घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : राज्यातील 15 पैकी 13 जागांवर शिंदे - ठाकरे...

Lok Sabha 2024 : राज्यातील 15 पैकी 13 जागांवर शिंदे – ठाकरे अशी थेट लढत; जनतेचा कौल कोणाला?

Subscribe

जागावाटपानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार राज्यातील १५ पैकी १३ जागांवर आता ठाकरे गट आणि शिंदे गट अशी थेट लढत होणार आहे. आता जनतेचा कौल कोणाला असेल, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप निश्चित झाले असून त्यांचा फॉर्म्युला देखील समोर आला आहे. त्यानुसार भाजपा – 28, शिवसेना – 15, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला – 4 तर महादेव जानकर यांच्या रासपला एक जागा मिळाली आहे. या जागावाटपात गेल्या निवडणुकीत मिळालेल्या जागा कायम राखण्यात मुख्यमंत्री शिंदे यांना यश आले आहे. मात्र, आता या जागावाटपानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार राज्यातील 15 पैकी 13 जागांवर आता ठाकरे गट आणि शिंदे गट अशी थेट लढत होणार आहे. आता जनतेचा कौल कोणाला असेल, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. (Lok Sabha Election 2024 : in 13 out of 15 seats in the state, Shinde group – Thackeray group direct fight; What do the public think?)

आता रिंगणात कोण?

मविआ आणि महायुतीचे जागावाटप निश्चित झाले आहे. त्यानुसार राज्यात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या 15 जागा मिळाल्या आहेत तर ठाकरे गटाला 21 जागा मिळाल्या आहेत. आणि या लढतींचा विचार केला तर शिंदे आणि ठाकरे यांच्यात 13 ठिकाणी थेट लढती होणार आहेत. यात मुंबईतील लढती प्रमुख मानल्या जात आहेत. मुंबईतील दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या तीन महत्त्वाच्या जागांवर शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे आणि कल्याणात देखील शिंदे विरुद्ध ठाकरे अशाच लढती होणार आहेत. दक्षिण मुंबईत विद्यमान खासदार आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अरविंद सावंत यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे, तर तिथे त्यांना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचे आव्हान असेल. दक्षिण मध्य मुंबईत उद्धव गटाने राज्यसभेचे माजी खासदार अनिल देसाई यांना तिकीट दिले आहे. तिथे त्यांना विद्यमान खासदार आणि शिंदे गटाचे नेता राहुल शेवाळे यांनी आव्हान दिले आहे. उत्तर पश्चिम मुंबईत ईडी चौकशीचा ससेमिरा मागे लागलेल्या अमोल कीर्तिकर यांना उद्धव गटाकडून तिकीट देण्यात आले आहे, तर तिथे उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणाऱ्या मात्र, ईडी चौकशीनंतर शिंदे गटात गेलेल्या रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे यांनी संधी दिली आहे. याशिवाय, मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात उद्धव गटाने विद्यमान खासदार राजन विचारे यांनाच पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर तिथे नरेश म्हस्के हा तुलनेने नवखा उमेदवार शिंदे गटाने दिला आहे. तर कल्याणमध्ये विद्यमान खासदार आणि शिंदे गटाचे नेता श्रीकांत शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या तुलनेने नवीन असलेल्या वैशाली दरेकर – राणे यांचे आव्हान असेल.

- Advertisement -

नाशिकमध्येही शिंदे विरुद्ध ठाकरे

अगदी शेवटपर्यंत उत्सुकता ताणून ठेवलेल्या नाशिक मतदारसंघाचा उमेदवार अखेर महाराष्ट्रदिनाचा मुहूर्त साधत जाहीर करण्यात आला. तिथे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच शिंदे गटाकडून संधी देण्यात आलेली आहे. मूळच्या शिवसेनेचे असलेल्या गोडसे यांनी पक्षफुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. त्यामुळे त्यांचा या जागेवर प्रबळ दावा होता. मात्र ऐनवेळी या मतदारसंघात एंट्री करत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांनी आपल्याला निवडणूक लढवण्यास सांगण्यात आल्याचे घोषित केले आणि त्यातून हा मतदारसंघ कोणाचा हा नवा वाद जवळपास महिनाभर सुरू राहिला. त्यातच सोमवारी शांतिगिरी महाराज यांनी अचानक मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचा दावा करीत शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला नाही. यासोबतच शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि शिवसेनेचेच बंडखोर नेते विजय करंजकर यांच्या देखील नावांची चर्चा होती. आता हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाली असून त्यांना शिवसेना उद्धव गटाच्या राजाभाऊ वाजे यांचे आव्हान असेल. (Lok Sabha Election 2024 : in 13 out of 15 seats in the state, Shinde group – Thackeray group direct fight; What do the public think?)

राज्यातील उर्वरित लढती कशा असणार?

याव्यतिरिक्त अन्य सात ठिकाणी शिंदे विरुद्ध ठाकरे असाच सामना रंगणार असल्याचे दिसते आहे. यात मावळ, शिर्डी, औरंगाबाद, यवतमाळ – वाशीम, बुलढाणा, हातकणंगले आणि हिंगोली या मतदारसंघांचा समावेश आहे. शिंदे गटाला राज्यात एकूण 15 जागा मिळाल्या आहेत. 13 जागांवर ठाकरे गटासोबत थेट सामना आहे. तर उर्वरित दोन ठिकाणी काँग्रेससोबत त्यांची लढत होणार आहे. यात एक महत्त्वाची जागा आहे ती कोल्हापूरची. इथे शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना थेट शाहू महाराज यांचे आव्हान आहे. शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर दुसरी जागा आहे, रामटेकचे. जिथे काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या राजू पारवे यांना तिकीट देण्यात आले आहे. कृपाल तुमाने यांना संधी नाकारत शिंदे गटाने या आयात उमेदवाराला उमेदवारी दिली. काँग्रेसच्या शाम बर्वे यांचे त्यांना आव्हान असेल.

- Advertisement -

महायुतीच्या लढती कुठे आणि कशा?

राज्यात भाजपा 28 जागांवर लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यातील पालघरच्या जागेचा निर्णय बाकी आहे, मात्र उर्वरित ठिकाणी भाजपचे उमदेवार निश्चित आहेत. यातील पाचच ठिकाणी भाजपचा सामना उद्धव गटाशी होणार आहे. यात ईशान्य मुंबई, जळगाव, रत्नागिरी – सिंधुदुर्ग, सांगली या जागांचा समावेश आहे. पालघरच्या जागेची निश्चिती झाल्यानंतर इथेही भाजपाची थेट लढत ही उद्धव गटाशी होणार आहे. (Lok Sabha Election 2024 : in 13 out of 15 seats in the state, Shinde group – Thackeray group direct fight; What do the public think?)

महायुतीतील दुसरा घटक पक्ष राष्ट्रवादी – अजित पवार गट हा देखील चार जागा लढवणार आहे. यातील उस्मानाबाद, रायगड, परभणी या तीन ठिकाणी त्यांना शिवसेना उद्धव गटाचे आव्हान असेल. तर बहुचर्चित बारामती मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. इथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावरून निवडणूक लढवतील. त्यांना सुप्रिया सुळे यांचे आव्हान असेल.

भाजपा उदार का झाला?

मुंबई तसेच नाशिकच्या उमदेवारीबाबतचा निर्णय बराच काळ रेंगाळला होता. मात्र, बुधवारच्या एकाच दिवसात अचानक दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण आणि नाशिक या चारही जागा शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आल्या आणि लागोपाठ येथील उमेदवारही जाहीर झाले. वास्तविक, या जागांसाठी शिवसेना आणि भाजप या दोघांमध्ये रस्सीखेच होती. मात्र, अचानक भाजपने आपला दावा सोडत या चारही जागा शिंदेंना सोडल्या. या चारही ठिकाणी शिंदेंचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी आहे, यामुळेच भाजपने या जागा शिंदेंना दिल्या असाव्यात अशी चर्चा आहे. याशिवाय शिवसेनेत फूट पडली म्हणून जनतेच्या मनात अजूनही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे. याचा फायदा उद्धव गटाला निश्चित होऊ शकतो याचा अंदाज आल्याने भाजपाने शिवसेनेला एकदम 15 जागा देऊ केल्या. अन्यथा, जागावाटपाची चर्चा सुरू झाली तेव्हा 13 खासदार सोबत घेऊन आलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला या निवडणुकीत एक आकडीच जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, लोकभावना लक्षात आल्यानंतर राजकीय समीकरणे बदललेली दिसतात. (Lok Sabha Election 2024 : in 13 out of 15 seats in the state, Shinde group – Thackeray group direct fight; What do the public think?)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -