घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : फडणवीस आणि अभिजीत पाटील भेटीनंतर सोलापुरात चित्र पालटणार?

Lok Sabha 2024 : फडणवीस आणि अभिजीत पाटील भेटीनंतर सोलापुरात चित्र पालटणार?

Subscribe

भाजपात प्रवेश करण्यास सांगितलेले नाही, पण तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करू, असे फडणवीस यांनी म्हटल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले.

सोलापूर : थकीत कर्जासंदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. यामुळे अडचणीत सापडलेले या कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आज, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे अभिजीत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाचे समीकरण बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Lok Sabha Elections 2024: Fadnavis and Abhijit Patil meet likely to change political equations in Solapur)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजित पाटील हे या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणूक प्रचारात सोलापूरमध्ये अभिजीत पाटील सक्रिय आहेत. अशातच राज्य सहकारी बँकेने कारखान्याची तीन गोडाऊन सील केली. तसेच कारखान्याच्या शटर ताबा नोटीस चिकटवण्यात आली आहे. जुन्या संचालक मंडळाने 430 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र हे कर्ज थकल्याचे प्रकरण पुण्याच्या डीआरटी न्यायालयात होते. न्यायालयाने गुरुवारी स्थगिती उठवल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी लगचेच शुक्रवारी श्री विठ्ठल कारखान्याची साखरेची तीन गोडाऊन सील केली.

- Advertisement -

यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह (एनसीपी एसपी) महाविकास आघाडीकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली. एनसीपी एसपीचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील ही कारवाई म्हणजे माढा मतदारसंघात लख्खपणे दिसणाऱ्या पराभवाच्या भीतीने सुरू असलेली दडपशाही आहे, असा आरोप त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील यांनी आज, सोमवारी सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अभिजीत पाटील यांनी केवळ साखर कारखान्याबद्दल चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले. हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांची बिले देणे बाकी आहेत आणि अशातच गोडाऊनमधील साखर जप्त झाली आहे, असे सांगितल्यानंतर फडणवीस यांनी सकारत्मक भूमिक घेतली असून ते नक्कीच आम्हाला मदत करतील, अशी अपेक्षा अभिजीत पाटील यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

भाजपात प्रवेश करण्यास सांगितले का, असे विचारले असता, त्यांनी नकार दिला. तथापि, तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करू, असे फडणवीस यांनी म्हटल्याचे पाटील यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत तुम्ही मदत करणार का, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ते आपल्याला मदत करत असतील तर, त्यांना मदत करणे हे आपले काम असल्याचे त्यांनी सांगितल्याने येथील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, साखर कारखान्यांच्या संचालकांशी बोलल्यानंतर अंतिम निर्णय घेऊ, अशी पुस्ती त्यांनी जोडली.


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -