घरताज्या घडामोडीअजितदादांचा सभागृहातच उद्धव ठाकरेंना प्रश्न - 'पुन्हा माफी नाही ना?'! सदस्यांचा तुफान...

अजितदादांचा सभागृहातच उद्धव ठाकरेंना प्रश्न – ‘पुन्हा माफी नाही ना?’! सदस्यांचा तुफान हशा!

Subscribe

विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली फटकेबाजी आज सत्ताधाऱ्यंसोबत विरोधकांना देखील खळखळून हसायला लावणारी ठरली!

राज्याच्या अर्थसंकल्पावर सध्या विधिमंडळामध्ये चर्चा सुरू आहे. आता अर्थसंकल्पावर चर्चा म्हणजे अवजड भाषणं असणार हे तर आलंच. पण त्यासोबतच अधिवेशनादरम्यान नेत्यांमध्ये आणि आमदारांमध्ये रंगणाऱ्या कलगीतुऱ्यामुळे ही भाषणं अधिक इंटरेस्टिंग होतात असं अनेकदा दिसून आलं आहे. आज अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणावर विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपांवर दिलेल्या उत्तराच्या भाषणामध्ये विरोधकांना काढलेल्या चिमट्यांमुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला. यामध्ये सर्वात जास्त हशा अजित पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भर सभागृहातच विचारलेल्या एका प्रश्नामुळे पिकला. आणि तो प्रश्न होता, ‘काय, पुन्हा माफी नाही ना?’

नक्की काय प्रकार आहे?

आपल्या भाषणादरम्यान अजित पवारांनी विरोधकांच्या अनेक मुद्द्यांना उत्तर दिलं. मात्र, यावेळी अजित पवारांनी काल सुधीर मुनगंटीवारांनी सभागृहात केलेल्या वक्तव्यावरून जोरदार टोला हाणला. ‘शिवसेनेला आम्ही फसवलं ही आमची चूक झाली’, अशी कबुली काल विधानसभेत बोलताना सुधीर मुनगंटीवारांनी दिली होती. त्यावर अजित पवारांनी उत्तर देताना टोला लगावला.

- Advertisement -

काय म्हणाले अजित पवार?

मुनगंटीवारांच्या या विधानावर बोलताना अजित पवार म्हणाले, ‘तुम्ही किती जरी म्हणालात की सारखं यांचंच चालतं, त्यांचंच चालतं, मुनगंटीवार कितीही म्हणाले, आमची चूक झाली, आमची चूक झाली. पण आता माफी नाही’. असं म्हणता म्हणता अजित पवारांनी थेट बाजूलाच बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाहून प्रश्न विचारला, ‘चुकीला माफी नाही ना?’ त्यांच्या या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी बाकांवर देखील जोरदार हशा पिकला! चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार देखील खळखळून हसताना यावेळी दिसले. भाजपच्या चुकीला माफ करून पुन्हा भाजपसोबत जाण्याचा विचार नाही ना? असाच अर्थ अजित पवारांच्या या प्रश्नामध्ये होता.

‘मी मुख्यमंत्र्यांच्या कानालाच लागून असतो’

पण अजित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत. अशी माफी मिळू नये, म्हणून आपण काय करतो, ते देखील अजित पवारांनी यावेळी सांगितलं! ‘सारखं उजव्या कानाला मी आणि डाव्या कानाला बाळासाहेब (थोरात) लागलेलो असतो (मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या), माफी नाही ना? माफी नाही ना?’ असं अजितदादांनी म्हणताच सभागृहातला हशा दुप्पट झाला.

- Advertisement -

‘तुम्हाला मागची सांभाळावी लागतील!’

दरम्यान, अजित पवारांच्या या लाफ्टर शोचा क्लायमॅक्स झाला तो सुधीर मुनगंटीवारांना दिलेल्या सल्ल्याने! ‘आम्ही परत (सत्तेत) येऊ’, असं समोरच्या बाकांवर बसलेल्या सुधीर मुनगंटीवारांनी म्हणताच अजित पवारांनी त्यांना आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. ‘माझं म्हणणं आहे की पुढची ५ वर्ष तुम्ही असं म्हणतच काढा. कारण ‘पुन्हा येऊ, पुन्हा येऊ’, असं म्हणतच तुम्हाला पुढची पाच वर्ष काढावी लागतील. नाहीतर तुमच्या मागं बसलेली (विरोधी पक्षाचे मागच्या बाकांवर बसलेले आमदार) पटापट इकडं-तिकडं उधळतील’, असा टोला अजित पवारांनी हाणला आणि सभागृहातल्या सगळ्यांनीच त्याला खळखळून हसत दाद दिली!

अजितदादांच्या प्रश्नावर विधानसभेत तुफान हशा! Ajit Pawar Creates Laughter in Vidhansabha

अजितदादांच्या प्रश्नावर विधानसभेत तुफान हशा! Ajit Pawar Creates Laughter in Vidhansabha

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಮಾರ್ಚ್ 13, 2020


हेही वाचा – आता आमदारांच्या गाड्यांसाठी प्रत्येकी ३० लाखांची घोषणा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -