घरमहाराष्ट्रपुणेपुण्यातील भिडे वाड्यासंदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळली; 13 वर्षांनंतर भुजबळ यांच्या लढ्याला यश

पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळली; 13 वर्षांनंतर भुजबळ यांच्या लढ्याला यश

Subscribe

नाशिक : पुण्यातील भिडेवाड्यासंदर्भातील स्थानिक पोट भाडेकरूंनी पुणे महानगरपालिका व राज्यसरकारच्या विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली असून भिडेवाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यामुळे लवकरच या स्मारकाचे काम सुरु केले जाईल, असे सांगत आजच्या या निकालाबद्दल उच्च न्यायालयासह, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, ज्येष्ठ विधिज्ञ आशुतोष कुंभकोणी यांच्यासह राज्य शासनाचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. (HC dismisses plea regarding Bhide Wada in Pune Chhagan Bhujbals struggle succeeds after 13 years)

पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भातील तेथील स्थानिक पोट भाडेकरूंनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आज नाशिक येथील कार्यालयात मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भिडे वाड्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व्हावे, यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. या वाड्याबाबत स्थानिक पोट भाडेकरूंनी पुणे महानगरपालिका, महाराष्ट्र शासन यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने देखील विधिज्ञांची नेमणूक करून आपली बाजू सातत्याने मांडली होती.

- Advertisement -

हेही वाचा – ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी संविधान दिनी होणार भव्य सभा; विजय वडेट्टीवारांची माहिती

छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने पोट भाडेकरू यांच्या प्रश्नांबाबत तोडगा काढण्यासाठी डिसेंबर 2022 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतर या विषयाला गती मिळून पुणे महानगरपालिकेने सुद्धा याबाबत बैठका घेतल्या. पुणे महानगरपालिकेच्यावतीने बाजू मांडण्यासाठी राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विधिज्ञ आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती करण्यास मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतला होता शिवाय छगन भुजबळ हे उच्च न्यायालयातील तारखांना स्वतः उपस्थित राहत होते.

- Advertisement -

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्री शिक्षणाची गंगोत्री अन् भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या सोबतीने पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठीची पहिली शाळा सुरु करून शिक्षणाची कवाडं उघडली. मात्र, काळ सरला आणि हीच प्रेरणादायी शाळा अक्षरशः भग्नावस्थेत गेली. जागेचे प्रकरण न्यायालयात गेले आणि खटला वर्षानुवर्षे सुरु होता. सन 2010 मध्ये याठिकाणी स्मारक करण्याबाबत पुणे महानगरपालिकेने निर्णय घेतला. त्यानंतर येथील पोट भाडेकरूंनी उच्च न्यायालयात पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र शासन यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती.

हेही वाचा – अनेकांचे जीव धोक्यात घालणाऱ्यांवर…; समृद्धी महामार्गावरील ‘त्या’ व्हिडीओप्रकरणी फडणवीसांची प्रतिक्रिया

न्यायमूर्ती जी. एस. पटेल व न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठाने आज याबाबत निर्णय दिला. यासाठी राज्यशासनाच्यावतीने राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी तर पुणे महानगरपालिकेच्यावतीने माजी महाधिवक्ता ज्येष्ठ विधिज्ञ आशुतोष कुंभकोणी यांनी उच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली. गेल्या 13 वर्षांपासून सुरू असलेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या लढ्याला त्यामुळे यश आले आहे. आता पुणे येथील भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असेही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते व ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी अनेकदा आंदोलने केली होती. याठिकाणी स्मारक उभारण्याचा पुणे महानगरपालिकेने निर्णय घेतल्यानंतर याविरोधात वाड्यातील पोट भाडेकरुंकडून उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. सदर जागेवर दावा करतानाच या ठिकाणी शाळा असल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याने महापालिकेचा निर्णय बेकायदेशीर असल्याबद्दल भाडेकरुनी याचिका केली होती. याठिकाणी सावित्रीबाई फुले यांची शाळा असल्याचे पुरावे गोळा करण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत दिवंगत प्रा. हरी नरके यांनी अतिशय मेहनत घेऊन शाळा असल्याबाबत पुरावे गोळा केले होते. तसेच यासाठी कोल्हापूर विद्यापीठातील प्रा. मंजुश्री पवार यांची सुद्धा यासाठी मदत घेतली होती.

हेही वाचा – अजित पवार गटाला मीरा बोरवणकरांचे थेट आव्हान, म्हणाल्या – ‘अब्रूनुकसानीचा दावा करावा.’

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने जल्लोष

भिडे वाड्याच्या संदर्भात उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आज नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मंत्री छगन भुजबळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच फटाके फोडत, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पेढे भरवत जल्लोष साजरा केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्षा कविता कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्षा पूजा आहेर एंडाईत, महिला शहराध्यक्षा आशा भंदुरे, किशोरी खैरनार, अमोल नाईक, प्रा.ज्ञानेश्वर महाजन, रवींद्र शिंदे, संदीप गांगुर्डे, अमर वझरे, नाना पवार, भारत जाधव, प्रकाश माळी, अमोल कमोद, उपेश कानडे, प्रा. मोहन माळी, निशा झनके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -