घरताज्या घडामोडीइतका निर्लज्जपणा पाहिला नाही

इतका निर्लज्जपणा पाहिला नाही

Subscribe

आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई – शनिवारच्या पावसात मुंबईत याआधी जिथे कधीच पाणी तुंबत नव्हते तिथेही पाणी तुंबल्याचे दिसून आले. या परिस्थितीत मुंबईकरांच्या मदतीला पालिकेचे अधिकारी तर कुठे दिसलेच नाहीत, पण मुख्यमंत्री कुठे होते तेदेखील कळले नाही. उलट पाऊस आल्याचे स्वागत करा, पाणी तुंबल्याची तक्रार काय करता, असे वक्तव्य केले. इतका निर्लज्जपणा आपण कुठेच पाहिला नाही, असे टीकास्त्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी सोडले.

मुंबई महापालिका आमच्या हातात होती तेव्हा मी, उद्धव ठाकरे, त्या-त्या वेळचे आमचे महापौर हे मुंबईच्या गल्ल्या-गल्ल्यांमध्ये फिरून पाहणी करायचो, पण आता तसे काहीच दिसत नाही. गेल्या वर्षभरात मुंबईला कोणताही चेहराच उरलेला नाही. नालेसफाईचे काम 100 टक्के झाले आहे. मुंबईत कुठेही पाणी तुंबणार नाही, असे आश्वासन दिले होते, पण कालच्या पावसात तसे कुठेच झाल्याचे दिसून आले नसल्याचे आदित्य ठाकरे रविवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.

- Advertisement -

मुंबईत पावसाळ्याआधी ५० रस्त्ते पूर्ण करू, असे जाहीर केले होते. त्यातील एकाही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. सर्व रस्ते सेफ स्टेजपर्यंत पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. सेफ स्टेज म्हणजे काम अजून बाकी आहे, पण पावसाळ्यात त्यामुळे पाणी तुंबणार नाही अशी स्थिती, पण आता त्यामुळे पाणी तुंबले आहे. याची मी आणि शिवसैनिक जाऊन पाहणी करणार आहोत, असे ठाकरे म्हणाले.

मुंबईतील रस्ते कामात सहा हजार कोटींचा घोटाळा असल्याचा पुनरुच्चार आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. कंत्राटाच्या फाईल्स केवळ मंत्रालयात नाही, तर मंत्रालयाच्या शेजारी एका इमारतीत जातात. तिथे बिल्डर, कंत्राटदारांमार्फत कारभार चालतो, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.

- Advertisement -

आदित्य ठाकरे मंदबुद्धी-पावसकर

शिवसेनेचे प्रवक्त किरण पावसकर यांनी आदित्य ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, आदित्य ठाकरे हे बालबुद्धी नाही, तर मंदबुद्धी आहेत. पाऊस पडला नसता तर तुम्ही म्हणाला असता की शिंदे सरकार आहे म्हणून पाऊस पडला नाही आणि आता पाऊस पडला तर वाट्टेल ते बोलतात. हे जे काही सहा हजार कोटींचा घोटाळा सांगत आहेत ते निव्वळ खोटं आहे. ज्या बीएमसी आणि कॉन्ट्रॅक्टरवर घोटाळ्याचे आरोप करत आहात लक्षात ठेवा या बीएमसीमधून झालेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातूनच तुमच्या बालपणीचा खर्च केला गेला आहे, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -