घरमहाराष्ट्रआमीरने घेतली शरद पवार यांची भेट

आमीरने घेतली शरद पवार यांची भेट

Subscribe

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता अमीर खान याने गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून आमीर आणि त्याच्या सहकार्यांनी राज्यात सुरू केलेल्या पाणलोटाच्या कार्याची माहिती देण्यासाठी ही भेट घेतली होती. यावेळी शरद पवार यांनी अमीर खानला जलसंधारण कामाच्या सूचना केल्या.

शरद पवार नेमके काय म्हणाले ?

आपल्या देशात ऋतुमान अनियमित असल्याने पाणी साठवण्याची योजना राबवणे अत्यावश्यक आहे. सर्वसामान्यांचा सहभाग घेऊन त्यांना पाणीसंवर्धनाच्या कामासाठी उद्युक्त करण्याचे कौतुकास्पद काम आमिर खान यांची टीम करत आहे. केवळ पिण्यासाठी पाणीसंवर्धन नाही तर ६० टक्के शेतीवर अवंलबून असलेल्या देशात शेतीसाठी पाण्याचा योग्यप्रकारे वापर करण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. याबाबत इस्त्रायलचे उदाहरण समोर ठेवायला हवे. पाण्याच्या अत्यल्प उपलब्धतेतही त्यांनी थेंब थेंब वाचवून शेतीचे नंदनवन फुलवले आहे.

- Advertisement -

आपल्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक कसे घेता येईल यासाठी अनेक प्रयोग केले जातात. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्येही भरपूर पाणी लागणाऱ्या ऊसाबाबत प्रयोग केले आहेत. पाटातून सोडण्यात आलेले पाणी बरचसे वाया जाते. त्यामुळे बिनकामाचे तण सुद्धा वाढते. त्याऐवजी ऊसाच्या केवळ मुळांना मुबलक पाणी उपलब्ध होईल अशी योजना केल्यास फायदेशीर ठरते. असे मार्गदर्शन पवारांनी आमिरला केले. तसेच अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला भेट देण्याचे निमंत्रण दिले. या भेटीच्या वेळी शरद पवार स्वतः उपस्थित राहून काम दाखवणार आहेत.

Aamir khan and his team meets Sharad Pawar
आमीर खान आणि त्याच्या टीमने घेतली शरद पवार यांची भेट

शरद पवार म्हणाले की, पाणी फाऊंडेशनच्या कार्यातील लोकसहभाग वाखाणण्याजोगा आहे. मला आठवते की, १९७२ साली जेव्हा दुष्काळ पडला होता, तेव्हा अमेरिकेतील एक संस्था ‘फूड फॉर हंगर’ असा कार्यक्रम राबवण्यासाठी इथे आली होती. मी त्यांना विरोध केला. त्यांना सांगितले की अशाप्रकारे धान्य वाटण्याऐवजी तुम्ही लोकांचा पाणी साठवण्याच्या कार्यात सहभाग घ्या. त्यांच्या श्रमदानाच्या मोबदल्यात त्यांना धान्य द्या. त्यांना ही गोष्ट पटली व त्यांनी ‘फूड फॉर वर्क’ असा कार्यक्रम सुरू केला. आज आमिर खान यांनाही मी असे सुचवले आहे की, रयत शिक्षण संस्थेसारख्या असंख्य शैक्षणिक संस्था आपल्या राज्यात आहेत, तिथल्या विद्यार्थ्यांचा या कार्यात सहभाग करून घ्यावा. जेणेकरून त्यांना पाणी संवर्धनाबाबत रूची निर्माण होईल, तसेच त्यांचे याबाबत शिक्षण होईल. यापूर्वीही पाणी फाऊंडेशनच्या या कामासाठी मी माझ्या खासदार निधीतून तसेच राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून काही आर्थिक मदत केली आहे आणि यापुढेही कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ती करायची माझी तयारी आहे.

- Advertisement -

यावेळी शरद पवार यांनी पाणी फाऊंडेशच्या सर्व सदस्यांना या पाणी संवर्धनाच्या या कामासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -