घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआरोग्य अधिकारी मद्यधुंद; प्रसुतीसाठी आलेल्या आदिवासी महिलेला दाखवला परतीचा रस्ता

आरोग्य अधिकारी मद्यधुंद; प्रसुतीसाठी आलेल्या आदिवासी महिलेला दाखवला परतीचा रस्ता

Subscribe

नाशिक : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या आदिवासी महिलेला रुग्णालयात दाखल न करता मद्यधुंद अधिकार्‍याने इतरत्र रुग्णालयात जाण्याचे सांगितले. याप्रकरणी ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

शासन एकीकडे गरोदर महिला प्रसुती आणि कुपोषणावर कोट्यवधीचा खर्च करत असताना ग्रामीण भागात मात्र आरोग्य यंत्रणेचे शिलेदारच या मोहिमेला हरताळ फासताना दिसत आहेत. बागलाण तालुक्यातील कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रातील डॉ. वीरेंद्र आवारे याने प्रसूतीसाठी दुसर्‍या रुग्णालयात जाण्याचा अजब सल्ला दिला. मंगळवार (दि. 22 ऑगस्ट) रात्री ११ वाजेच्या सुमारास कल्पना भोये (रा. खडकी, ता. कळवण) ही महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात आली. मात्र, या महिलेला रुग्णालयात दाखल न करून घेता सरळ डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉ. आवारे यांनी दिला. यावेळी या महिलेचे वडील काकाजी बागूल (रा. कपालेश्वर) व नातेवाईकांनी डॉ. आवारी यांनी रुग्णालयात प्रसूती करण्याची विनंती केली. मात्र, मध्यधुंद वैद्यकीय अधिकार्‍याने आणि त्याच्यासोबत असलेल्या बीडच्या एका मित्राने या कुटुंबीयांना हुसकावून लावले.

- Advertisement -

हेही वाचा : खुशखबर! पेसा क्षेत्रातील ‘झेडपी’च्या शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा

या कुटुंबाने तात्काळ डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालय गाठत संबंधित महिलेची प्रसूती केली. दुसर्‍या दिवशी संबंधित कुटुंबाने गावातील प्रमुख लोकांसह परिसरातील लोकप्रतिन्यांची भेट घेत कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. यावेळी रुग्णालयात हजर असलेले डॉक्टर आवारी हा पुन्हा मद्याच्या नसेत आढळून आला. आदर्श गावचे किकवारी चे प्रणेते केदा काकुळते व स्थानिक आदिवासी जनतेने या नशेबाज वैद्यकीय अधिकार्‍याला रुग्णालयातून अक्षरशः हुसकावून लावले. अनेक वर्ष रुग्णालयात असलेला डॉ. आवारे हा कायम मद्याच्या नशेत राहत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. अनेक वेळा वरिष्ठाकडे तक्रारी करूनही संबंधित वैद्यकीय अधिकार्‍याला पाठीशी घातले जाते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

दुसर्‍या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर धनगे पाटील हे येथे कायम राहत नसल्याने रुग्णसेवेचा तूर्त फज्जा उडाला आहे. संताप अनावर झालेल्या कपालेश्वर ग्रामस्थांनी थेट जिल्हा वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना फोनवर माहिती देत संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांवर तात्काळ कारवाई करण्याची आणि या रुग्णालयात पूर्ण वेळ नवीन वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी केली आहे.

पश्चिम भागातील कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र हे या भागातील 15 ते 20 गावांसाठी महत्त्वाचे रुग्णालय आहे. या ठिकाणी वैद्यकीय सेवा मिळत नाही. अनेकवेळा संबंधितांना कळवुनही आरोग्यसेवा सुधारत नाही.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यावर तात्काळ कारवाई करून कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा कपालेश्वरचे सरपंच मनोहर ठाकरे,ग्रामपंचायत सदस्य गोविंदा ठाकरे, सुरेश महाले,पोपट पवार, साहेबराव अहिरे, केशरबाई बागुल, उत्तम बागूल, तुषार बागूल, माधव ठाकरे, लहानू पवार, रूपाली बागूल आदींसह ग्रामस्थांनी दिला आहे.

कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र आदिवासी भागासाठी शोभेची वस्तू ठरत आहे. आरोग्य सेवा मिळत नसल्याने जनतेत नाराजी आहे. वैद्यकीय अधिकारी मनमानी पद्धतीने ये-जा करतात. वरिष्ठांनी लक्षण दिल्यास आरोग्य विभागाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. : मनोहर ठाकरे, सरपंच, कपालेश्वर

संबंधित वैद्यकीय अधिकार्‍याची सदस्य तक्रार लक्षात घेता त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येणार आहे. रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. : डॉ. हर्षल महाजन, तालुका वैद्यकीय अधिकारी, सटाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -