घरमहाराष्ट्रराष्ट्रपती राजवटीवरून राणे- मुनगंटीवार यांच्यात जुंपली

राष्ट्रपती राजवटीवरून राणे- मुनगंटीवार यांच्यात जुंपली

Subscribe

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून भाजपमध्येच वाद निर्माण झाले आहेत. करोना संकटाचा सामना करण्यास ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी नारायण राणे यांनी राज्यपालांकडे केली होती. त्यानंतर भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ती राणे यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे सांगत पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावर नारायण राणे चांगलेच भडकले. सुधीर मुनगुंटीवार यांना मी विचारत नाही. कोणी मला सांगावे असेही नाही. मी केलेली मागणी ही पक्षाची भूमिका आहे, असे कधीही म्हणालो नाही हे मुनगंटीवारांना जाऊन सांगा, असे नारायण राणे म्हणाले. दरम्यान, हे सरकार लोकांना वाचवण्यात अपयशी आहे. महाराष्ट्राच्या जनतेला वाचवा, अशी मागणी मी केंद्र सरकार आणि राज्यपालांकडे केली आहे. मी भाजपच्या नेत्यांना विचारायला गेलेलो नाही. ते वरिष्ठ असतील, पण मीदेखील माजी मुख्यमंत्री आहे. मी काय काल राजकारणात आलेलो नाही, असे देखील नारायण राणे यावेळी म्हणालेत.

दरम्यान, संजय राऊत यांनी गुजरातमध्ये आधी राष्ट्रपती राजवट लावा, असे वक्तव्य केले त्या वक्तव्याचा देखील नारायण राणे यांनी समाचार घेतला. केंद्र सरकारने संजय राऊत यांना कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची हे सांगण्यासाठी सल्लागार म्हणून ठेवले आहे का?, असा टोला नारायण राणे यांनी लगावला. संजय राऊत बेताल बोलत असतात. संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील अपयशावर बोलावे. मुंबईत हजारो रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत, त्याचं उत्तर द्यावे, असेही राणे यावेळी म्हणाले. दरम्यान राष्ट्रपती राजवटीला इतके घाबरले की लगेच बैठका घेतल्या आणि सकाळी पत्रकार परिषद बोलावली, असा टोला देखील राणेंनी यावेळी लगावला. विशेष म्हणजे रुग्णाला वाचवू, कोणालाही मरू देणार नाही, अशी बोलण्याची धमक एकाही नेत्यात नाही, अशी टीका देखील नारायण राणे यांनी केली आहे. केंद्राकडे मागणी करताना स्वत: काही देत नाही. कोणत्याही रुग्णालयात पुरेशी सामग्री उपलब्ध नाही, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे

- Advertisement -

हे सरकार आपोआप जाईल 
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार स्थिर असल्याचे म्हटले असून, याबद्दल नारायण राणे यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर मी विश्वास ठेवणार नाही. महाराष्ट्रात स्थिर सरकार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पण जमत नाही. करोनाच्या बाबतीत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकार स्थिर आहे का अस्थिर आहे. सरकार राहणार की जाणार हे लवकरच कळेल, असे नारायण राणे म्हणालेत. ऑपरेशन लोटस राबवले जात आहे का याबद्दल त्यांनी नकार देत हे सरकार आपोआपच जाणार, सरकार आपण चालवू शकत नाही हे त्यांनाही माहिती असल्याचे राणे म्हणालेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -