घरमहाराष्ट्रराज्याच्या अर्थव्यवस्थेला नव्याने उभारी; विकासदरात 12.1 टक्के वाढ

राज्याच्या अर्थव्यवस्थेला नव्याने उभारी; विकासदरात 12.1 टक्के वाढ

Subscribe

सन 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवालातून राज्याच्या अर्थव्यवस्थेचे  आश्वासक  चित्र समोर आल्याने राज्य सरकरला मोठा दिलासा मिळाला आहे. मार्च 2020 मध्ये राज्यात कोरोनाने शिरकाव केल्यापासून राज्याची अर्थव्यवस्था कुंठीत झाली होती. गेल्या वर्षी विकासदर घसरला होता. शिवाय कृषी आणि विविध क्षेत्राची पिछेहाट झाली होती.

मुंबई : कोरोना प्रतिबंधित लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी, कोरोना काळात केलेल्या उपाययोजना आणि टप्प्याटप्प्याने हटवलेले निर्बंध यामुळे  कोरोनाचा  झाकोळ दूर होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेने  उभारी घेतली आहे. गेल्या वर्षी आठ टक्क्याने  घसरलेल्या विकास दरात 12.1  वाढ अपेक्षित असून कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राने राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावल्याचे आर्थिक पाहणी अहवालाची  आकडेवारी  सांगते.

राज्याची अर्थव्यवस्था कात टाकत असताना सरकारचा  महसुली जमेचा अंदाज चुकला आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली जमा 3 लाख 68 हजार 987 कोटी रुपये अपेक्षित होती. यात घट होऊन आता सुधारित अंदाजानुसार महसुली जमा 2 लाख 89 हजार 498 कोटी रुपये अपेक्षित आहे. चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर महिन्यापर्यंत 1 लाख 80 हजार 954 कोटी रुपये म्हणजेच अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 49 टक्के प्रत्यक्ष महसुली जमा होती. महसुली जमा कमी असल्याने महसुली खर्च सुधारित अंदाजानुसार 3 लाख 35 हजार 675 कोटी रुपये असणार आहे. महसुली खर्चाचा अर्थसंकल्पीय अंदाज 3 लाख 79 हजार 213 कोटी रुपये होता.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज वर्ष 2021-22 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत हा अहवाल ठेवला. सन 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवालातून राज्याच्या अर्थव्यवस्थेचे  आश्वासक  चित्र समोर आल्याने राज्य सरकरला मोठा दिलासा मिळाला आहे. मार्च 2020 मध्ये राज्यात कोरोनाने शिरकाव केल्यापासून राज्याची अर्थव्यवस्था कुंठीत झाली होती. गेल्या वर्षी विकासदर घसरला होता. शिवाय कृषी आणि विविध क्षेत्राची पिछेहाट झाली होती.मात्र, कोरोनाचे संकट हळूहळू दूर होऊ लागल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेने आपली घोडदौड सुरू केली आहे. 2021-22 या वर्षात कृषी आणि संलग्न क्षेत्रात 4.4, उद्योग क्षेत्रात 19.1 तर सेवा क्षेत्रात 13.5 टक्के वाढ अपेक्षित आहे. शिवाय पशुसंवर्धन, वने आणि लाकूड तोडणी, मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यशेती यात अनुक्रमे 6.9, 7.2 आणि 1.6 टक्के वाढ होणार आहे. दरडोई राज्य उत्पन्नात वाढ दाखवण्यात आली आहे. 2020-21 मध्ये दरडोई राज्य उत्पन्न 1 लाख 93 हजार 211 रुपये होते. पूर्वानुमानानुसार 2021-22 मध्ये राज्य दरडोई उत्पन्न 2 लाख 25 हजार 73 कोटी रुपये इतके असणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षात राज्य वस्तू सेवा कर, विक्रीकर, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी, राज्य उत्पादन शुल्क यातून सरकरी तिजोरीत मोठी भर पडली आहे.

6 लाख कोटींपेक्षा अधिक कर्जभार 

या वर्षी राज्य सरकाला कोरोनासह नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. त्यामुळे सरकारला खुल्या बाजारातून कर्ज काढावे लागले. परिणामी राज्यावरील कर्ज्भार वाढला आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार मार्च 2022 पर्यंत राज्यावर 5 लाख 25 हजार 862 कोटी रुपयांचे कर्ज अपेक्षित होते. मात्र, कर्जाचा आकडा वाढून 6 लाख 15 हजार 170 कोटीवर पोहोचणार असल्याचा अंदाज आहे. अंदाजापेक्षा राज्यावरील कर्ज तब्बल 90 हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. राज्यावरील कर्जाचे राज्य स्थूल उत्पन्नाचे प्रमाण 19.2 टक्के असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

- Advertisement -
कोरोनात 1 लाख 42 हजार मृत्यू
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून 15 जानेवारी 2022 पर्यंत राज्यात कोरोनामुळे 1 लाख 42 हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती वार्षिक पाहणी अहवालात देण्यात आली आहे. राज्यात बाधित रुग्णांची संख्या 71 लाख 70 हजार इतकी होती. यापैकी 67 लाख 60 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 94.3 टक्के असून मृत्यू दर दोन टक्के असल्याचे अहवालात म्हटले आहे. राज्यात 17 फेब्रुवारी 2022 पर्यंत 18 वर्षांवरील एकूण 6 कोटी 48 लाख व्यक्तींचे तर 15 ते 18 वयोगटातील 45 लाख मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आर्थिक पाहणी अहवालाची वैशिष्ट्ये
>> मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत जून ते डिसेंबर 2021 मध्ये राज्यात 1.88 लाख कोटी गुंतवणूक आणि 3.34 लाख अपेक्षित रोजगार असलेले प्रस्ताव प्राप्त झाले.
>> महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल प्रोत्साहन धोरण 2018 अंतर्गत पाच इलेक्ट्रिक वाहन उत्पादन घटक आणि एका बॅटरी उत्पादन घटकाकडून 8 हजार 420 कोटी प्रस्तावित गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यामध्ये 9 हजार 500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.
>> अंदाजित किंमत 17 हजार 843 कोटी असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प प्रगतिपथावर आहे
मुंबई किनारा रस्ता प्रकल्प (दक्षिण) (अंदाजित किंमत 12 हजार 721 कोटी) प्रगतिपथावर असून, सप्टेंबर 2021 अखेर सुमारे 40 टक्के काम पूर्ण झाले.
>> मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत ठाणे-दिवा रेल्वे मार्गाच्या अतिरिक्त पाचवी आणि सहावी मार्गिका कार्यान्वित झाल्या.
>> मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाअंतर्गत दहिसर ते डी. एन. नगर (मेट्रो लाईन 2अ ) आणि अंधेरी (पू.) ते दहिसर (पू.) (मेट्रो लाईन 7 ) चे काम अंतिम टप्प्यात आहे.
>> कुलाबा-वांद्रे-सीप्झ (मेट्रो लाईन 3 ) अंदाजित किंमत 33 हजार 406 कोटी, वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली (मेट्रो लाईन 4 ) अंदाजित किंमत 14 हजार 549 कोटी, कासारवडवली-गायमुख (मेट्रो लाईन 4 अ ) अंदाजित किंमत 949 कोटी, ठाणे-भिवंडी-कल्याण (मेट्रो लाईन 5 ) अंदाजित किंमत 8 हजार 417 कोटी, स्वामी समर्थ नगर-विक्रोळी (मेट्रो लाईन 6 ) अंदाजित किंमत 6 हजार 716 कोटी, दहिसर (पू.)-मिरा भाईंदर आणि अंधेरी (मेट्रो लाईन 9 ) अंदाजित किंमत 6 हजार 607 कोटी असलेली कामे प्रगतिपथावर
>> नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि  पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प यांचे काम प्रगतीपथावर आहे.
>> नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (अंदाजित किंमत 14,179 कोटी)  विकसकाचे काम सुरू
——————————————————————————————————

हेही वाचाः Election Result 2022 : शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, पण मतं मात्र नोटापेक्षा कमी, देवेंद्र फडणवीसांचा टोला

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -