घरमहाराष्ट्रही तर राष्ट्रवादीची बौद्धिक दिवाळखोरीच! - केशव उपाध्ये

ही तर राष्ट्रवादीची बौद्धिक दिवाळखोरीच! – केशव उपाध्ये

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांची ही मागणी दिवाळखोरीची असल्याचे केशव उपाध्ये म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ती दाखल करून घ्यावी की नाही, याविषयी बाजू मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे नोटीस बजावली आहे. या घटनेचे भांडवल करून राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे ही त्या पक्षाची बौद्धिक दिवाळखोरी असल्याचा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी लगावला.

नेमकं काय म्हणाले उपाध्ये?

केशव उपाध्ये म्हणाले की, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यात त्यांच्यावर दाखल सर्व प्रकरणांची माहिती स्पष्टपणे देण्यात आली होती. या संदर्भात यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आणि ती उच्च न्यायालयाने तथ्यहीन मानून फेटाळली होती. संबंधित याचिकाकर्त्यांविरुद्ध उच्च न्यायालयाने न्यायालयाच्या अवमानाची कारवाई सुद्धा प्रारंभ केली आणि सतत खोडसाळ याचिका दाखल करीत असल्याबद्दल कारवाई का करू नये, असेही विचारले होते. या पार्श्वभूमीवर आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नोटीस ही याचिका दाखल करून घ्यायची की नाही, यासंदर्भातील आहे. तेथे त्यावर योग्य ते उत्तर सादर केले जाईल. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेली नोटीस ही केवळ तांत्रिक स्वरुपाची आणि प्रक्रियेचा भाग म्हणून आहे. याचिकेचा हा अत्यंत प्राथमिक टप्पा आहे. तरीही त्यावरून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची बौद्धिक दिवाळखोरी आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

‘राष्ट्रवादीने राजीनाम्याची मागणी करणे हास्यास्पद’

केशव उपाध्ये पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला जळगाव घरकूल घोटाळाप्रकरणी अटक होईपर्यंत त्या पक्षाने त्याला मंत्रिपदावर कायम ठेवले होते. त्यांनी आता केवळ एका प्रक्रियेचा भाग म्हणून दिलेल्या नोटिशीचे भांडवल करणे हा कांगावा आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे गेल्या १५ वर्षांतील उद्योग जनता विसरलेली नाही. न्यायालयाने सणसणीत चपराक देऊनही अनेक नेते मंत्रीपदाचे मुकुट मिरवत राहिलेले राज्याने पाहिले आहेत. काही नेते जेलचा अनुभव घेऊन आले. तर काहीजण आजही जेलमध्ये आहेत. ‘याला झाकावे की त्याला झाकावे’ असा प्रश्न ज्या पक्षाला पडला होता आणि गैरव्यवहाराचे आरोप असणे ज्या पक्षात एकेकाळी पात्रता मानली गेली त्यांनी राजीनाम्याची मागणी करणे हास्यास्पद आहे, असे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. या पक्षाचे एक प्रवक्ते तर मंत्रीपदावर असताना बदनाम झाले आणि त्यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश सुद्धा झाला नव्हता, हा इतिहास इतकाही जुना झालेला नाही, असाही टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.


हेही वाचा – टँकरची योग्य आकडेवारी जाहीर करा- केशव उपाध्ये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -