घरमहाराष्ट्रपेट्रोल-डिझेल होणार 'पुराना', इलेक्ट्रिक चार्जिंगचा जमाना!

पेट्रोल-डिझेल होणार ‘पुराना’, इलेक्ट्रिक चार्जिंगचा जमाना!

Subscribe

मुंबईसह राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वैतागलेल्या मुंबईकरांना आता इलेक्ट्रिक चार्जिंगचा नवा पर्याय येणार आहे. इलेक्ट्रीक कार आणि बाईक चार्जिंगसाठी स्टेशन उभारले जाणार आहे. यासाठी अनेक कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. यामुळे प्रदुषणाला आळा बसणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज होणाऱ्या चढ-उतारामुळे हैराण झालेल्यांना लवकरच इलेक्ट्रिक चार्जिंगचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबईसह राज्यात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरु होणार आहेत. डिझेल-पेट्रोलच्या तुलनेत अगदी निम्म्या पैशात इलेक्ट्रिक चार्जिंग करता येणार आहे. वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचा आराखडा तयार केला आहे. इलेक्ट्रिक कार आणि बाईक चार्जिंगसाठीचे जाळे संपुर्ण शहरात उभारण्यांची सुरूवात बेस्ट, टाटा, रिलायन्स एनर्जी आणि महावितरण या कंपन्यांनी केली आहे. महत्वाचं म्हणजे डिझेल, पेट्रोलमुळे होणाऱ्या प्रदुषणाला या इलेक्ट्रिक चार्जिंगच्या पर्यायामुळे आळा बसणार आहे.

पैशांची आणि इंधनाची होणार बचत!

बेस्टच्या सध्या सहा इलेक्ट्रिक बसेस मुंबईभर धावतात. १.२ किलोमीटरसाठी बेस्टच्या बसला १ लीटर डिझेल लागते. त्यासाठी ७२ रूपये खर्च येतो. तर, इलेक्ट्रिक चार्जिंगसाठी ८.२८ रूपये इतका खर्च येतो. त्यामुळे डिझेल, पेट्रोलच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर इंधनाची आणि पैशांची बचत होणे शक्य होणार आहे. बसच्या तुलनेत छोट्या वाहनांना इलेक्ट्रिक चार्जिंगचा चांगला फायदा होणार आहे. सध्या २०० किलोमीटर अंतर कापले जाईल इतक्या क्षमतेच्या बॅटरीसह कार आणि बसचे तंत्रज्ञान भारतात उपलब्ध आहे.

- Advertisement -

या कंपन्यांनी घेतला पुढाकार

टाटा पॉवर

इलेक्ट्रिक गाड्यांचा अवलंब करणाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी टाटा पॉवरने पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी इलेक्ट्रिक सुविधांचे जाळे उभारण्याचे ध्येय बाळगलं आहे. २०३० पर्यंत असंख्य लोकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचे देशाचे ध्येय गाठण्यासाठी टाटा पॉवरने स्मार्ट चार्जिंग सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. हेच महत्त्वाकांक्षी ध्येय डोळ्यासमोर ठेवून टाटा पॉवरने बहुसंख्य लोकांसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे ठरवले आहे.

याठिकाणी असणार टाटाचे चार्जिंग स्टेशन

मुंबईतील माटुंगा, भांडुप (एलबीएस मार्ग), चेंबुर, मालाड, कर्नाक बंदर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, बोरिवली, मानखुर्द, आयटीसी परळ, विक्रोळी, पॅलेडियम मॉल, फिनिक्स, कुर्ला याठिकाणी टाटाचे चार्जिंग स्टेशन असणार आहे.

- Advertisement -

रिलायन्स एनर्जी

आर इन्फ्रामार्फत मुंबई उपनगरामध्ये १५ ठिकाणी फास्ट आणि स्लो अशा इलेक्ट्रिक गाड्यांचा पर्याय देण्याचं ठरविलं आहे. मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी ही स्टेशन्स असतील. सध्या बोरिवलीमध्ये फास्ट आणि स्लो अशा तंत्रज्ञानावर आधारित एक चार्जिंग स्टेशन रिलायान्स एनर्जीने प्रायोगिक तत्त्वावर सुरु केले आहे.

बेस्ट

बेस्ट उपक्रमाने वाहतूक सेवेत याआधीच दोन इलेक्ट्रिकल बस खरेदी केल्या आहेत. तर आणखी ८० बस खरेदीसाठी बेस्टने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या कुलाबा येथील बॅकबे आगार आणि वरळी येथे इलेक्ट्रिक चार्जिंगची सुविधा उपलब्ध आहे. तर वाढत्या बसेसची संख्या पाहता धारावी येथेही चार्जिंग स्टेशन उभारण्याचे बेस्टचे नियोजन आहे. आगामी वर्षांमध्ये सर्व बसेस इलेक्ट्रिक करण्याचा प्रयत्न बेस्टमार्फत केला जाणार आहे.

महावितरण

महावितरणने राज्यात ५०० ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे उदिष्ट ठेवले आहे. त्यामध्ये सुरूवातीला प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येतील. पुण्यातील बाणेर आणि नागपुर येथून या स्टेशनची उभारणी करण्याचा महावितरणचा मानस आहे. मोठ्या शहरांमध्ये प्राधान्याने आणि इलेक्ट्रिक कारची मागणी पाहून ही यंत्रणा अंमलात आणण्यात येणार आहे.

“वीज कंपन्यांनी प्राधान्याने सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यायला हवे. बस, ओला, उबर यासारख्या अॅग्रेगेटर कंपन्यांसाठी इलेक्ट्रिक चार्जिंगच्या सुविधेची मागणी सुरूवातीला सर्वाधिक असेल. यापुढचे आव्हान म्हणजे फास्ट चार्जिंगची सुविधा असेल. या तंत्रज्ञानाचा वापर करणारे कोणते ग्राहक सर्वाधिक असतील हे ओळखून वीज यंत्रणांनी सुविधा पुरवायला हव्यात.” – अश्विन गंभीर, फेलो प्रयास एनर्जी गट

 

इलेक्ट्रिक कारची उलाढाल

सध्याची इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी एका महिन्यामध्ये ३०० कार ऐवढी आहे. २०२२ अखेरीस इलेक्ट्रिक कारचं उत्पादन एका महिन्यामध्ये २ लाखांपर्यंत पोहचेल. आगामी चार वर्षांमध्ये महिंद्रा ग्रुपची ९०० कोटी रूपयांची गुंतवणुक आहे.

इलेक्ट्रिक कार उत्पादन

पहिला टप्पा – मुख्य आठ शहरांमध्ये इलेक्ट्रिकल गाड्यांच्या अंमलबजावणीसाठी गुंतवणुक कार मॅन्युफॅक्चर्समार्फत होत आहे.
दुसरा टप्पा – ओला, उबेर सारख्या एग्रेगेटर सेवांमार्फत इलेक्ट्रिक कारची खरेदी केली जाणार आहे.
तिसरा टप्पा – वैयक्तिक कार खरेदी करणाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक कारची ही सेवा असणार आहे.

बॅटरी तंत्रज्ञान

सध्या इलेक्ट्रिक कारसाठी लिथिअम बॅटरी भारतात आयात करावी लागते. भारतात लिथिअमच्या कमतरतेमुळे सगळी भिस्त ही लॅटिन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेवर आहे. त्यामुळे जस बॅटरीच्या तंत्रज्ञानात प्रगती होईल तसं हे तंत्रज्ञान आणखी स्वस्त होईल. त्याचा फायदा इलेक्ट्रिक कार स्वस्त होण्यासाठी होईल. २०० किलोमीटर अंतर कापले जाईल इतक्या क्षमतेच्या बॅटरी सध्या बाजारात उपलब्ध आहेत. आगामी काळात या क्षमतेत वाढ झाल्यास इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये वाढ होईल.

वाहतूक उपक्रमाला सबसिडी

अवजड उद्योग मंत्रालयातर्फे सार्वजनिक क्षेत्रात बस वाहतुक पुरवणाऱ्या उपक्रमांसाठी ६० टक्के अनुदान देण्यात आले आहे. सध्याचा डिझेल, सीएनजीच्या तुलनेत इलेक्ट्रिक बससाठी येणारा खर्च जास्त होणे यामधून अपेक्षित आहे. सबसिडी देण्यामध्ये राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज संस्थेचा वाटा ४० टक्के असणार आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -