घरपालघरपालघरमध्ये दुर्घटनांचे सत्र सुरूच; विरारच्या पापडखिंड धरणात बुडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

पालघरमध्ये दुर्घटनांचे सत्र सुरूच; विरारच्या पापडखिंड धरणात बुडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

Subscribe

वसई : पालघर जिल्ह्यात विविध घटनांमध्ये बुडून मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. काल, रविवारी विरार पूर्वेकडील पापडखिंड धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका तेरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आईवडिलांच्या डोळ्यासमोरच घडल्याने बोराडे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. गेल्या आठवड्यातच या धरणात बुडून तेरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता.

रविवारी संध्याकाळी वसंत बोराडे हे पत्नी, मुलगा ओम (13) आणि शेजारील अंश (12), वंश (11) या दोन मुलांना घेऊन विरार पूर्वेकडील पापडखिंड धरण परिसरात फिरायला गेले होते. गेले काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे पापडखिंड धरण सध्या भरले आहे. त्यामुळे या धरणात उतरण्याचा मोह या तीनही मुलांना आवरला नाही. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास तीनही मुले पोहण्यासाठी पाण्यात उतरली होती.

- Advertisement -

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तीनही मुले बुडू लागली. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्यांच्या लक्षात आल्यावर काही जणांनी या मुलांचा वाचवण्याचा प्रयत्न केला. अंश आणि वंशला वाचवण्यात यश आले. मात्र, ओम बोराडे याचा बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरा त्याचा मृतदेह हाती लागला.

आपल्या डोळ्यादेखतच मुलाचा बुडून मृत्यू झाल्याने बोराडे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या आठवड्यातच या धरणात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतरही वसई विरार महापालिकेने सुरक्षारक्षक तैनात न केल्याने पुन्हा ही घटना घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्तलकेला आहे.

- Advertisement -

वांद्री धरणात बुडून तरुणाचा मृत्यू
पालघर तालुक्यातील वांद्री धरणात काल, रविवारी पोहण्यासाठी उतरलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. राहुल सुरेश खरात (30) असे मृताचे नाव असून तो मुंबईच्या काळाचौकी भागातील रहिवासी होता. वर्षा पर्यटनासाठी राहुल हा पत्नी तसेच मित्राच्या पत्नीसह दुचाकीवरून वांद्री धरणावर आला होता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास धरणाच्या पाण्यात उतरला असता खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

फिरायला आला आणि काळमांडवी धबधब्यात बुडाला
मुंबईच्या जोगेश्वरी येथील युवक मशीउद्दीन सलाउद्दीन खान या तरुणाचा अलीकडेच जव्हार तालुक्यातील काळमांडवी धबधब्यात बु़डून मृत्यू झाला होता. सोशल मीडियावरील पोस्टच्या आकर्षणातून मशीउद्दीन सलाउद्दीन खान व त्याचे तीन मित्र जव्हार येथे 11 जुलै 2023 रोजी फिरायला आले होते. काळमांडवी धबधब्याजवळ आल्यानंतर मशीउद्दीन खान हा पाय घसरून पाण्यात पडला आणि प्रवाहासोबत वाहून गेला. नंतर त्याचा मृतदेह सापडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -