घरताज्या घडामोडीहास्यजत्रा फेम अरूण कदम यांचे हळवे रूप; अनेक सामाजिक उपक्रम, महिला सक्षमिकरणाचा...

हास्यजत्रा फेम अरूण कदम यांचे हळवे रूप; अनेक सामाजिक उपक्रम, महिला सक्षमिकरणाचा उपक्रम

Subscribe

नाशिक : महाराष्ट्राची हास्यजत्रा तसेच कॉमेडीची बुलेट ट्रेन यासारख्या विनोदी मालिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसविणारे प्रसिद्ध मराठी कलाकार अरूण कदम आता राज्यातील महिला-मुलींना स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्टचे धडे देणार आहेत. आजकाल महिलांसह मुलींच्या छेडछाडीच्या वाढत्या घटना पाहता अभिनयासोबतच समाजासाठी असलेल्या सामाजिक बांधिलकीच्या नात्याने कदम यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. ‘माय महानगर’च्या कार्यालयात शुक्रवारी (दि.३०) दिलेल्या भेटीप्रसंगी त्यांनी या उपक्रमाची माहिती दिली.

अस्खलित आगरी-कोळी भाषा बोलत, व्यासपीठावर येत प्रेक्षकांना निखळ आनंद देणारे अरुण कदम यांनी अभिनय जगतात एक विनोदवीर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, कॉमेडीची बुलेट ट्रेन अशा विविध मालिकांच्या माध्यमातून कदम यांनी आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलेसे केले. एक अभिनेता म्हणून काम करत असताना अरूण कदम यांनी समाजाशी असलेली आपली बांधिलकीही जोपासली आहे. त्यांच्या विविध सामाजिक कार्यातून अभिनेत्याच्या आतल्या माणुसकीचे दर्शन घडते. याच सामाजिक जाणीवेतून अरूण कदम आता राज्यभरातील महिला, मुलींसाठी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण सुरू करत आहेत.

- Advertisement -

माय महानगरला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी या उपक्रमाविषयी बोलताना सांगितले की, एकदा मला केईएम हॉस्पिलटच्या वतीने अरूणा शानबाग यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले. शानबाग यांच्याविषयी मला माहिती होती. रुग्णालयातील या आता कार्यक्रमाला कॉमेडी कशी करायची या चिंतेत मी सापडलो. शानबाग यांच्याबाबत जो प्रसंग घडला तो इतर महिलांच्या बाबतीत घडू नये म्हणून मी मार्शल आर्ट्सचे प्रात्याक्षिक माझ्या शैलीत सादर केले. केईएमच्या डॉक्टरांशी बोलताना मला असे लक्षात आले की, पेशंटच्या मृत्यूनंतर काही घटनांमध्ये डॉक्टर, पारिचारिकांना मारहाण होते. त्यामुळे त्यांनाही स्वसंरक्षणाची आवश्यकता असते आणि याचवेळी मला या उपक्रमाची संकल्पना सूचली. आजची सभोवतालची परिस्थिती पाहता विविध भागांतून महिला-मुली गायब होत आहेत. दिवसभर घरात काम करून महिला वैतागलेल्या असतात. त्यामुळे रस्त्याने जाताना त्या तितक्या सावध नसतात. महिलांची मानसिकता, त्यांच्या कमकुवत बाजू आणि सद्यस्थिती याचा सारासार विचार केला असता, माझ्या असे लक्षात आले की, प्रत्येक महिलेला स्वसंरक्षणाचे धडे देणे आवश्यक आहे. त्यामुळेच मी या उपक्रमाची सुरूवात केली.

प्रशिक्षणासाठी मी चिपळून येथे एक प्रशिक्षण केंद्र सुरू करतोय. या उपक्रमाच्या प्रचारासाठी मी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन याविषयी जागरुकता निर्माण करतो आहे. या भेटीअंतर्गत विविध शाळांना भेटी देऊन प्रात्याक्षिके सादर करतो. सर्वत्र याबाबत प्रचार-प्रसार झाला तर महिला अधिक सुरक्षित राहू शकतील आणि मी आयुष्यात काही तरी करू शकलो, याचा मला विशेष आनंद वाटेल, असेही कदम म्हणाले.

- Advertisement -

नाशिकमध्ये व्हावी चित्रपट नगरी

नाशिक ही चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांची भूमी. येथे आता अनेक चित्रपट व मालिकांचे शूटिंगही होऊ लागले आहे. या माध्यमातून रोजगारही मिळतो. त्यामुळे नाशिकला चित्रपट नगरी व्हावी अशी एक कलाकार म्हणून माझी इच्छा असल्याचेही कदम म्हणाले.

कॅन्सरग्रस्तांसाठी सवलतीत उपचार

वैशाली फाउंडेशनच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त महिलांसाठी आमची संस्था काम करत आहे. विशेषतः स्तनाचा कर्करोग असलेल्या महिलांची नाना पालकर संस्थेमार्फत आरोग्य तपासणी करणे, त्यांना उपचारासाठी मदत करणे यावर अधिक भर दिला जातो आहे. याशिवाय संस्थेव्दारे बायपास सर्जरी, अँजिओग्राफी, डायलिसीस यांसारख्या वैद्यकीय उपचारांसाठी मदतही केली जाते.

आरोग्य तपासणी 

खर्डी येथील शाळेत कार्यक्रमानिमित्त गेलो तेव्हा तेथील मुख्याध्यापकांनी सांगितले की, शाळेतील मुले खूप हुशार आहेत. परंतु, हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे त्यांची कार्यक्षमता कमी होत आहे. हे ऐकताच मी केईएमच्या डॉक्टरांशी संपर्क साधला आणि या शाळेत आरोग्य शिबिर आयोजित करत सर्व मुलांच्या रक्ततपासण्या करत औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. आपल्या माध्यमातून गरिबांची सेवा घडावी, हाच यामागील मुख्य हेतू असून त्यादृष्टीने मी कार्य करत असल्याचे कदम यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -