घरमहाराष्ट्रकेवळ ६६ रुपयांमध्ये ड्रोन बोट करणार नद्यांची स्वच्छता

केवळ ६६ रुपयांमध्ये ड्रोन बोट करणार नद्यांची स्वच्छता

Subscribe

महाराष्ट्र राज्यातल्या नद्या लवकरच मोकळा श्वास घेऊ शकणार आहेत. कारण आता नदीच्या कडेला उभे राहून नदी स्वच्छ करणे शक्य झाले आहे. यासाठी फक्त दिवसाला ६६/- रुपये मोजावे लागणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ड्रोन बोटची पहिली चाचणी पार पडली. त्यामुळे शहरातून वाहणारी पवना नदी स्वच्छ दिसणार आहे. शहरातील बहुतांश नागरिक हे घरातील कचरा आणि पूजेला वापरलेले साहित्य हे नदीत टाकून देतात यामुळे नद्यांवर कचरा साठलेला असतो आणि नद्या अस्वच्छ दिसतात पाण्यावर कचरा तरंगत असतो. हाच कचरा आता साफ होणार असून यासाठी ड्रोन बोटचा उपयोग होणार आहे.

स्टार्टअप इंडियाचा अविष्कार

नद्यांच्या पाण्यावर तरंगणारा कचरा ड्रोन बोट स्वच्छ करणार आहे. नदीच्या कडेला उभे राहून या बोटीवर रिमोटद्वारे कंट्रोल ठेवला जाऊ शकतो. त्यामुळे नदीच्या कानाकोपऱ्यात असणारा कचऱ्यापर्यंत या बोटीला पोहचता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या स्टार्ट अप योजनेत सागर डिफेन्स कंपनीने ही बोट सादर केली होती. या बोटची चाचणी सध्या पिंपरी चिंचवडमध्ये सुरू आहे.

- Advertisement -

ड्रोन बोट अशी करते काम

एकावेळी साडे तीनशे किलो कचरा स्वच्छ करण्याची क्षमता या ड्रोन बोटमध्ये आहे. बोट वापरण्यासाठी नदीत किंवा बोट सोबत जाण्याची गरज भासणार नाही. ड्रोन ऑपरेटर एकाच जागी उभे राहून, बोटीकडून चार किलोमीटर नदीचा भाग स्वच्छ करू शकतो. केवळ दोन तास चार्ज केल्यानंतर ही बोट दहा तास कचरा स्वच्छ करते, सलग चोवीस तास बोटीला कार्यरत ठेवायचे झाल्यास केवळ ६६ रुपये खर्च प्रशासनाला येणार आहे. मात्र एका ड्रोन बोटसाठी पंचवीस ते पस्तीस लाख रुपये मोजावे लागणार आहेत, अशी माहिती निकुंज पराशर (सागर डिफेन्स) यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे नदीत ही बोट ऑपरेट करणे आणि पाण्यावरचा कचरा साफ करणे तसे फार सोपे आहे. काही मिनिटांमध्येच ही ड्रोन बोट ऑपरेट करायला शिकले जाऊ शकते. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अथवा कोणत्याही महापालिकेचा या कंपनीशी करार झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र व्यक्ती ठेवण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे केवळ खर्च होणार आहे तो मेंटनन्सचा आणि बॅटरी चार्ज करण्याचा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ड्रोन बोटला ग्रीन सिग्नल दिल्यास ती राज्यभर राबवली जाणार आहे. राज्यातील नद्यांना मोकळा श्वास देण्यासाठी राज्य सरकारने हा पुढाकार घेतला आहे. तेंव्हा भविष्यात तुमच्या गावातील किंवा शहरातील नद्या ड्रोन बोटने स्वच्छ झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -