घरमहाराष्ट्रफोटोच्या आधारावर इमेज खराब करता येत नाही, कॅसिनोतील आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

फोटोच्या आधारावर इमेज खराब करता येत नाही, कॅसिनोतील आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Subscribe

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांसमोर कॅसिनोतील फोटो प्रकरणी आपले मत स्पष्ट केले आहे. तर एका फोटोच्या आधारावर इमेज खराब करता येत नाही, असेही बावनकुळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक फोटो ट्वीट करत, महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत, असे म्हटले होते. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे ट्वीट टॅग करण्यात आले होते. हा फोटो भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा होता. तर ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलीकडे जाऊ शकत नाही, असा पलटवार भाजपाने त्याबाबत केला होता. पण आपण सहकुटुंब मकाऊला असल्याचे बावनकुळे यांनी तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर थोडक्यात स्पष्ट केले होते. परंतु, आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांसमोर येत या प्रकरणी आपले मत स्पष्ट केले आहे. तर एका फोटोच्या आधारावर इमेज खराब करता येत नाही, असेही बावनकुळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Chandrasekhar Bawankule’s reaction to the casino photo case)

हेही वाचा – आरक्षणासाठी जाट, मराठा एकत्र लढणार, 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार?

- Advertisement -

आज प्रसार माध्यमांशी कॅसिनोतील फोटोबाबत स्पष्टीकरण देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अशा कोणत्याही फोटोच्या आधारावर कोणाला इमेज खराब करता येत नाही. मोठा संघर्ष करून आम्ही इथपर्यंत आलो आहे. यामुळे परिवाराला ज्या पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न झाला तो चुकीचा आहे. मी महिन्याभरातून एकदाच घरी जातो. त्यामुळे यावेळी माझ्या कुटुंबाने तीन दिवसांचा वेळ मागितला आणि आम्ही हाँगकाँगला गेलो. त्या ठिकाणी कोणत्याही हॉटेलमध्ये गेला तरी कॅसिनो आहेच. त्याला क्रॉस करूनच तुम्हाला तुमच्या रुमपर्यंत किंवा जेवणाच्या ठिकाणापर्यंत जावे लागते. त्याचवेळी कोणीतरी हा फोटो काढला आणि बदनामी करण्याचा प्रयत्न केला.

तसेच, फोटोवरून आपल्याला आणि आपल्या परिवाराला, व्यक्तिगत जीवनामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. साडे तीन कोटी रुपये परदेशात नेता येत नाहीत. एक लाख रुपये जरी नेले तरीही तीन तीन वेळा चेकिंग केली जाते. तिथे माझे कोणीही मित्र नाहीत, किंवा हाँगकाँगमध्ये माझा पैसाही नाही. त्यामुळे इतके पैसे मी खर्च करण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच ज्यांना पैशाच्या या पळवाटा माहिती आहेत त्यांनीच हे आरोप केले आहेत. हा राजकारणाचा भाग आहे, असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून लगावण्यात आला आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरला म्हणजेच X या सोशल मीडिया साईटवर एका कॅसिनोतील फोटो ट्वीट केला होता. ज्यामध्ये एक व्यक्ती कॅसिनोत जुगार खेळताना दिसत आहे. पण फोटोतील व्यक्ती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे असल्याचे सांगण्यात आले. ज्यानंतर राज्यात एका नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली. “ते म्हणे.. फॅमिल सह मकाऊ ला गेले आहेत..जाऊ द्या. त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे.. कधीच जुगार खेळले नाहीत.. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!” असे ट्वीट संजय राऊत यांनी फोटो पोस्ट करत केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -