घरताज्या घडामोडीDombivali Power Cut : डोंबिवलीत १४ तास बत्ती गुल, 9 हजार वीज...

Dombivali Power Cut : डोंबिवलीत १४ तास बत्ती गुल, 9 हजार वीज ग्राहकांना फटका

Subscribe

डोंबिवलीत भर उकाड्यातच विजेचा पुरवठा खंडित झाल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल झाले. डोंबिवलीतील ९ हजार वीज ग्राहकांचा विजेचा पुरवठा हा महावितरणच्या तांत्रिक अडचणीमुळे दिवसभर खंडित झाला होता. अनेक भागात सकाळी सात वाजल्यापासूनच वीज नसल्याची तक्रार नागरिकांनी दिली आहे. विजेचा पुरवठा करणाऱ्या केबलमध्ये बिघाड झाल्याने दिवसभर अनेक भागात वीज नसल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. तसेच रात्री ९ पर्यंत विजेचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे महावितरणच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.

आयरे गाव तसेच म्हात्रे नगर या भागात सकाळी ६.३० वाजल्यापासून वीज नसल्याची तक्रार नागरिकांनी महावितरणकडे केली होती. महावितरणच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार सकाळी ९.४० वाजता एका २२ केव्ही फीडर लाईनच्या विजेच्या वाहिनीत बिघाड झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विजेचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. या फीडरवर असलेले १४ ट्रान्सफॉर्मरला याचा फटका बसला आहे. परिणामी ९ हजार घरांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे. अनेकजण अद्यापही वर्क फ्रॉम होम करत असल्याने दिवसभर झालेल्या बत्ती गुलचा फटका मोठ्या प्रमाणात रहिवाशांना बसला. त्यामध्ये अनेक नागरिकांनी भर उकाड्यात विजेचा पुरवठा खंडित झाल्याने ऑनलाईन काम करणाऱ्यांसोबतच परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांचे हाल झाल्याचीही प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -