घरमहाराष्ट्रलॉकडाऊनचा सेलिब्रेशनला फटका

लॉकडाऊनचा सेलिब्रेशनला फटका

Subscribe

कोंबड्या, मटणाला मागणीच नाही

यंदाच्या कोरोनाच्या संकटामुळे आषाढी अमावस्येवर मांसाहारी खवय्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. एकीकडे लॉकडाऊन दुसरीकडे संचारबंदीआणि राज्य सरकारने रेस्टॉरंटवर कायम ठेवलेली बंदी यामुळे यंदा गटारीच सेलिब्रेशनच अडचणीत सापडले आहे. दरवर्षीच्या तुलनेत कोरोनाचा फटका खवय्यांसह पोल्ट्री आणि मटणाच्या व्यवसायातील लोकांनाही मोठा फटका बसला आहे. मुंबई महानगर क्षेत्रातच कोरोनाचे सावटअसल्याने यंदाच्या गटारीला मात्र भीतीचे सावट आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात दक्षिण मुंबई, मुंबई उपनगरे, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली यासारख्या भागातून कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते; पण यंदा मात्र ही मागणी निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. साधारणपणे आषाढीअमावास्येला रविवार जोडून आला तर नेहमीपेक्षा कोंबड्यांची मागणी जास्त असते. पण यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे मात्र या मागणीला मोठा फटका पडलेला आहे. गेल्यावर्षी आषाढी अमावस्येला ८ लाख कोंबड्यांची मागणी होती; पण यंदा ही मागणी साडेतीन लाख ते चार लाख याच घरात असेल अशी माहिती नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटीच्या मुंबईचे प्रतिनिधी मोरेश्वर देसाई यांनी दिली आहे.

- Advertisement -

यंदा कोरोनामुळे पोल्ट्री उत्पादनावरही फटका बसला असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा आषाढी अमावस्येचा कालावधी असतानाही पोल्ट्री उत्पादन हे ४० टक्क्यांवर खाली आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी बंद असलेली दुकाने तसेच घसरलेली मागणी याचा फटका उत्पादनालाही बसत आहे, असे त्यांनी सांगितले. पुण्यात लॉकडाऊन संपणार असल्याने त्या ठिकाणची मागणी वाढेल, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला.

मुंबईत बॉयलर कोंबडीचा दर आज किलोमागे १५० रुपये इतका होता. तर देशी कोंबडीसाठीचा दर २६० रुपये किलो इतका होता. मटणासाठी ग्राहकांना ६५० रुपये मोजावे लागले. तर अंड्याचा मुंबईतला दर आज ४ रूपये होता. दर वाढले तर त्याचा परिणाम हा लगेच मागणीवर होईल, त्यामुळे कोरोनाचा फटका सहन करूनही कोंबड्यांचे दर वाढलेले नाहीत. तुलनेत मटणाने मात्र ६५० रुपयांवर झेप घेतली आहे. दरवर्षी देवनार कत्तलखाना येथे ८० हजार ते ९० हजार बकरे कापले जातात. पण यंदा देवनारला कोरोनाच्या संकटामुळे बाजारच भरलेला नाही. त्यामुळे देवनारमध्ये कापले जाणारे मोठ्या प्रमाणातले बकर्‍याचे मटण यंदा मुंबई आणि परिसरात मिळणार नाही.

- Advertisement -

मुंबईकरांच्या आनंदाला लक्ष्मणरेषा

सोमवारी अमावस्या येत असली तरी मुंबईकरांनी रविवारी घरीच कुटुंबासोबत गटारी साजरी करण्याचा बेत आखला आहे. रविवारी लॉकडाऊनचे संकट नको म्हणून अनेक जण शनिवारीच तयारीला लागले होते. मुंबईत अनेक मद्यविक्री दुकानासमोर शनिवारी काही प्रमाणात गर्दी दिसून येत होती, तर मटणाच्या दुकानात देखील चिकन मटण खरेदी करताना अनेक जण दिसत होते. मात्र, पूर्वीसारखी ही संख्या मोठी नव्हती. मुंबईत लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर तसेच मद्यविक्रीला घरपोच सेवा देण्यासाठी परवानगी दिल्यामुळे मद्यविक्रीची दुकाने सुरूच राहतील. मात्र मुंबईकरांनी दुकानासमोर गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेले आहे. तसेच मुंबईत कोणीही इमारतीच्या गच्चीवर एकत्रित गटारीची पार्टी केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -