घरताज्या घडामोडीRashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणी IPS रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यात FIR...

Rashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणी IPS रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यात FIR दाखल

Subscribe

महाराष्ट्र पोलिसांच्या पुणे पोलिसांनी माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी रश्मि शुक्ला यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एखाद्या आयपीएस अधिकाऱ्यावर नजीकच्या काळात गुन्हा नोंद होणाऱ्या त्या दुसऱ्या अधिकारी आहेत. याआधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधातही भ्रष्टाचार आणि खंडणी वसुली प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. शुक्ला यांच्या विरोधात अवैध पद्धतीने फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रश्मि शुक्ला या सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. सध्या त्यांच्या सीआरपीएफ हैद्राबाद येथे अतिरिक्त महासंचालक पदाची जबाबदारी आहे. याआधी त्यांनी पुणे पोलीस आयुक्त म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. आयपीएस रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यातील बंद गार्डन पोलीस ठाणे येथे एफआयर दाखल झाली आहे. नाना पटोले यांचे बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅप केल्या प्रकरणात ही एफआयआऱ दाखल झाली आहे. भाजप सरकारच्या काळातील हे फोन टॅपिंग प्रकरण आहे.

- Advertisement -

इंडियन टेलिग्राफ अॅक्टनुसार रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हे फोन टॅपिंगचे प्रकरण २०१६-१७ या कालावधीतील आहे. नार्कोटिक्स स्मगलिंक प्रकरणात अमजद खान कनेक्शनमध्ये फोन टॅप झाल्याचा दावा नाना पटोलेंनी केला होता. त्यासोबतच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या स्वीय सहाय्यकाचा, भाजपचे खासदार संजय काकडे आणि इतर लोक प्रतिनिधींचे फोनही टॅप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मी खासदार असतानाचे हे प्रकरण होते. पण या काळात फोन टॅप करण्याचा प्रश्नच नव्हता. पण आमचे राजकीय करिअर खराब करण्यासाठीच हे प्रकार केले जात असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला होता.

याआधीच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या घोषणेनुसार फोन टॅपिंग प्रकरणात चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्रिसदस्यीय समितीने या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेत समितीची नेमणूक करण्यात आली होती. इतर सदस्यांमध्ये स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट, स्पेशल ब्रॅंचचे अतिरिक्त आयुक्त यांच्या उपस्थितीत चौकशी चालली. या समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालानुसारच या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला. रश्मी शुक्ला मार्च २०१६ ते जुलै २०१८ या कालावधीत राज्याच्या पोलीस आयुक्त होत्या. त्यांच्या या काळातच फोन टॅपिंगचे प्रकरण उघडकीस आले.

- Advertisement -

रश्मी शुक्ला यांनी कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय फोन टॅप केल्याचे समोर आले. या प्रकरणात एसआयडीकडे तक्रार करण्यात आली होती. तसेच मुंबई पोलिसांमध्ये मार्च २०२१ मध्ये एफआय़आर दाखल करण्यात आली. ऑफिशिअल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत बीकेसी पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग करतानाच गोपनीय कागदपत्रे लीक केल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात शुक्ला यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली होती.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -