घरमहाराष्ट्रकोल्हापूर-पुणे नवीन रेल्वे मार्गामुळे वेळेची आणि खर्चाची बचत!

कोल्हापूर-पुणे नवीन रेल्वे मार्गामुळे वेळेची आणि खर्चाची बचत!

Subscribe

पुणे-कोल्हापूर नवीन रेल्वे मार्ग झाल्यास मालाचा वाहतुकीचा खर्च वाचणार आहे.

कोल्हापूर-पुणे नवीन अतिजलद रेल्वे मार्गासंदर्भात येत्या पंधरा दिवसात प्राथमिक अहवाल सादर करावा, असे निर्देश परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी महारेलच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर-पुणे नवीन अतिजलद रेल्वे मार्ग, कोल्हापूर-वैभववाडी प्रस्तावित रेल्वे मार्गासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल, वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहिफळे, वनविभागाचे सहसचिव गावडे, परिवहन विभागाचे उपसचिव प्रकाश साबळे, महारेलचे अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रशांत मयेकर, कोल्हापूर विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य आनंद माने उपस्थित होते.

वेळेत बचत, उद्योगाला चालना

रेल्वे मार्गाने पुण्याहून कोल्हापूरला जाण्यासाठी सात तास लागतात. हे अंतर ३४० किलोमीटरचे आहे. सध्याचा रेल्वे मार्ग हा वळणावळणाचा आहे. त्यामुळे प्रवासास विलंब होतो. पुण्याहून कोल्हापूरला रस्त्याने गेल्यास साडेचार तास लागतात आणि ते अंतर २३० किलोमीटर इतके आहे. कोल्हापूर, सातारा, कराड या भागातून दररोज सुमारे २५ लाख लिटर दूध हे पुणे आणि मुंबई शहरांना पुरविण्यात येते. तसेच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातून दररोज २०० हून अधिक ट्रक भाजीपाला घेऊन पुण्या-मुंबईसाठी रवाना होतात. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात अनेक साखर कारखाने असून मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादित होतो. पुणे-कोल्हापूर नवीन रेल्वे मार्ग झाल्यास मालाचा वाहतुकीचा खर्चही वाचणार असून अडचणीत असणाऱ्या साखर कारखान्यांना त्याचा उपयोग होईल.

- Advertisement -

कोल्हापूर-वैभववाडी प्रस्तावित रेल्वे मार्ग

कोल्हापूर-वैभववाडी प्रस्तावित रेल्वे मार्गासंदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आली. १०७ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाची मान्यता प्राप्त झाली असून त्याचा समावेश रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आला. कोकण रेल्वे मंडळाने या प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवालही सादर केला आहे अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -