घरमहाराष्ट्रदासगावचा मासळी बाजार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

दासगावचा मासळी बाजार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

Subscribe

सुक्या मासळीचे दर गगनाला भिडले

तालुक्यातील दासगाव येथे भरणार्‍या मासळी बाजाराला गेले अनेक वर्षांची परंपरा आहे. यामुळे या परिसरात हा बाजार प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या बाजारात घाऊक व्यापार्‍यांची गर्दी वाढू लागल्याने हा बाजार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. सुक्या मासळीचे दर गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह घाऊक व्यापारी देखील हबकले आहेत.

हा आठवडा बाजार हा फक्त सुक्या मासळीसाठी प्रसिद्ध आहे. ब्रिटीश काळात या ठिकाणी बंदर होते. होडीच्या सहाय्याने या ठिकाणी सुकी मासळी आणि इतर मालाची ने-आण होत असे. या परिसरातील आणि महाड खाडीपट्टा ते थेट भोर, खानातून सुकी मासळी नेण्यासाठी या ठिकाणी ग्राहकांची गर्दी असते. दिघी, म्हसळे, श्रीवर्धन आदी ठिकाणांहून सुकी मासळी येते. चांगल्या दर्जाची सुकी मासळी दासगावमध्ये मिळत असल्याने आजदेखील कायम गर्दी असते. खिशाला परवडेल असा भाव या सुक्या मासळीला असल्याने मोठ्या प्रमाणात खरेदीला गर्दी असते. मात्र मागील काही वर्षापासून सुक्या मासळीचे दर प्रतिवर्षाला चढत गेले आहेत. सध्या तर हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत.

- Advertisement -

घाऊक व्यापार्‍यांची मागणी वाढल्याने आणि सुक्या मासळीची आवक कमी झाल्याने हे दर वाढले आहेत. दासगावमध्ये सध्या हे दर किलोला किमान पाचशेच्यावर आहेत. त्यातच आता पावसाळी खरेदी सुरू झाली असल्याने हे दर कायम आहेत. सोडा 1800 रुपये, सुके बोंबील 600 रुपये, अंबाडी 700 रुपये, कोलिम, वाकटी, सुकट आदींचे दर देखील पूर्वीपेक्षा दुप्पट झाले आहेत. यामुळे ग्राहक नाराज होऊन कमी खरेदी करुन पाठ फिरवत आहेत. या बाजारावर आता घाऊक व्यापार्‍यांची नजर असल्याने ते येथे मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. आपला माल एकाच वेळी संपत असल्याने सुकी मासळी विक्रेते देखील सर्वसामान्य ग्राहकांकडे फारसे लक्ष देत नाहीत.

दासगावच्या बाजाराला ऐतिहासिक महत्त्व असले तरी ज्या दासगावमध्ये हा बाजार भरतो तेथे या विक्रेत्यांना आणि खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांना सोयीसुविधांचा अभाव आहे. दासगाव ग्रामपंचायत या व्यापार्‍यांकडून फक्त 20 रुपये कर वसुली करते, तर कृषी उत्पन्न बाजार समिती 40 टक्केकर वसुली करीत आहे. दासगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत हा बाजार असला तरी कृषी उत्पन्न बाजार समिती येथून कर वसुली करते. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने सोयीसुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी सरपंच दिलीप उकिर्डे यांनी केली.

- Advertisement -

वास्तविक पाहता हा बाजार सर्वसामन्यांना परवडेल अशा पद्धतीत कसा राहील आणि दर आवाक्यात कसे येतील याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे, ज्यामुळे दासगावच्या बाजाराची परंपरा कायम राहील.
-रवी जाधव, ग्राहक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -