घरमहाराष्ट्रRaj Thackeray : कोणती नवी समीकरणे? गुढीपाडवा मेळाव्यात मनसे स्पष्ट करणार 'राज'...

Raj Thackeray : कोणती नवी समीकरणे? गुढीपाडवा मेळाव्यात मनसे स्पष्ट करणार ‘राज’ की बात

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मंगळवारी गुढी पाडवा मेळावा आहे. या मेळाव्यात मनसे महायुतीत सहभागी होणार का, यावरील पडदा उचलला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मुंबई : साधारणत: पंधरा दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या चर्चेने जोर पकडला होता. मनसेच्या संभाव्य प्रवेशाबद्दल महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वागतच केले होते. मात्र, त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. आता उद्या, मंगळवारी मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार असून त्यात मनसेप्रमुख राज ठाकरे याबाबतची भूमिका स्पष्ट करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या 10 वर्षांत राज ठाकरे यांनी भाजपासंबंधीच्या भूमिकेत वारंवार बदल केला आहे. सुरुवातीला म्हणजेच, 2014मध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाचे जोरदार समर्थन राज ठाकरे यांनी केले होते. पण नंतर 2018-19च्या सुमारास त्यांनी कडवा विरोध केला. आपल्या प्रत्येक भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर चौफेर टीका केली.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : आमदार म्हणवून घेण्याची लाज वाटते, हितेंद्र ठाकूर यांचे परखड मत

याच दरम्यान राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेत हळूहळू बदल करण्यास सुरुवात केली. 2020च्या सुरुवातीला त्यांनी आपल्या झेंड्यात बदल केला. भगव्या रंगावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असा झेंडा त्यांनी स्वीकारला. तेव्हाच त्यांची भाजपाशी जवळीक वाढणार असल्याचे संकेत मिळाले होते. तर, आता 18-19 मार्च रोजी त्यांची अमित शहा यांच्याबरोबर नवी दिल्लीत बैठक झाली. दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट झाले नाही. मला या सांगितले आणि मी आलो, एवढेच राज ठाकरे त्यावेळी म्हणाले होते.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी नाशिक, दक्षिण मुंबईसह तीन जागांची मागणी केली होती. त्यानंतर ते दोन जागांबद्दल आग्रही होते, असे सांगण्यात येते. तर दुसरीकडे, महायुतीतील संभाव्य सहभागाबद्दल घटकपक्ष असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वागत केले आहे. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने त्याला विरोध केला.

त्यातच मनसेच्या महायुतीतील सहभागाला मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेनेकडून विरोध करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, डिसेंबर 2018मध्ये उत्तर भारतीय महापंचायत समितीच्या व्यासपीठावर जाऊन राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबद्दल मनसेची नेमकी काय भूमिका आहे, हे स्पष्ट केले होते. मात्र, तरीही उत्तर भारतीयांचा त्याला विरोध आहे. मतांचे राजकारण लक्षात घेता, भाजपाने तूर्तास तरी हा विषय थंड बस्त्यात ठेवल्याचे दिसते.

कदाचित, या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतल्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांना राज्यसभा आणि अमित ठाकरे यांना विधान परिषद सदस्यत्व भाजपाकडून दिले जाऊ शकते. त्यामुळे उद्या, मंगळवारी होणाऱ्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार आणि कोणती घोषणा करणार आहेत, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Thackeray group : ‘असत्यमेव जयते’ हेच मोदींच्या जीवनाचे सूत्र, ठाकरे गटाचा हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -