घरमहाराष्ट्रपावसाळी अधिवेशन 2023कापसाच्या मागणीचा मुद्दा भरकटला, एकनाथ खडसे-गिरीश महाजनांमध्ये झाली खडाजंगी

कापसाच्या मागणीचा मुद्दा भरकटला, एकनाथ खडसे-गिरीश महाजनांमध्ये झाली खडाजंगी

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद राज्यासाठी नवीन नाहीत. विधान परिषदेतदेखील या दोघांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली.

Maharashtra Monsoon Session 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद राज्यासाठी नवीन नाहीत. मात्र, गेल्या महिन्यांपासून या दोघांमधील वाद प्रचंड वाढलेला पाहायला मिळत आहे. हे दोघेही कायमच एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. विधान परिषदेतदेखील या दोघांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत असते. आज (ता. 03 ऑगस्ट) सभागृहात एकनाथ खडसे यांनी कापसाला मिळत नसलेल्या भावाचा मुद्दा उपस्थित केला. ते कापसाबाबत बोलत असतानाच मंत्री गिरीश महाजन हे सभागृहात दाखल झाले. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेला कापसाच्या भावाचा मुद्दा भरकटून या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक वार झाला. (Eknath Khadse and Girish Mahajan criticize each other)

हेही वाचा – बळजबरीने माप घेतले आणि विरोधी पक्षाच्या नेत्याचा कोट घालून मांडला अर्थसंकल्प; जयंत पाटलांनी सांगितला किस्सा

- Advertisement -

यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, कापसाच्या विषयावर सभागृहात वारंवार चर्चा करण्यात आली. अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडला आहे. कापसाचे भाव 12 हजार 500 रुपयांवरून 6 हजारांवर आले. त्यामुळे या कापसाची खरेदी बंद झाली असल्याने शेतकऱ्यांनी जुन्या कापसाचे करायचे काय? असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने यासंदर्भात मदत करावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली आहे. किमान प्रती क्विंटल 6 हजार रुपये दर देण्याची मागणीही करण्यात आली आहे. तुमचे मंत्री जेव्हा घोषणा करतात असे खडसे सांगत असतानाच गिरीश महाजन विधान परिषदेत आले ज्यानंतर खडसे म्हणाले की, गिरीश महाजनांनी कापसाच्या मुद्द्यावरून 10-12 दिवस आमरण उपोषण केले होते. ज्यानंतर त्यांना ते सोडावे लागले. त्यावेळी त्यांनी कापसाचा भाव 7 हजार रुपये मागितला होता. पण आजही कापसाला भाव नाही, अशी व्यथा खडसेंनी मांडली.

त्यामुळे या कापसाचे शेतकऱ्यांनी काय करावे? तो कापूस पेटवून द्यावा की फेकून द्यावा, हे सरकारने सांगावा. त्यामुळे कापसाच्या संदर्भात सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आली. याचवेळी खडसे यांनी टोला लगावत म्हटले की, गिरीश महाजन यांनी जर का याबाबत उत्तर दिले तर अधिक चांगले होईल कारण महाजनांनी या प्रकरणाचा वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यावेळी ते विरोधी पक्षात होते. आता ते सत्ताधारी पक्षात आहेत. ज्यावेळी गिरीश महाजनांनी उपोषण केले त्यावेळी त्याला मी पाठिंबा दिला होता, पण कापसासाठी 7 हजार रुपयांची मागणी करा असे मी सांगितले नव्हते, असे खडसे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

- Advertisement -

पुढे बोलताना ते म्हणाले की, जर का आता शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांचा भाव मिळत आहे तर गिरीश महाजन हे म्हणतात की ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. परंतु ते जवळचे आहेत की नाही याची खात्री नाही. कारण तसे असते तर महाजन हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री झाले असते, असा टोला खडसे यांनी लगावला. इतक्या वर्षांत त्यांना पालकमंत्री होऊ दिले नाही म्हणून ती खात्री नाही, असा टोलेबाजी खडसेंनी केली.

एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेवर बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, कापसाला आधी खूप भाव होते. पण आता ते कमी झाले आहेत. 50 टक्के कापूस हा शेतकऱ्यांच्या घरात आहे, याला महाजनांकडून सुद्धा दुजोरा देण्यात आला. खडसेंनी सांगितल्याप्रमाणे मी 10 दिवस उपोषणाला बसलो होतो. त्यावेळी 10 किलो वजन कमी झाले होते. पण खडसे म्हणाले तसे की मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे, परंतु मला असे काही वाटत नाही. तुम्ही तिथे आहात ते कसे आहात ते पाहा आधी. तुम्ही माझ्या पदाची चिंता करू नका. कुठे होता तुम्ही… कुठे गेलात तुम्ही असे प्रत्युत्तर गिरीश महाजनांनी दिले.

तसेच, तुम्ही कुठेच नव्हता. तुम्ही मागच्या दाराने आले आहात. तुमच्या मतदारसंघात तुम्ही जोरात पडलात. हे कोणाला सांगू नका. लोकांनी तुम्हाला कुठे नेऊन ठेवले. आपण दुध डेअरीतून गेलात, आपण जिल्हा बँकेतून गेलात. तुमच्या गावाची ग्रामपंचायत तुमच्याकडे नाही. तुमच्याकडची नगरपंचायत तुमच्याकडे नाही, काय तुमच्याकडे राहिले, असे म्हणत गिरीश महाजन यांनी खडसे यांनी चिमटा काढला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -