Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र लसीकरणाबाबत प्रौढांची उदासीनता; एपीआय आणि इप्सोसच्या सर्वेक्षणातून उघड

लसीकरणाबाबत प्रौढांची उदासीनता; एपीआय आणि इप्सोसच्या सर्वेक्षणातून उघड

Subscribe

मुंबई : प्रौढांसाठी असलेल्या लसीकरणाबाबत प्रौढच उदासीन असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स इंडिया (एपीआय) आणि इप्सोस यांच्यातर्फे 16 शहरांमध्ये नुकतेच us सर्वेक्षण घेण्यात आले. प्रौढांसाठीच्या लसीकरणाबाबत 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या 71 टक्के प्रौढांना माहिती असली, तरी केवळ 16 टक्के प्रौढांनी अशी एखादी लस घेतली आहे. या कमी प्रमाणाची रुग्ण व डॉक्टर्स यांनी सांगितलेली कारणे परस्परांहून बरीच वेगळी आहेत.

देशामधील 50 वर्षांहून अधिक वयाचे प्रौढ, त्यांची काळजी घेणारे व डॉक्टर्स यांचा सहभाग असलेल्या या सर्वेक्षणात होता. औपचारिक मार्गदर्शक तत्त्वे नसल्यामुळे रुग्णांना लसीकरणाबाबत फारसा रस वाटत नाही व त्यांच्यात लस घेण्याचे प्रमाण कमी असते, असे बहुसंख्य (90 टक्के) डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे ते रुग्णांसोबत प्रौढांसाठीच्या लसीकरणाबाबत फारशी चर्चा करत नाहीत, तसेच खर्च आणि प्रतिबंधाहून अधिक प्राधान्य उपचारांना द्यावे लागत असल्यामुळे रुग्णही लसीकरणाच्या शिफारशी ऐकून घेण्यास फारसे उत्सुक नसतात, असे डॉक्टरांना वाटते.

- Advertisement -

डॉक्टरांकडून ठामपणे शिफारस केली जात नसल्याने ती घेण्याच्या दृष्टीने कोणतीही हालचाल केली जात नाही, असे रुग्णांचे म्हणणे आहे. 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे अनेक रुग्ण (69 टक्के) आणि त्यांची काळजी घेणारे (76 टक्के) डॉक्टरांना प्रौढांसाठीच्या लसीकरणाबद्दल विचारत नाहीत. कारण, आवश्यकता असेल तर डॉक्टर स्वत:हूनच शिफारस करतील, असे त्यांना वाटते. प्रौढांमधील लसीकरणाचे प्रमाण कसे सुधारावे याबाबत विचारले असता, कोविड-19 लसीकरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी वापरलेले उपाय प्रौढांच्या लसीकरणासाठीही वापरावेत, असे 55 टक्के प्रौढ रुग्ण आणि त्यांची काळजी घेणाऱ्या 48 टक्के जणांनी सांगितले.\

मुंबईत 50 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या 73 टक्के प्रौढांना प्रौढांसाठीच्या लसीकरणाविषयी माहिती आहे; पण ही लस घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ 11 टक्के आहे. डॉक्टरांनी लस घेण्याचा सल्ला दिला तर त्यावर विश्वास टाकत असल्याचे, 50 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या 50 टक्के रुग्णांनी, तर त्यांची काळजी घेणाऱ्या 20 टक्के व्यक्तींनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – BRICS: गेटवरच रोखले चीनच्या राष्ट्रपतींचे सुरक्षा रक्षकांना; घडलेल्या प्रकाराने जिनपिंगही अवाक्

मुंबईतील डॉक्टरांनी केवळ 9 टक्के वयस्कर व्यक्तींना प्रौढांसाठीची लस घेण्याची शिफारस केली आहे. त्यातही, केवळ एखाद्या लसीबाबत माहिती विचारणाऱ्यांनाच ही शिफारस करण्यात आली आहे. डॉक्टरांनी लस घेण्याची शिफारस केली, तरीही ती घेण्यापूर्वी कुटुंबियांकडे किंवा मित्रमंडळींकडे त्या लशीबाबत विचारणा करू, असे 50 वर्षांहून अधिक वयाच्या निम्म्याहून अधिक (53 टक्के) प्रौढांनी नमूद केले. प्रौढ रुग्णांमधील लसीबद्दल ऐकून घेण्यास असलेला निरुत्साह आणि प्रौढ लसीकरणाबद्दल उपलब्ध माहितीचा अभाव, याबाबत पश्चिम विभागातील डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली.

असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियाचे सचिव डॉ. अगम व्होरा म्हणाले, 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या प्रौढांना लसीकरणाची शिफारस करण्याचा आत्मविश्वास डॉक्टरांमध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने उपाय करण्याची गरज आहे. प्रौढ लसीकरणासाठी औपचारिक मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आणि त्यांचा प्रसार सर्वत्र करण्यात आला, तर हे शक्य आहे.

शंकांचे निरसन करणारे, गैरसमज दूर करणारे आणि रुग्ण व त्यांची काळजी घेणाऱ्यांना, डॉक्टरांकडे प्रौढांच्या लसीविषयी विचारण्याची आठवण वारंवार करून देणारे कार्यक्रम जागरूकता निर्माण करू शकतात. शिंगल्ससारख्या (नागीण) लसीद्वारे प्रतिबंध केल्या जाणाऱ्या आजारांवरील लसीबाबत भारतात जागरूकता खूपच कमी आहे, असे आमच्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे, असे डॉ. अगम व्होरा म्हणाले.

हेही वाचा – संजय राऊतांचा तपास यंत्रणाना थेट इशारा; म्हणाले-आमचे सरकार येऊ द्या…

वय 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या प्रौढांना व्हीपीडींच्या (लसीकरणाने टाळता येण्याजोगे विकार) नकारात्मक परिणामांबाबत संपूर्ण माहिती दिली गेली तरच, ते लसीकरणाकडे गांभीर्याने बघतील, असे आम्हाला वाटते. रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती प्रौढ लसीकरणाची स्वीकृती वाढवण्यात तसेच प्रौढांना लक्ष्यस्थानी ठेवणारे जागरूकता कार्यक्रम तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

प्रौढांच्या लसीकरणाबद्दलच्या विशिष्ट गैरसमजांमुळेही वयस्कर व्यक्तींमद्ये लसी घेण्याचे प्रमाण कमी आहे. लसींचे अनेक डोस घेतल्यामुळे आपल्याला लसीकरणाची सवय लागेल, असे 50 टक्के लोकांना वाटते. स्वत:ला किंवा स्वत:च्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरणाहून अधिक चांगले मार्ग आहेत, असे ५८ टक्के आणि त्यांची काळजी घेणाऱ्या 62 टक्के लोकांना वाटते. मुंबईतदेखील ५२ टक्के प्रौढांना असेच वाटते. लसीकरणाची आवश्यकता भासण्याइतपत कोविड वगळता अन्य आजार गंभीर नाहीत, असे 36 टक्क्यांना वाटते.

शिंगल्स ह्या आजाराबद्दल देशात अत्यंत कमी जागरूकता आहे असे सर्वेक्षणातून दिसून आले. शिंगल्सच्या रुग्णांना शिंगल्स आणि अन्य त्वचारोगांमधील फरक ओळखणे कठीण जाते आणि त्यामुळे निदानास विलंब होतो व उपचार तेवढे प्रभावी होऊ शकत नाहीत. 79 टक्के रुग्णांसाठी वेदना हे सर्वांत त्रासदायक लक्षण होते आणि 72 टक्के रुग्णांना स्वत:ला शिंगल्स होण्यापूर्वी या आजाराबाबत काहीच माहिती नाही. हा आजार एकदा झाल्यानंतरही, तो पुन्हा होऊ शकतो याची माहिती 73 टक्के रुग्णांना नव्हती. मधुमेह आणि हायपरटेन्शनसारख्या दीर्घकालीन आजारांमुळे शिंगल्स होण्याची शक्यता वाढल्याचे, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या रुग्णांपैकी 66 टक्क्यांनी नमूद केले आणि अशा रुग्णांनी लस घेणे आवश्यक असल्याचेही सांगितले.

सर्वेक्षणाच्या दुसऱ्या भागात शिंगल्सचा रुग्णांच्या आयुष्यावर होणारा परिणाम तसेच जागरूकतेचा स्तर समजून घेण्यासाठी शिंगल्स रुग्णांचा समावेश करण्यात आला. गेल्या एका वर्षात शिंगल्स होऊन गेलेल्या किंवा सध्या शिंगल्सचा सामना करणाऱ्या रुग्णांच्या व त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती यात घेण्यात आल्या. जानेवारी ते फेब्रुवारी 2023 या काळात सर्व शहरांतील शिंगल्सचे 10 रुग्ण (50 वर्षांवरील), त्यांची काळजी घेणारे यांच्या ऑनलाइन मुलाखती घेण्यात आल्या. संख्यात्मक भागही ऑनलाइन घेण्यात आला. यात शिंगल्सचे 216 (50 वर्षांवरील) रुग्ण आणि त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींचा समावेश होता.

सर्वेक्षण करण्यात आलेली शहरे
दिल्ली, कोलकाता, मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, लखनऊ, जयपूर, चंदिगढ, वाराणसी, सुरत, भोपाळ, विजयवाडा, थिरुअनंतपूरम आणि रायगड या शहरांमध्ये सर्वेक्षण घेण्यात आले.

- Advertisment -