घरगणेशोत्सव 2023नाशिक जिल्ह्यात 906 गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’, तर शहरात 805 मंडळे

नाशिक जिल्ह्यात 906 गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’, तर शहरात 805 मंडळे

Subscribe

नाशिक : जिल्ह्यातील ९०६ गावांमध्ये यंदा ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेनुसार गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. जिल्ह्याभरात गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात यंदा लहान, मोठे, सार्वजनिक तसेच ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेसह सुमारे ३ हजार ४४१ मंडळांना परवानगी देण्यात आलेली आहे. गणेशोत्सवा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामीण पोलिसांकडून हद्दीनिहाय पेट्रोलिंग करून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

लाडक्या गणरायाचे मंगळवारी (ता.१९) मंगलमय वातावरणात स्वागत करण्यात आले. गणेशोत्सवाच्या पाश्वर्र्भूमीवर ग्रामीण पोलीस सज्जता बाळगली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. जिल्हाभरातील ४० पोलीस ठाण्याच्या हद्दीत कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांकडून परवानगीसाठी पोलीस ठाण्यामार्फत अर्ज केलेले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातील सुमारे ३ हजार सार्वजनिक लहान-मोठ्या गणेश मंडळांना परवानग्या देण्यात आलेल्या आहेत. सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणेनिहाय शांतता समितीच्या बैठका घेतल्या आहेत. याशिवाय संवेदनशील असलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -
जिल्ह्यात ४० ठिकाणी विसर्जन स्थळे

जिल्ह्यात ४० ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन स्थळे निश्चित करण्यात आले आहेत. मोठ्या विसर्जन स्थळांमध्ये नाशिक तालुका हद्दीत विल्होळा, आळंदी नदीवरील यशवंतनगर पूल, वाडीवर्‍हेजवळील मुकणे धरण, गणेश कुंड, मालेगाव कॅम्पच्या हद्दीतील किल्ला पोलीस ठाण्यांतर्गत संगमेश्वर महादेव घाट येथे मूर्ती विसर्जन करता येणार आहे.

नाशिक शहरात ८०५ गणेश मंडळे

 यंदा आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत वाढ झाली आहे. महापालिकेच्या एक खिडकी योजनेअंतर्गत मंगळवार (दि.१९) 805 मंडळांनी परवानगीसाठी अर्ज दाखल केली आहेत. यामध्ये परिमंडळ एकमधील 368 आणि परिमंडळमधील ४३७ मंडळांचा समावेश आहे. सर्वाधिक गणेश मंडळे नवीन नाशिक मधील (११२) आहेत. यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त असल्याने गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. मात्र, पोलिसांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करताना मंडळांना कसरत करावी लागत आहे. नियमांचे पालन करुन सार्वजनिक गणेशोत्सव दणक्यात साजरा व्हावा यासाठी मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी कंबर कसली आहे. चौक परिसर, मोकळे मैदान, इमारतीखालील वाहनतळ, रस्ता चौफुली अशा मोक्याच्या ठिकाणी मंडप उभारणीच्या कामांनी वेग घेतला आहे. मंडळांमार्फत परिसरातील नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका असल्याने लोकप्रतिनिधींकडून देणगी दिली जात आहे.

शहरातील पोलीस ठाणेनिहाय मंडळे

  • आडगाव ६८
  • म्हसरूळ ४५
  • सरकारवाडा २८
  • भद्रकाली ३९
  • गंगापूर ५२
  • मुंबई नाका ६६
  • अंबड ११२
  • सातपूर ९२
  • इंदिरानगर ५१
  • नाशिकरोड ५१
  • उपनगर ६७
  • देवळाली कॅम्प ६५
  • एकूण ८०५
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -