घरताज्या घडामोडीशरद पवारांंच्या टार्गेटवर भुजबळ; येवल्याच्या माणिकराव शिंदेंनी केली राष्ट्रवादीत ‘एन्ट्री’

शरद पवारांंच्या टार्गेटवर भुजबळ; येवल्याच्या माणिकराव शिंदेंनी केली राष्ट्रवादीत ‘एन्ट्री’

Subscribe

नाशिक : छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी शरद पवार यांनी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांचा पत्ता ओपन केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अ‍ॅड. शिंदे यांनी भुजबळांच्या विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत त्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली होती. परंतु भुजबळांनी शरद पवारांना ‘जय महाराष्ट्र’ करताच शिंदेंची राष्ट्रवादीत पुन्हा ‘एन्ट्री’ झाली आहे. त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीत भुजबळ विरुद्ध अ‍ॅड. शिंदे अशी थेट आणि चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

येवल्यात तिसर्‍यांदा कुणालाही हॅट्र्रिकची संधी नाही, असा इतिहास पुसून काढत हेवीवेट नेते छगन भुजबळ यांनी दणदणीत विजय मिळविला होता. येवला मतदारसंघातील निवडणूक अटीतटीची व चुरशीची होईल अन् धक्कादायक निकाल लागेल, हा अंदाज निकालातून फोल ठरला होता. भुजबळ यांनी विजयाची हॅटट्रिक साधल्यानंतर त्यांच्या विरोधात काम करणार्‍या पक्षांतर्गत स्पर्धकांना बाजूला हटवण्यात आले. त्यात अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांना पहिल्या गाडीने रवाना करण्यात आले होते. अ‍ॅड. शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर दावा केला होता. महत्वाचे म्हणजे २००४ च्या विधानसभा निवडणुकीत भुजबळांना येवल्यात आणणारे अ‍ॅड. शिंदे यांचीच हकालपट्टी करण्यात आल्याने स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती.

- Advertisement -

प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी माणिकराव शिंदे यांना पक्षातून काढून टाकण्यात येत असल्याचे पत्र प्रसिद्धीस दिले होते. त्यात म्हटले होते की, छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अधिकृत उमेदवारी दिलेली असतानाही आपण पक्षाच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठीची जबाबदारी पार न पाडताना पक्षविरोधी भूमिका घेतली. भुजबळ यांचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार संभाजी पवार यांच्या जाहीर प्रचारात सहभागी होऊन भुजबळ यांच्या विरोधात खोटेनाटे आरोप करून त्यांना पराभूत करण्याचे आवाहन मतदारांना केले, असा उल्लेख पत्रात करण्यात आला होता. पक्षातून हकालपट्टी केल्याचा बदला घेण्यासाठी आता अ‍ॅड. शिंदेंनी पुन्हा एकदा भुजबळांविरोधात दंड थोपटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी प्रथमत: राष्ट्रवादी पक्षात पुन्हा प्रवेश केला आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमापूर्वी त्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

जिल्हा बँकेच्या माध्यमातून अ‍ॅड. शिंदे यांनी काम उभे केले असून त्यांच्या मागे मराठा समाजाची ताकद असल्याचे बोलले जाते. भुजबळ आजवर विरोधी पक्षात असल्यामुळे तसेच त्यांच्यावर पक्षाचीही मोठी जबाबदारी असल्यामुळे त्यांचे येवल्याकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जातो. या मतदारसंघात माळी समाजाच्या मतदारांची संख्या मोठी असली तरीही भुजबळांनी यातील विशिष्ट लोकांचीच कामे केल्याने उर्वरित समाजापैकी बरेचसे नाराज असल्याचे बोलले जाते. याच अनुषंगाने शरद पवार यांनी अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांना पक्षात घेऊन येवल्याचे समीकरण बदलण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसते. अर्थात अ‍ॅड. शिंदे सातत्याने घेत असलेली दलबदलू भूमिका लोकांना रुचणारी नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करून शिंदे गटात जाण्याचे संकेत दिले होते. परंतु प्रत्यक्षात त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे त्यांच्या विश्वासार्ह्यतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

येवल्यात तब्बल पाच तुल्यबळ उमेदवार

एकेकाळी येथील माजी आमदार मारोतराव पवार तसेच, सहकार नेते अंबादास बनकर हे थेट शरद पवारांच्या जवळचे नेते होते. यातील पवार शिवसेनेत आहे तर बनकर आजवर शरद पवारांसोबत होते. पण २०२४ च्या विधानसभेला चित्र पूर्णतः बदलण्याचे चिन्ह आहेत. सध्या येथून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्वतः भुजबळ, ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून कुणाल दराडे किंवा संभाजी पवार तर भाजपकडून अमृता पवार यांच्या नावाची चर्चा आहे. त्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांच्या उमेदवारीची भर पडू शकते.

येवल्यात भुजबळांचे पुनर्वसन करण्यासाठी आम्ही त्यांना साथ दिली. परंतु, नंतरच्या काळात आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता शरद पवार हेच आमचे दैवत असून आज मी पवार साहेबांची भेट घेतली. भुजबळांच्या अडचणीच्या काळात पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहिला; मात्र या नेत्याने पवार साहेबांची आज साथ सोडल्याने महाराष्ट्रातील पहिला सभा येवल्यात व्हावी अशी इच्छा पवार साहेबांनी माझ्याकडे व्यक्त केली. त्यानुसार त्यांचा आदेश शिरसावंद्य मानत 8 जुलै रोजी दुपारी ३ वाजता मार्केट कमेटीच्या आवारात सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. विधानसभा निवडणुकीत पवार साहेब देतील ती जबाबदारी स्विकारेल. : अ‍ॅड. माणिकराव शिंदे, शरद पवार समर्थक

सध्या नरो वा कुंजरोवा भूमिका

येवल्यात भुजबळ समर्थकांची मांदियाळी असली तरीही आजच्या परिस्थितीला येथील ज्येष्ठ नेते कोणत्याही एका गटात जायला तयार नाहीत. त्यांनी नरोवा कुंजरोवा भूमिका घेतलेली दिसते. पुढील राजकीय वातावरण बघून निर्णय घेऊ असे धोरण येथील स्थानिक नेते मंडळींनी घेतले असल्याचे दिसते. त्यामुळे शरद पवार यांच्या सभेला जरी ही नेतेमंडळी दिसली, तरीही त्यानंतर जर अजित पवार वा छगन भुजबळ यांची सभा झाली तर त्या सभेलाही ही मंडळी झाडून उपस्थित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -