घरमहाराष्ट्रप्रफुल्ल पटेलांनी केलेल्या 'त्या' दाव्याचे जयंत पाटलांकडून खंडन, म्हणाले...

प्रफुल्ल पटेलांनी केलेल्या ‘त्या’ दाव्याचे जयंत पाटलांकडून खंडन, म्हणाले…

Subscribe

जून 2022 मध्ये जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता, असे प्रफुल्ल पटेल यांच्याकडून प्रसार माध्यमांना सांगण्यात आले होते. परंतु त्यांच्या या दाव्याचे जयंत पाटील यांनी खंडन केले आहे.

मुंबई : अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. अजित पवार यांनी 2 जुलैला काही आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यांच्या 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शरद पवार यांनी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केलेली असली तरी अजित पवार यांच्याकडून पक्षावर दावा करण्यात आला आहे. ज्यासंदर्भात आज (ता. 06 ऑक्टोबर) निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल त्यांच्याबाबत आणि जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत केलेल्या दाव्याचे खंडन केले आहे. (Jayant Patil refutes claim made by Prafull Patel)

हेही वाचा – राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगात आज सुनावणी, जयंत पाटलांनी केला मोठा दावा

- Advertisement -

जून 2022 मध्ये जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता, असे प्रफुल्ल पटेल यांच्याकडून प्रसार माध्यमांना सांगण्यात आले होते. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, हे अजिबात खरे नाही. आम्ही कुठलेही पत्र दिले नाही. जितेंद्र आव्हाड, मी किंवा अन्य कुणीही भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे अजित पवार गचाकडून शरद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्याबाबत करण्यात येणारा दावा जयंत पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा खोडून टाकण्यात आला आहे.

काय म्हणाले होते प्रफुल्ल पटेल?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर सुरत गाठून गुवाहाटीला जाण्याचे ठरवले त्याचवेळी ही घटना घडणार होती. अनिल देशमुख आणि नवाब मलिक त्यावेळी तुरुंगात होते. त्यामुळे त्यांना वगळता राष्ट्रवादीच्या इतर 51 आमदारांसह जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची इच्छा व्यक्त करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना पत्र दिले होते. तर शिंदेंचे बंड सुरू असताना जयंत पाटील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार होते. त्यांनी शरद पवारांना तेव्हा कॉल करून याबाबत कळवले होते. मात्र पवारांनी त्यांना रोखले. तसेच पुढचे दोन-तीन दिवस थांबा अन्यथा माध्यमांमध्ये चर्चा होईल असे पवारांकडून सांगण्यात आल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांच्याकडून करण्यात आला होता.

- Advertisement -

हा त्यांचा आत्मविश्वास…

अजित पवार गटाचे नेते आणि सरकारमधील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 6 तारखेला अपेक्षित निकाल लागेल असे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या विधानावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, हा त्यांचा आत्मविश्वास आहे, की निवडणूक आयोग हे ते म्हणतील त्याप्रमाणेच निर्णय देतील. पण हा त्यांचा आत्मविश्वास समोरच्या बाजूला फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा प्रश्न आता त्यांनाच विचारा, असेही जयंत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

पक्षाच्या चोऱ्या थांबाव्यात…

निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. पण त्यानिमित्ताने विठ्ठलाला काय साकडे घालाल? असा प्रश्न जयंत पाटील यांना पत्रकाराकडून विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले की, विठ्ठलाला साकडे एवढेच आहे की, भारतामध्ये पक्षाच्या ज्या चोऱ्या व्हायचे प्रमाण वाढले आहे. ते पक्षाची चोरी होऊ नये यासाठी विठ्ठलाने आता निवडणूक आयोगाला योग्य ती बुद्धी द्यावी आणि एका पक्षाची चोरी झाली त्याप्रमाणे दुसऱ्या पक्षाची चोरी होणार नाही. यासाठी ही विठ्ठलाचीच परीक्षा असल्याची मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -