घरमहाराष्ट्रLoksabha 2024: सिंधुदुर्ग-रत्नागिरीत महायुतीची उमेदवारी 'यांना'; निवडणुकीनंतर Narayan Rane राज्यपाल पदी?

Loksabha 2024: सिंधुदुर्ग-रत्नागिरीत महायुतीची उमेदवारी ‘यांना’; निवडणुकीनंतर Narayan Rane राज्यपाल पदी?

Subscribe

Loksabha Election 2024 मुंबई – लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. कोकणातील सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महायुतीमधून कोण उमेदवार असणार यांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा गृहजिल्ह्या असलेला हा मतदारसंघ आहे. महायुतीत येथे उमेदवारांची रांग लागली आहे. भाजप आणि शिंदे गटात सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. येथून उमेदवारी कोणाला मिळणार आणि राणेंना उमेदवारी नाही मिळाली तर ते काय करणार? असा सवाल स्थानिक राजकीय वर्तृळात सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

विनायक राऊत यांना हॅट्ट्रिकची संधी 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ दहा वर्षांपासून शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी फुटीनंतर या मतदारसंघाचे गणितही बदलले आहे. राज्यात भाजपला अजित दादांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीची साथ मिळाली त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप आणखी मजबूत होणार आहे. खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांना या घडामोडींचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. या मतदारसंघातून खासदार विनायक राऊत यांना हॅट्ट्रिक साधण्यासाठी यंदा परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

- Advertisement -

शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच

दुसरीकडे, या मतदारसंघातून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण (Minister Ravindra Chavan) यांनी येथे तयारी सुरु केलीय. शिंदे गटाकडून उदय सामंतांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत. विशेष म्हणजे रोकेगा कौन, असं स्टेटस ठेवणाऱ्या किरण सामंतांनी काही तासांतच ”जर रवींद्र चव्हाणांना उमेदवारी मिळत असेल तर त्यांचा प्रचार करणार” असं सांगून जागा सोडण्याचीही तयारीही दर्शवली. शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा शिंदे गटाचीच असल्याचा दावा करत किरण सामंतचं हेच येथून लढणार असल्याचा दावा केलाय.

कोण आहेत किरण सामंत? 

किरण सामंत (Kiran Samant) यांची कोकणात ‘किंगमेकर’ अशी ओळख आहे. सर्व सामान्यांना कधीही उपलब्ध असणारे, कोणत्याही कामांसाठी पुढे असणारे, असे सर्वसामान्यांसोबत असणारे ते नेते आहेत. त्यांची ही वेगळी शैली आहे. किरण सामंत यांची व्यावसायिक, उद्योजक अशी ओळख आहे. उदय सामंत (Minister Uday Samant) यांच्या पाठीशी त्यांची भक्कम साथ आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ते शिंदे गटात सामील झाले. याआधी त्यांनी मशालीचं चिन्ह व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवल्याने उलट-सूलट चर्चा सुरु झाली होती.  ते शिवसेना ठाकरे गटात जाणार अशी चर्चा होती. मात्र काही वेळातच हे स्टेटस मागे घेण्यात आलं.

- Advertisement -

नारायण राणेंच्या नावाची चर्चा 

आता खुद्द नारायण राणे (Union Minister Narayan Rane)  यांच्याही नावाचीही चर्चा सुरु झाली आहे. राणेंच्या खासदरकीची मुदत फेब्रुवारीमध्ये संपत आहे.. त्यानंतर ते काय करणार असाही सवाल उपस्थित होतोय. गुरुवारी कुडाळच्या दौऱ्यावर आलेल्या नारायण राणेंनी, ‘आता जे टिवटिव करत आहेत ते बंद होईल. या जागेवर भाजप अधिकार सांगेल, आता कोणतीही कुस्ती नाही, खो खो नाही, कबड्डी नाही. आमच्याकडे जे होईल ते सामोपचाराने होईल. जो उमेदवार असेल तो नक्की 100 टक्के जिंकेल’,असा विश्वास व्यक्त केलाय.

रवींद्र चव्हाणांच्या नावाची सर्वाधिक चर्चा 

गेल्या 10 वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार देण्यास शिंदे गट माघार घेणार नाही हे निश्चित मानले जाते. आगामी निवडणूक शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची झालीये. उमेदवार आमचाच असेल पण निर्णय वरिष्ठ नेते घेतील असं शिंदे गटाकडून वारंवार सांगण्यात येतं. मात्र, दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांचं नावही अचानक चर्चेमध्ये येण्यासाठी अनेक कारणं आहेत. चव्हाण हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे. पालकमंत्री झाल्यापासून त्यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरीत पक्ष वाढवण्यावर भर दिला आहे. ‘पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी निष्ठेनं पार पाडू’, अशी त्यांची उमेदवारीच्या प्रश्नावर प्रतिक्रिया असते.

2024 नंतर नारायण राणे राज्यपाल?

पण मग राणेंचं काय? नारायण राणेंची कोकणावर असलेली पकड, कार्यकर्त्यांचा पाठिंबा, यावरुन नारायण राणेंना उमेदवारी देणार? अशीही मध्यंतरी चर्चा होती. मात्र नारायण राणे हे त्यांचे पुत्र माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांच्यासाठी या  जागेचा आग्रह धरून होते. कारण 2009 ते 2014 या कालावधीत नीलेश राणे याच मतदारसंघाचे खासदार होते.
मात्र ते आता कुडाळ विधानसभेसाठी तयारी करत आहेत. तर नारायण राणे यांना राज्यपाल पद दिले जाण्याची शक्यता आहे. (Narayan Rane will be the Governor)

हेही वाचा : Shivsena MLA Disqualification निर्णय देण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार राजीनामा?

प्रमोद जठारांना उमेदवारीची शक्यता सर्वाधिक 

भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी आमदार प्रमोद जठार (Pramod Jathar) यांच्या एप्रिल 2023 ला झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी माजी खासदार नीलेश राणे यांनी ”तुम्हाला रत्नागिरी-सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना”, असे वक्तव्य जठार यांना उद्देशून केलं होतं. त्यामुळे जठार हेच भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार असल्याचे संकेत स्वतः नीलेश राणेंनी वर्षभरापूर्वीच दिले आहेत.
नारायण राणेंनीही कुडाळ दौऱ्यावर असताना कोणाचेही नाव न घेता, ‘उमेदवार भाजपचाच असेल’, असे म्हणत एक प्रकारे प्रमोद जठार यांनाच पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे.
येत्या काळात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेचा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंचे समर्थक किती? ठाकरेंचे समर्थक कोण? कुणाचं वर्चस्व जास्त आहे? हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. शिंदे-अजित पवारांच्या साथीनंतर या मैदानात भाजपने जोरकसपणे उतरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे कोकणातील ही लढत रंगतदार होणार, हे निश्चित. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आता बदलेल्या राजकीय समीकरणानंतर कोण जिंकणार हे पाहणं औत्सूक्याचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -