घरCORONA UPDATEडॉ. जितेंद्र आव्हाडांनी कोरोना विरोधातली लढाई जिंकली

डॉ. जितेंद्र आव्हाडांनी कोरोना विरोधातली लढाई जिंकली

Subscribe

गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी कोरोना विषाणूला हरवल्यामुळे आता राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आपण देखील कोरोनाला हरवू शकतो, असा विश्वास नक्कीच निर्माण होईल.

गेल्या काही दिवसांपासून कोविड १९ विरोधात लढणारे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अखेर कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नेते आणि आव्हाड यांच्या सर्व पक्षीय मित्रपरिवाराने समाधान व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आव्हाड यांना प्रथम ज्युपिटर रुग्णालयात आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

फोर्टिस रुग्णालयात दाखल केल्यानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे स्वतः आव्हाडांच्या तब्येतीवर देखरेख ठेवून त्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देत होते. स्वतः ठाकरेंनी आव्हाड यांच्याशी फोनवरून संवाद साधत तब्येतीची विचारपूस केली होती. तसेच कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक देखील आव्हाडांच्या प्रकृतीचे अपडेट घेत होते. सर्वांनीच आव्हाड लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली होती. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची अत्यंत आस्थेने आणि काळजीने चौकशी केली. त्यावेळीही जितेंद्र आव्हाड यांनी एखाद्या विजयी योद्ध्या प्रमाणेच त्यांना उत्तर दिले.

- Advertisement -

मतदारसंघासाठी दिवस-रात्र २४ तास राबणारे जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी खरंतर हा अत्यंत कसोटीचा काळ होता. मात्र स्वतःचे गुरु आदरणीय शरद पवार यांच्यापासून संकटाशी अखंड संघर्ष करण्याची प्रेरणा घेतलेल्या आव्हाडांनी कोरोनाशी दोन हात करत अखेर विजयश्री खेचून आणली. पवार नामक गुरुचा कानमंत्र या शिष्याने खरा करून दाखवला. प्रचंड आणि दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड प्रतिकार शक्तीच्या जोरावर हा विजय आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये.

राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून गृहनिर्माण मंत्री आणि मुंब्रा-कळव्याचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे अखंडपणे आणि अविश्रांतपणे मतदारसंघातील गरजू, गोरगरिबांना अन्न वाटप करत होते. प्रतिदिन मुंब्रा आणि कळव्यातील सुमारे ७० हजार कुटुंबांना जितेंद्र आव्हाड यांच्यामार्फत रोज अन्न पाकिटांचे वाटप केले जात होते. मुंब्रा-कळवा हा दाट लोकवस्तीचा मतदारसंघ आहे. त्यातच या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी असल्यामुळे गरजू आणि गोरगरीब यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हातावर पोट असणारी गोरगरीब मंडळी अन्नधान्याच्या मदतीसाठी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत होती. लढवय्या बाण्याचे जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनाच्या अदृश्य संकटाशी लढाई सुरू केली.

- Advertisement -

गरिबांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. त्यामुळे आव्हाडांनी त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे उत्तम नेटवर्क तयार केले आणि मुंब्रा आणि कळवा येथील तब्बल ७० हजारांहून अधिक गरजू कुटुंबांना सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे भोजन अशा तीनही वेळी तयार अन्न पाकिटांचे तसेच खिचडीचे वाटप सुरू केले. यासाठी फार मोठी पूर्वतयारी करावी लागत असेल मात्र कार्यकर्त्यांचे मोठे वलय सोबत असल्यामुळे आव्हाड यांनी गरजू आणि गरिबांच्या दोन वेळच्या जेवणाची समस्या मार्गी लावली. मात्र जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला तस-तसे मुंब्रा कळव्यात कोरोणाचे रुग्ण वाढत राहीले आणि हळूहळू कोरोनाने कळत नकळत डॉक्टर आव्हाड यांनाही आपल्या विळख्यात कधी घेतले, हे कोणाला कळलेही नाही.

आव्हाड यांच्या बरोबरच त्यांचे सहकारी असलेल्या अन्य काही जणांनाही त्याचा संसर्ग झाला होता. त्यामुळे दक्षता म्हणून संबंधितांना क्वारंटाईन करून घेणे गरजेचे होते. अत्यंत नाईलाजाने जितेंद्र आव्हाड यांनी मनावर दगड ठेवून गरजूंना व गोरगरिबांना सुरू असलेले अन्न वाटप तातडीने थांबवण्याचे ठरवले. रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाल्यापासून डॉक्टर आव्हाड हे नॉटरिचेबल झाले होते. त्यांचे दोन्ही मोबाइल नंबर स्विच ऑफ होते. तर सोशल मीडियावर सतत ॲक्टिव्ह असणारे आव्हाड यांचे व्हाट्सअप, ट्विटर आणि फेसबुक अकाउंट ही या काळात पूर्णतः बंद होते. स्वतःच्या प्रकृतीची काळजी तसेच मानसिक दगदगीतून काही काळ सक्तीची विश्रांती म्हणून आव्हाड यांनी सोशल मीडियावरील त्यांचा वावर याकाळात पूर्णता थांबवला होता. मात्र आता ते कोरोना विषाणूपासून मुक्त झाले आहेत.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -