घरताज्या घडामोडीएकनाथ खडसेंना भाजपकडून आश्वासन

एकनाथ खडसेंना भाजपकडून आश्वासन

Subscribe

एकनाथ खडसेंनी भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन पक्षातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली असून त्यांच्या आक्षेपांवर योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन त्यांना पक्षाकडून देण्यात आलं आहे. मात्र, कारवाईनंतरच मी समाधानी आहे किंवा नाही, यासंदर्भात सांगेन, असं सूचक वक्तव्य देखील एकनाथ खडसेंनी केलं आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वाधिक जागा जिंकून देखील भाजपला राज्यात सत्तास्थापना करण्यात अपयश आल्यामुळे आता भाजपमध्ये नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर देखील अनेक नेत्यांनी आक्षेप घेतल्याचं वृत्त आहे. पक्षाचे राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नव्या सरकारच्या स्थापनेनंतर लागलीच बंडाचं निशाण फडकावलं होतं. ‘पक्षातल्याच काही लोकांनी विरोधात काम केल्यामुळेच पंकजा मुंडे, रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. राज्यातल्या नेतृत्वाने या पराभवाची जबाबदारी घ्यायला हवी’, असं म्हणत एकनाथ खडसेंनी तीव्र रोष व्यक्त केला होता. आता एकनाथ खडसेंना भाजपच्या केंद्रीय कार्याध्यक्षांकडून आश्वासन मिळालं आहे. जळगावमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली.

देवेंद्र फडणवीसांशी देखील चर्चा करणार…

एकनाथ खडसे यांनी पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता खडसेंनी त्यासंदर्भात माहिती दिली. ‘४ दिवसांपूर्वी जे. पी. नड्डांनी मला दिल्लीला बोलवून घेतलं होतं. माझ्याशी त्यांनी राजकीय स्थितीवर चर्चा केली. राज्यातली राजकीय स्थिती तसेच विविध ठिकाणी घडलेल्या घटनांची माहिती त्यांना मी दिली. आपल्याच कार्यकर्त्यांनी विरोधाचं काम केल्यामुळे काही ठिकाणी पराभव झाला, त्याची माहिती देखील त्यांनी घेतली. त्यावर त्यांनी मला चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे. सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्यासोबत देखील चर्चा करून एकत्र मिळून चांगला निर्णय घेऊ असं त्यांनी मला सांगितलं’, असं खडसे म्हणाले. तसेच, ‘देवेंद्र फडणवीस यांना देखील लवकरच बोलवून त्यांच्याशी चर्चा करू’, असं देखील आश्वासन दिल्याचं खडसेंनी सांगितलं.

- Advertisement -

कारवाई झाल्यानंतरच पुढचा निर्णय?

दरम्यान, या आश्वासनावर समाधानी आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर मात्र, खडसेंन सूचक विधान केलं. ‘आश्वासन दिल्यानंतर आता पक्षाकडून काय कारवाई केली जाते, ती झाल्यानंतरच मी समाधानी आहे किंवा नाही, हे सांगता येईल. पण जे. पी. नड्डांनी घेतलेली भूमिका मला सकारात्मक वाटली’, असं खडसे म्हणाले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे, पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. तसेच, स्वत: खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, विनोद तावडे या मंडळींना तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यामुळे, पक्षाचे राज्यातील ज्येष्ठ नेतृत्व बंडाळीच्या मार्गावर असल्याच्या जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -