर्मगुरू असल्याचे सर्वश्रुत आहे. पण ते सर्मधर्मसमभावाचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. त्यांनी आपली ख्रिश्चन धर्मीय श्रद्धा कधी लपवून ठेवली नाही. महात्मा गांधीही स्वतःला सनातन हिंदू म्हणवून घ्यायचे, तरीही त्यांचा दररोजच्या प्रार्थनेत सर्व धर्मग्रंथाचे पठण वा गायन करायचे. फादर हेही याच जातकुळीचे, त्यांचे ख्रिश्चनपण जपत सर्वधर्मभावाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी वारंवार सांगितलेली व लिहिलेली एक आठवण मी इथे नमुद करतो. ते जेव्हा धर्म अभ्यासासाठी युरोपला गेले, तेव्हा त्यांचा बॅगेत बायबल सोबत तुकाराम गाथा होती. तिथं त्यांना त्यांच्या देशातील इतर धर्मियांच्या प्रार्थना सांगा असं म्हणाले असताना ज्ञानेश्वर माऊलीच्या ‘पसायदान’ या प्रार्थनेचं इंग्रजी भाषांतर करून सांगितलं, तेव्हा ही वैश्विक प्रार्थना आहे असं ख्रिश्चन धर्म अभ्यासवर्गात सर्वमान्य झालं.

दिनांक २६ सप्टेंबर २०१९ रोजी उस्मानाबाद येथे होणार्‍या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांनी आयोजित केलेला सत्कार समारंभ सातत्याने येणार्‍या धमक्यांमुळे पोलीस बंदोबस्तात संयोजकांना घ्यावा लागला, त्या घटनेचा मी साक्षीदार होतो. यावरून प्रागातिक व पुरोगामी महाराष्ट्र असा लौकिक असणार्‍या महाराष्ट्राची सांस्कृतिक, सहिष्णुता किती वेगाने घसरत चालली आहे याचे हे द्योतक आहे. एका अस्सल मराठमोळ्या व्यक्तिमत्वाचा व मराठीत लक्षणीय साहित्य संपदा निर्माण केलेल्या एका उदारमतवादी साहित्यिकाच्या सत्कारासाठी पोलीस संरक्षण मागावे लागते ही केवळ दुर्दैवी बाब नाही तर लेखक-कलावंताच्या स्वातंत्र्याच्या वाढत्या धोक्याची भयसूचक घंटा पुन्हा एकवार तीव्रतेनं खणाणली गेली आहे, असं माजी संमेलनाध्यक्ष म्हणून मला वाटतं.

कलावंताचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा त्यांचा संविधानिक असा मौलिक अधिकार आहे, पण त्याचा अलीकडचा काळात झपाट्यात संकोच होत आहे. त्याबद्दल 2018 मध्ये बडोदा येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात मी अध्यक्षीक भाषणात त्याबाबत सरकारला दोषी धरत ‘राजा तू चुकत आहेस. तू सुधारलं पाहिजेस,’ असं ठाम प्रतिपादन केलं होतं. पण यवतमाळला पुन्हा उद्घाटनाला नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीवरून आपल्या राज्याचं व देशाचं साहित्यिक-बौद्धिक व सांस्कृतिक वातावरण किती गढूळ व दूषित झालं आहे याचा पुन्हा प्रत्यय आला होता. आणि तेव्हा सारा महाराष्ट्र व बर्‍याच प्रमाणात देश ढवळून निघाला होता. पण त्यापासून काही बोध घेतल्याचे दिसून येत नाही.

- Advertisement -

यंदा तर फादर दिब्रिटोंच्या निवडीला आक्षेप घेताना त्याला सांस्कृतिक राजकारणासोबत धोकादायक असं धार्मिक विरोधाचं असहिष्णू वळण देण्याचा सरळ-सरळ प्रयत्न दिसत आहे. त्याची मला अधिक चिंता व काळजी वाटते. इथे ‘मी’ हा व्यक्ती नाही, तर माजी संमेलनाध्यक्ष म्हणून लेखक-कलावंताच्या एक प्रतिनिधी आहे. म्हणून फादर दिब्रिटोंना जो विरोध होत आहे, यांची निवड केल्याबद्दल महामंडळ खास करून त्याचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील व प्रा. मिलिंद जोशी यांना मागील काही दिवसात फोन वरून ज्या धमक्या येत आहेत आणि रविश कुमार व्यास उपहासात ! व्हॉटसअप युनिव्हर्सिटी ! किंवा ! फॅक्टरी ! संबोधतात, त्या सोशल मीडियावर जे अश्लील मजकूर व्हायरल होताहेत त्याचं विवेचन करणं आणि घेतल्या जाणार्‍या आक्षेपांचे खंडन करण्यासाठी हा लेखन प्रपंच करणं मला भाग पडतंय. पण ते कटू असलं तरी माझं लेखक-कलावंत म्हणून कर्तव्य आहे. अप्रिय असली तरी इष्ट तेच स्पष्टपणे लिहिण्याचा हा अल्पसा प्रयास आहे.

फादर फ्रान्सिस डिब्रिटोंच्या अध्यक्षपदाला विरोध करण्यामागे कोण आहे? टी.व्ही. वर मुलाखती देत व चर्चा करीत विश्व हिंदू परिषद व ब्राम्हण महासंघात उघडपणे त्यांचं ख्रिश्चन असणं अधोरेखित करीत विरोध केला आहे. फादरची निवड हा आमच्यासाठी काळा दिवस आहे, असं म्हणत महामंडळाने त्यांची निवड रद्द करावी, तसेच महाराष्ट्र शासनाने, ते संमेलनासाठी अनुदान देत असल्यामुळे हस्तक्षेप करावा अशीही मागणी केली आहे. सनदशीर मार्गाने विरोध करून काही निष्पन्न झाले नाही तर संमेलन उधळून लावू अशीही स्पष्ट धमकी या दोन संघटनांच्या प्रतिनिधींनी टी.व्ही चॅनेलना मुलाखात देताना केली आहे. यावरून हे स्पष्ट होते की, सांस्कृतिक राजकारणास आता उघडपणे धार्मिक वळण विरोधक देत आहेत. कारण येथे नवनियुक्त अध्यक्ष हे धर्माने ख्रिस्ती आहेत व तर पुन्हा धर्मगुरू-फादर आहेत.

- Advertisement -

विचारवंतांच्या आत्महत्या, धार्मिक उन्माद व गोहत्येच्या नुसत्या संशयावरून झुंडशाहीने हिंसक होत मुस्लिमांच्या हत्या करणे, रोहित वेमुला असू देत की डॉ. पायल तडवी त्यांच्या आत्महत्येमागे सवर्णांचा अनुदार दृष्टीकोन व वर्तन, त्यामुळे होणारी असह्य कोंडी आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाने जोपासला जाणारा बहुसंख्य हिंदूवाद यामुळे देशाचं कला-साहित्य-संस्कृतीचं मोकळं वातावरण झपाट्यानं नष्ट होत आहे. जसं मी काय खावं, काय घालावं हे अप्रत्यक्षपणे जसं डिक्टेट केलं जाऊ लागलं आहे. यापुढे लेखक-कवींनी काय लिहावं तसंच काय लिहू नये, हे पण जर बाह्यशक्ती नियंत्रित करू लागल्या तर लोकशाही व स्वातंत्र्य धोक्यात येण्याची शक्यता वास्तव रूप धारण करू शकते. म्हणून एका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना होणारा धार्मिक विरोध एवढ्या पुरताच हा विषय मर्यादित नाही तर तो प्रामुख्याने व अंतिमतः सेक्युलॅरिझमचा आहे, असं मला वाटतं. म्हणून त्याची साधक-बाधक चर्चा गुद्यावर न येता झाली पाहिजे. विचार कलहाला घाबरायचं नसतं, हा गो.ग. आगरकरांचा मोलाचा संदेश शिरोधार्य मानून अमर्त्य सेन ज्या भारतीयांना ‘अर्ग्युमेंटेटिव इंडियन्स’ म्हणतात, त्या आपण भारतीयांनी निकोप चर्चा केली पाहिजे व स्पष्टपणे कोणलाही छुपा हेतू वा अजेंडा न ठेवता बोललं-लिहिलं पाहिजे ही आजच्या काळाची गरज बनली आहे.

फादर फान्सिस दिब्रिटोंना टी.व्हीवर मुलाखत देत विश्व हिंदू परिषदेचे नितीन वाडकर, महंत सुधीरदास आणि ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी उघडपणे धार्मिक रंग देत विरोध केला आहे. तसं व्हॉट्सअ‍ॅप व इतर सोशल मीडियावर अभिराम दीक्षित, सुजीत भोगले यांचे लेख व्हायरल झाले आहेत, तसेच प्रा. शेषराव मोरे यांच्या नावाने ‘तत्वज्ञ मे. पु. रेगे कृत फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांचे वस्त्रहरण’ या नावाचा लेखही माझ्या व्हॉट्सअ‍ॅपवर एका प्रसिद्ध मासिकाच्या लेखकाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून आला आहे, तो एक प्रसिद्ध प्रकाशक व अनुवादक यांनीही फॉरवर्ड केला आहे. परंतु हा लेख खरेच प्रा. मोरे यांचा आहे किंवा नाही, हे त्यांनीही विशद केले नाही. पण त्यातील मजकूर वापरून अभिराम दीक्षित व भोगले आदींनी लिहिले आहे. त्यामुळे नावाचा विचार न करता तो मजकूर सोशल मिडियातून पुढे आला आहे. त्या आधारे माझं पुढील विवेचन आहे. तसंच प्राचार्य ठाले पाटील व प्रा. मिलिंद जोशींना फोनवरून आलेल्या द्वेषमुलक धमक्या या पार्श्वभूमीवर या मजकुरांनी प्रभावित होऊन दिल्या असणार. त्यामुळे त्यातून प्रकट झालेल्या विचारांचा-मजकुराचा मी समाचार घेणार आहे, नक्की त्या व्यक्तींचा.

या सर्वांच्या आक्षेपांचे प्रमुख मुद्दे काय आहेत? नवनिर्वाचित अध्यक्ष हे ख्रिश्चन धर्मगुरु आहेत व धर्मांतरावर विश्वास ठेवतात, ते घडवून आणतात. त्याचं साहित्य हे प्रामुख्याने ख्रिस्ती धर्मासंबंधीचं आहे व तेही भाषांतरीत त्यामुळे लेखक म्हणून त्यांची साहित्यिक योग्यता फारशी नाही. फादर हे उदारमतवादी असल्याचा आव आणत असले तरी ते कडवे धर्मवादी आहेत व धर्मप्रचारक आहेत.

खरं तर वेळोवेळी फादर दिब्रिटो यांनी त्यांच्या भाषणातून व ‘ग्रेट भेट’ व ‘माझा कट्टा’ या टी.व्ही. वरील कार्यकमातून आपले विचार मांडले आहेत. तसेच त्यांचे विचार युट्यूबवर उपलब्ध आहेत. ते मी या वादंगाच्या निर्मित्तानं पुन्हा टिपले, या सार्‍यांची व्यवस्थित उत्तरं दिली आहेत. त्यांच्या लेखन-भाषणाच्या आधारे मी या आक्षेपांबाबत विवेचन आता करणार आहे.

फ्रान्सिस दिब्रिटो ख्रिश्चन धर्मगुरू असल्याचे सर्वश्रुत आहे. पण ते सर्मधर्मसमभावाचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. त्यांनी आपली ख्रिश्चन धर्मीय श्रद्धा कधी लपवून ठेवली नाही. महात्मा गांधीही स्वतःला सनातन हिंदू म्हणवून घ्यायचे, तरीही त्यांचा दररोजच्या प्रार्थनेत सर्व धर्मग्रंथाचे पठण वा गायन करायचे. फादर हेही याच जातकुळीचे, त्यांचे ख्रिश्चनपण जपत सर्वधर्मभावाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी वारंवार सांगितलेली व लिहिलेली एक आठवण मी इथे नमुद करतो. ते जेव्हा धर्म अभ्यासासाठी युरोपला गेले, तेव्हा त्यांचा बॅगेत बायबल सोबत तुकाराम गाथा होती. तिथं त्यांना त्यांच्या देशातील इतर धर्मियांच्या प्रार्थना सांगा असं म्हणाले असताना ज्ञानेश्वर माऊलीच्या ‘पसायदान’ या प्रार्थनेचं इंग्रजी भाषांतर करून सांगितलं, तेव्हा ही वैश्विक प्रार्थना आहे असं ख्रिश्चन धर्म अभ्यासवर्गात सर्वमान्य झालं.

मी आळंदी येथील ज्ञानेश्वर मंदिराचा विश्वस्त आहे. तेथे आम्ही पसायदान विचार साहित्य संमेलन घेतले होते. त्यातील ‘माझा धर्म आणि पसायदान’ या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून फादरांनी त्याचा विस्ताराने वारकरी संत साहित्यिकही सांगू शकणार नाहीत, एवढं प्रभावी विवेचन केलं होतं. त्यांच्या साहित्य अकादमी प्राप्त ‘सुबोध बायबल- नवा करार’मध्ये ज्या हजारभर तळटीपा दिल्या आहेत, त्यात संत तुकारामांच्या । जे का रंजले गांजले। या अभंगाचं साधुत्वाच्या संदर्भात संदर्भ दिला आहे. काल पुण्यात सत्काराच्या वेळी त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी काही वर्षांपूर्वी पुण्यात एक दिवस ते पंढरीच्या वारीत चालले होते, ही आठवण बोलताना सांगितली. त्यावरून हे सिद्ध होत नाही का की स्वतःच्या धर्माची तत्वे वारकरी संतांच्या परंपरेशी जोडून घेत सर्वधर्म मैत्री भाव हा त्यांचा खास शब्द आहे, ते साधतात? त्यामुळे धर्मगुरूंचा कडवेपणा व आपलाच धर्म श्रेष्ठ असं ते कधी बोलले नाहीत की लिहिलं नाही.

दुसरा आक्षेप, ते त्यांच्या लेखनातून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करतात. तो घेताना त्यांच्या पुढील पुस्तकांचा दाखला देतात. ‘आनंदाचे अंतरंग- मदर तेरेसा’, ‘सुबोध बायबल-नवा करार’, ‘ख्रिस्ताची गोष्ट’,‘मुलांचे बायबल’ व ‘पोप दुसरे जॉन पॉल’ ही दिब्रिटोंची पुस्तके ख्रिस्ती धर्म व धर्मपंडितांवर लिहिलेली आहेत व त्यामुळे मराठीतले साहित्य हे अधिक समृद्ध झालं आहे. साहित्यात जसं समाजशास्त्र, अर्थशास्त्र, तत्वज्ञान, विज्ञान आदीवर विपुल लिखाण व्हायला हवं असं आपण म्हणतो, तसंच जगातील सर्व प्रमुख धर्मग्रंथांवर आधारीत लेखनही हवं. त्या शिवाय तो धर्म, ती माणसे, ती भारतीय समाजाचा भाग आहेत, ती कशी समजणार? हे काम जर फादरांनी रसाळ मराठीत केलं असेल तर तो आक्षेपाचा मुद्दा कसा असू शकतो? अनेक हिंदू विचारवंतांनी व अभ्यासकांनी गीता, वेद व पुराणांवर विपुल असं लेखन केलं आहे. ते काय धर्मप्रसारासाठी होतं म्हणायचं? धर्मग्रंथ ही काही धर्माचा वा धार्मियांची संपदा नसते. ती वैश्विक असते म्हणून आजही जर्मनीमधील अनेक विद्यापीठात संस्कृत भाषेचं अध्ययन होतं. ते संस्कृत साहित्य हा विश्व साहित्याचा भाग आहे म्हणूनच ना? ‘बायबल’ व ‘कुराण’ हे सुबोध मराठीत आले आहेत, त्यानं साहित्यप्रांत हा समृद्धच झाला आहे.

फादरांवर धर्मप्रसार व धर्मांतराचा आक्षेप त्यांच्या निवडीनंतर विश्व हिंदू परिषदेने व ब्राम्हण महासंघाने घेतला आहे, पण त्यांनी त्याबाबत कोणताही पुरावा दिला नाही. चोवीस तास सुरू राहणार्‍या प्रसार माध्यमांच्या काळात धर्मांतराची कृत्ये लपून राहू शकत नाहीत. फादरांनी धर्मांतर घडवून आणलं असा कोणताही पुरावा नाही. उलट त्यांनी कालच्या पुण्यातील सत्कार समारंभात व्हॅटिकन सिटीमध्ये नव्या शतकाच्या प्रारंभी कोणती जबरदस्तीने वा आमिषाने धर्मांतर घडवून आणणार्‍यांवर बंदी घातल्याचे जाहीर केल्याच्या दाखला दिला आहे. इतिहास काळात घडलेल्या अत्याचारांची समस्त ख्रिश्चनांचा धर्मगुरू म्हणून त्यांनी माफी मागितली आहे. दिब्रिटो असं म्हणतात की, जुन्याकाळी सर्वच धर्माच्या प्रसारकांनी अत्याचार करून धर्मांतरे घडवून आणली आहेत. इतिहासाच्या भाग झालेला तो धर्मांतराचा काळ कोळसा उगाळत बसायचा? सर्व धर्माचे सांगडे बाहेर काढायचे की संस्कृती अधिक वर्धिष्णू करायची? हा त्यांचा प्रश्न व त्यातून सुचित होणारा अर्थ महत्त्वाचा आहे. प्रगतीशील व भविष्यवेधी आहे असे मी मानतो.

धार्मिक कारणावरून फादर दिब्रिटोंना विरोध करणारे त्यांचं वसईतलं कार्य लक्षात घेत नाहीत. आज मुंबई अमराठी म्हणजे इंग्रजी मोठ्या प्रमाणात झाली आहे, पण वसईचं मराठीपण आजही कायम आहे. त्यामध्ये फादर व त्यांच्या ‘सुवार्ता’ या मासिकाचा मोठा हात आहे. या परिसरातील मराठीत लिहिणार्‍या ख्रिश्चन लेखक-कवींची एक दमदार फळी आज साहित्यप्रांती आपली नाममुद्रा कोरीत आहे, त्या मागे फादरांचा, मराठीचा आग्रह व प्रेम हे प्रमुख कारण आहे. वसई हे सर्व धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदणारे शहर आहे व इतिहास काळापासून आजवर तेथे धार्मिक दंगल झाली नाही, हे अभिमानाने फादर सांगतात.

ते भारत हा देश बहुधार्मिक व सह अस्तित्वावर विश्वास ठेवणारा व तसं वागणारा उदारमतवादी देश आहे हे फादर डिब्रिटोंनी पुणे येथे भरलेल्या डिसेंबर २०१८ मधील १८ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून विशद करताना म्हटलं होतं. भारतीय विशालतेची मुळं ऋग्वेदात सापडतात. आपल्या ऋषींनी म्हटलं आहे. एक रूद, विप्रबहुधा वदान्ति ‘तो’ एक आहे, साक्षात्कारी लोक त्याला अनेक नावांनी ओळखतात. घटनाकारांनी हे बहुविधतेचे सूत्र मान्य करून आपल्या ऋषीमुनींच्या क्रांतदर्शनाला मान्यता दिली आहे. ऋग्वेदात असेही म्हटले आहे की, ‘आनो भ्रदा ऋतवो यंतु विश्वतः’ ‘सर्व दिशांतून नवे नवे विचार माझ्या भूमीत येऊ द्या.’ या उदारवृत्तीमुळे भारत देश हा सकल धर्मांचे आणि विचारांचे माहेर घर बनले आहे, असा व्यापक उदार सेक्युलर विचार मांडणारा हा सच्चा माणूस आहे. त्यांच्यावरील धर्म प्रसारांचे आरोप हे सर्वथा चुकीचे व बिनबुडाचे आहेत.

भारत देश हा बहुधार्मिक व बहुसांस्कृतिक आहे व ते या देशाचे वैशिष्ठ्य आहे. आज जगभर सर्व धर्मांचे लोक विविध ठिकाणी स्थालांतरीत होत आहेत, अशावेळी विविध धर्म मान्य करीत शांततामय सहअस्तित्व कसे साध्य करावे हा प्राश्चात्य देशांपुढला प्रश्न आहे. त्याला भारताकडून त्याची कला शिकता येईल. पण आपण बहुसंख्यांकवाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाला अग्रस्थानी आणण्याच्या प्रयत्नात ही कला व हा सर्वधर्म समभाव व सहअस्तित्व नाकारत आहोत. त्यामुळे देशाचे नुकसानच होणार आहे. फार मोठी जनसंख्या असणार्‍या मुस्लीम व ख्रिश्चनांना देशाच्या राजकारण व समाजकारणात बेदखल करून देशाला आपण अराजकतेच्या दिशेने तर ढकलत नाही ना याचा विचार सार्‍यांनी केला पाहिजे, हा विचार फादर दिब्रिटो मांडतात म्हणून त्यांचं महत्त्व आहे.

फादरांची साहित्य संपदाही अव्वल दर्जाची आहे, पण फादर स्टिीफन, बाबा पदमजी व रेव्हरंड टिळकांपासून असलेली ख्रिस्ती मराठी साहित्य परंपरा ते जोरकसपणे पुढे नेत आहेत व त्याद्वारे समाजाला उदार व सर्वधर्म मैत्री समभावासाठी आवाहन करीत आहेत. साहित्य जर समाज घडवत असेल तर फादरांचं लेखन त्यासाठी वरील अर्थाने महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने केवळ आपल्या धर्माची चिकित्सा व टीका करावी, हा अविवेकी संकुचित विचार झाला. जेव्हा महात्मा गांधी, ‘सर्व धर्म अपूर्ण आहेत असे म्हणतात ती टीका असते.’ त्याच न्यायाने फादर दिब्रिटोंनी जर हिंदू धर्म व जाती परंपरेवर टीका केली तर बिघडलं कुठे? त्यांचा धर्म महत्त्वाचा नाही तर ते जी टीका करतात, त्यात सत्यता किती आहे हे महत्त्वाचं आहे. पुन्हा फादरांच्या टीकेला सर्वधर्म मैत्रीचे अधिष्ठान आहे हे विसरून चालणार नाही.

आक्षेपकांचे इतरही काही आक्षेप आहेत. उदा. ते संमेलनाला पायघोळ झगा घालून येणार का? संमेलनस्थळी क्रॉस इ. विकणार का? हे अत्यंत थिल्लर आक्षेप आहेत. त्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं!

आता मला फादरांची एकमताने साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल महामंडळाचं अभिनंदन करायचं आहे. त्यांनी काय विचार या संदर्भात केला हे मला माहीत नाही. पण आजच्या कलुषित झालेल्या सांस्कृतिक वातावरणाच्या व धार्मिक असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर माझ्या मते दिब्रिटोंची निवड करणे हे महामंडळाने केलेले एक जबरदस्त ‘पॉलिटिकल स्टेटमेंट’ आहे. गजानन माधव मुक्तीबोध यांनी ‘पार्टनर तुम्हारा पॉलिटिक्स क्या है’ असा भेदक प्रश्न विचारला होता, त्याची आठवण मला महामंडळाच्या या निर्णयामुळे झाली आहे.

साहित्य हे निधर्मी असतं, असलं पाहिजे. मराठी साहित्य संत साहित्यापासून असंच राहिलं आहे. मराठी साहित्यात आज दलित, स्त्रीवादी, मुस्लीम, आदिवासी आणि ख्रिश्चन साहित्य प्रवाह मुक्तपणे खळाळून वाहत आहेत व ते एकूणच मराठी साहित्याला विशाल आणि मानवतावादी बनवित आहेत. हे मुक्तीबोधांचं असलेलं ‘पॉलिटिक्स’ च आहे. आहे ती अन्यायकारी व मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणारी व्यवस्था बदलणे, हे व्यापक अर्थाने पक्षापलीकडचं राजकारण असतं व मी त्या अर्थाने राजकीय लेखक आहे. असा विचार मी माझ्या अध्यक्षीय भाषणात मांडला होता. महामंडळाने मराठी साहित्याला मुस्लीम, ख्रिश्चन आदी धर्मियांनी दिलेलं योगदान मान्य करीत त्यांना फादरांच्या निवडीनं साहित्याच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचं हे व्यापक ‘पॉलिटिक्स’. स्वागतार्ह व अभिनंदनीय आहे. आणि आक्षेपकांचं संकुचित म्हणून त्याज्य वाटणारं आहे.

शेवटी आक्षेप घेणार्‍या विश्व हिंदू परिषद, ब्राम्हण महासंघाच्या पदाधिकार्‍यांना सांगावसं वाटतं की, त्यांच्या विचारांच्या शासनातच फादर दिब्रिटोंना 2016 मध्ये शासनाचा ‘ज्ञानेश्वर-तुकाराम’ पुरस्कार आळंदी देवस्थानी दिला होता. म्हणजेच फादरांची व्यापक सेक्युलर मान्यता मान्य केली होती. येशू आणि ज्ञानेश्वर-तुकारामांच्या विचारांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे, त्या फादरांची अध्यक्षपदी झालेली निवड एका सेक्युलर साहित्यकाची आहे, तिनं गढुळलेलं सांस्कृतिक व धार्मिक वातावरण निवळण्यास मदत होणार आहे. आक्षेपकांनी मोकळ्या मनाने फादरांचे विचार समजून घ्यावेत म्हणजे त्यांची मने व मते ही साफ-निर्मळ होतील.

-लक्ष्मीकांत देशमुख

-(लेखक अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -