घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या यात्रेवर अंडी, कडकनाथ कोंबड्या फेकल्या

मुख्यमंत्र्यांच्या यात्रेवर अंडी, कडकनाथ कोंबड्या फेकल्या

Subscribe

स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या ताफ्यावर चक्क कडकनाथ कोंबड्या फेकण्यात आल्या. ही घटना सोमवारी सांगली-सातारा मार्गावर घडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे अजब आंदोलन करताना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या भिरकावल्या. तसेच अंडीही फेकली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून राज्यात दौरा करत आहेत. या यात्रेदरम्यान, मुख्यमंत्र्यांचे अनेक ठिकाणी जोरदार स्वागत होत असताना काही ठिकाणी त्यांना जनतेच्या रोषालाही सामोरे जावे लागले आहे. अहमदनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर एका महिलेने शाई फेकली होती. ही घटना ताजी असताना सोमवारी त्यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेकण्यात आली. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सोमवारी सातारा येथून सांगलीला निघाली होती. त्यावेळी स्वाभिमानी संघटनेचे काही कार्यकर्ते पलूस तासगाव मार्गावर दबा धरून बसले होते.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा जवळ येताच हे कार्यकर्ते हातात कडकनाथ कोंबड्या घेऊन रस्त्याच्या मध्यभागी आले. मात्र त्याचवेळी भाजपचे काही कार्यकर्ते तेथे येऊन त्यांनी या स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बसच्या दिशेने कोंबड्या आणि अंडी फेकली. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी, स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना त्वरीत हटवल्यामुळे मुख्यमंत्र्यांची बस तेथे न थांबताच पुढे निघून गेली.

शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि कडकनाथ प्रकरणातील शेतकर्‍यांना न्याय मिळावा म्हणून स्वाभिमानी संघटनेने हे आंदोलन केले. स्वाभिमानी पक्षाचे संदीप राजोबा यांना पलुस पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -