घरमहाराष्ट्रभिवंडीत परतीच्या पाऊसामुळे शेकडो हेक्टर भात शेतीचे नुकसान

भिवंडीत परतीच्या पाऊसामुळे शेकडो हेक्टर भात शेतीचे नुकसान

Subscribe

कृषी व महसूल कर्मचारी निवडणूकीत व्यस्त असल्याने नुकसानीच्या पंचनाम्यांकडे दुर्लक्ष

विधानसभेची रणधुमाळी सुरु असतानाच अचानकपणे मुसळधार पाऊसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी निवडणूकीच्या कामात व्यस्त असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या पावसामुळे तालुक्यातील ३ हजार हेक्टर हळव्या भात पिकाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भिवंडीत हळवे व गरवे अशी एकूण १८ हजार हेक्टर भातशेती आहे. त्यापैकी ३ हजार हेक्टर भातशेतीमध्ये हळवे पीक घेण्यात आले असून ते पीक पूर्णतः तयार झाल्याने शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी भात पिकाची कापणी करून ते घरात आणण्यासाठी लगबग सुरु केली आहे.

महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी विधानसभा निवडणूकीच्या कामात गुंतलेले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया संपताच शासन आदेशानुसार नुकसाग्रस्त भातशेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

-शशिकांत गायकवाड, तहसीलदार, भिवंडी

पावसाने शेतकरी चिंताग्रस्त

बहुतांश भागात शेतकऱ्यांनी गेल्या पाच दिवसांपासून हळव्या भाताची कापणी केली. मात्र परतीचा पाऊस रेंगाळल्याने पावसाने रिपरिप सुरु केली आहे. त्यामुळे कापणी केलेल्या भाताची करपे शेतातली पाण्यात तरंगू लागली आहेत. रिमझिम पडणारा पाऊस आणखीन काही दिवस असाच सुरु राहिल्यास भाताच्या कणसांना मोड येऊन भात पिकाची नासाडी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर संकट निर्माण होणार आहे. तर वर्षभर कुटूंबाचे पालन पोषण कसे करायचे? यामध्ये शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

- Advertisement -

परतीच्या पावसामुळे भातपीक नष्ट होण्याच्या मार्गावर

यावर्षीच्या उत्तम पाऊसामुळे शेतात सोन्यासारखे भाताचे पीक आले होते. बळीराजा खुशीत होता. मात्र परतीच्या पाऊसाने ठाण मांडल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. परतीच्या पाऊसाने शेतातील भातपीक कुजून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा, अंबाडी, खानिवली, वडवली, अनगांव, कवाड, कुंदे, दिघाशी, नांदकर, बापगांव, मुठवळ, चिंबीपाडा, कुहे, धामणे, खारबांव, पाये, पायगांव, खार्डी, एकसाल, सागांव, जुनांदुर्खी, टेंभवली, पालीवली, गाणे, फिरिंगपाडा, बासे, मैदे, पाश्चापूर आदी गावांसह तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांनी शेतातील तयार झालेल्या हळव्या भातपिकाची कापणी सुरु केली आहे, असे असताना दोन दिवसांपासून वरुण राजाची बळीराजावर खप्पा मर्जी झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी साचले असून कापणी केलेल्या भाताची करपे पाण्यावर तरंगल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी विधानसभा निवडणूकीच्या कामात गुंतलेले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया संपताच शासन आदेशानुसार नुकसाग्रस्त भातशेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

-शशिकांत गायकवाड, तहसीलदार, भिवंडी

त्यामुळे शेतकऱ्यांसमोर वर्षभराच्या खावटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर परतीचा पाऊस आणखी काही दिवस असाच पडत राहिला तर २०१७ या वर्षासारखेच शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. बळीराजा आणखीन कर्जबाजारी होण्याची शक्यता वाढली आहे. तरी शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

- Advertisement -

भिवंडीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सन २०१७ मध्ये परतीच्या पाऊसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामध्ये १२ हजार हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले होते तर २० हजार शेतकरी बाधीत झाले होते. त्यावेळी शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र भिवंडीतील महसूल अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे आजपावेतो शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य मिळालेले नाही. तशीच परिस्थिती यावर्षीही निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्याला हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत उपलब्ध करून दिली पाहिजे, असे खानिवली सेवा संस्थेचे चेअरमन किरण रामचंद्र वारघडे यांनी सांगितले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -