घरमहाराष्ट्रनाशिकअतिवृष्टी इफेक्ट : बाजारातून भाजीपाला गायब; जो आहे तोही प्रचंड महाग

अतिवृष्टी इफेक्ट : बाजारातून भाजीपाला गायब; जो आहे तोही प्रचंड महाग

Subscribe

नाशिक : भाजी मंडईत दिवाळीनंतर भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोथंबीर जुडी तब्बल शंभर रुपये प्रतीनग तर टोमॅटो पन्नास ते शंभर रुपये प्रतीकिलो वर पोहचले आहे. त्यामुळे गृहिणींची डोकेदुखी वाढली असून स्वयंपाकात ‘भाजी करावी तरी कोणती, बाजारात एकतर भाज्याच नाहीत, आहेत त्याही प्रचंड महाग’ अशी ओरड प्रत्येक घरात ऐकू येत आहे. यंदाच्या मोसमात सरासरी पेक्षा जास्त पर्यजन्यमान झाले. त्याचसोबत परतीच्या पावसात झालेल्या अतिवृष्टीनेही शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. याचमुळे बाजारात येणार्‍या शेतमालाची आवक २० ते ३० टक्क्यावर आली आहे. आवक घटल्याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर होऊन भाज्यांचे दर कडाडले आहेत. भाज्यांचे दर जरी वाढले असले तरी सद्यस्थितीला अत्यल्प शेतकर्‍यांकडे शेतमाल शिल्लक आहे. त्यामुळे या वाढलेल्या दरांचा शेतकर्‍यांनाही विशेष फायदा नाही.

सध्या दिवाळीचे दिवस असून किराणापासून ते भाजीपाला पर्यंत सर्वच गोष्टीच्या खरेदीवर जोर दिला जात आहे. दरम्यान रोजच्या जेवणात चवीसाठी वापरली जाणारी कोथिंबीर, टोमॅटो, आदींसह इतर भाजीपाला सुद्धा आता महागाईच्या शर्यतीत उतरला आहे. काही दिवसांपूर्वीच शहरात कोथंबीरीला 200 भाव मिळाला होता. आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले होते. त्यानंतर कोथंबीरीने माघार घेत ३० ते चाळीस रुपयांवर जुडी आली होती. तर मागील वर्षी टोमॅटोनेही प्रतिजाळी बाराशे ते पंधराशेच टप्पा सर केला होता. त्यातच परतीच्या पावसाने देखील उघडीप दिल्याने मालाची अवाक वाढली होती. परिणामी भाव वधारला होता.

- Advertisement -

नाशिकमधून मुंबई आणि इतर ठिकाणीदेखील भाजीपाला पुरवठा केला जातो. त्यामुळे नाशिकमध्ये भाव वाढल्यानंतर मुंबईमध्ये देखील भाजीपाल्याचे भाव वाढतात. आजच्या घडीला नाशिक बाजार समितीमध्ये पालेभाज्यांचे भाव कमी अधिक प्रमाणात वाढले आहेत. दरम्यान दिवाळीसाठी मजूर गावी गेल्याने शेतातून माल काढणीसाठी शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय मजूरच नसल्याने अनेक शेतकर्‍यांचा माल शेतातच पडून आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. यामुळे कोथिंबिर, मेथी, शेपू, कांदापात अशा पालेभाज्यांचे विशेष करून भाव वाढल्याचे परिस्थिती पाहायला मिळते. पालेभाज्या आणि भाजीपाल्यांची आवक घटल्याने मागचे काही दिवसांपासून हे भाव वाढत आहेत. शेतात पाणी साचून दलदलीसारखी स्थिती असल्याने भाजीपाला सडलाही आहे आणि भाज्या काढण्यासही अडचणी येत आहेत.आता नवीन भाज्या तयार होऊन बाजारात येण्यात किमान एक ते दीड महिना लागू शकतो. त्यामुळे आवक सुरळित होईपर्यंत भाज्यांचे दर चढेच राहाण्याची शक्यता आहे.

असे आहेत आजचे व आठ दिवसांपूर्वीचे दर

कोथिंबीर ४०-१००
टोमॅटो ५०-१००
फ्लॉवर ४०-५०
कोबी २०-३०
मेथी ३०-५०
पालक १०-३०
वांगे ४०-१००
पुदिना ५-१५
वाल ४०-९०
भेंडी २५-५०

- Advertisement -
अजून महिनाभर भाजीपाला चढयाच दरात

काही शेतकर्‍यांचे मोसमातील पावसाने तर काही शेतकर्‍यांचे परतीच्या अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. शेतमाल शेतातच सडून गेला आहे. या नुकसानीनंतर दुबार पेरणी केलेला भाजीपाला डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला बाजारात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच काळात बाजारातील भाजीपाल्याची आवक वाढायला सुरवात होईल. त्यानंतरच भाजीपाल्याचे वाढलेले दर कमी होण्यास मदत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -