घरमहाराष्ट्रLoksabha 2024: दक्षिण मुंबईतून लोकसभेसाठी यशवंत जाधव ?

Loksabha 2024: दक्षिण मुंबईतून लोकसभेसाठी यशवंत जाधव ?

Subscribe

मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे (शिंदे गट) वजनदार नेते म्हणून ओळख असलेले माजी स्थायी समिती अध्यक्ष, उपनेते यशवंत जाधव आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावण्याची शक्यता आहे.

मुंबई: मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे (शिंदे गट) वजनदार नेते म्हणून ओळख असलेले माजी स्थायी समिती अध्यक्ष, उपनेते यशवंत जाधव आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून राज्यसभेवर मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिल्यानंतर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. देवरा यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद मतदारसंघात वाढली असून, त्याचा फायदाही जाधव यांना होणार असल्याने ते दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत, मात्र दक्षिण मुंबईवर भाजपचा दावा असून, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर आणि कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा फिल्डिंग लावून तयार आहे. यापूर्वी भाजपकडून जयवंतीबेन मेहता या खासदार व केंद्रीय मंत्री होत्या. यशवंत जाधव शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये भायखळ्यामधून ते 1997, 2007 आणि 2017 असे तीन वेळा नगसेवक म्हणून निवडून आले आहेत. (Loksabha 2024 Yashwant Jadhav for Lok Sabha from South Mumbai)

2001 ते 2002 या कालावधीत त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अ, ब आणि ई या तीन विभागांच्या प्रभाग समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यानंतर 2002 मध्ये त्यांची स्थापत्य समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 2007 ते 2009 या कालावधीत त्यांनी बाजार उद्यान समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. प्रशासकीय कामाचा अनुभव आणि दांडगा जनसंपर्क यामुळेच शिवसेनेने 2018 ते 2022 अशी सलग चार वर्षे त्यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेच्या चाव्या म्हणजे स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले होते.

- Advertisement -

या कालावधीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेत, मुंबईकरांना उत्तमोत्तम सोयीसुविधा पुरवण्यावर भर दिला. यशवंत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी व विद्यमान आमदार यामिनी जाधव यांनीही भायखळा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवत कार्यसम्राट आमदार होण्याचा बहुमान मिळवला आहे. भायखळ्यामधून कधीही शिवसेनेचा आमदार विधानसभेत पोहोचला नव्हता मात्र, जाधव यांनी दोनवेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढत, पत्नी यामिनी यांना विधानसभेत पाठविले.

माझगाव या भागातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या यशवंत जाधव यांनी या भागामधील नागरिकांना शिवसेनेचा नगरसेवक म्हणून अधिक चांगल्या सोयीसुविधा पुरवण्याकडे नेहमीच लक्ष दिले. परिसरातील पाणी समस्या, रस्ते, पदपथ, पथदिवे, गटार, उद्यानांचे सुशोभीकरण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम ते राबवतात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मंडळांच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत करणे, आरोग्य शिबिरे घेत आरोग्य सुविधा पुरवणे, रक्तदान मोहीम राबवणे, शाळकरी मुलांना वह्या,

- Advertisement -

पुस्तके, गणवेश वाटप करणे, महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम, दिव्यांगांना मोफत व्हीलचेअर देणे, महिलांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी घरघंटी, शिलाई मशीन देणे, असे अनेक उपक्रम राबवत त्यांनी सर्वसामान्यांचा नगरसेवक म्हणून आपली प्रतिमा जनमानसात तयार केली आहे. यामुळेच त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभाग प्रमुखासह उपनेता पदही दिले आहे.

पक्ष संघटना वाढविण्यासाठी त्यांच्याकडे संपर्क प्रमुख म्हणून धूळे नंदुरबार, कल्याणसह बेलापूर मतदार संघाचीही जबाबदारी देण्यात आलेली आहे. शिवसेना दक्षिण मुंबईसाठी आग्रही असली, तरी भाजपनेही फिल्डींग लावली असून, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर आणि कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे दोघेही लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे समजते. या मतदार संघातून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी दोनवेळा काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा पराभव केलेला आहे.

भाजपाकडून लोढा, नार्वेकर इच्छुक

भाजपने काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांना शिंदे गटाकडून राज्यसभेवर पाठवल्याने दक्षिण मुंबई मतदारसंघावर आता भाजपाचा दावा असेल, असे भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने आपलं महानगरला सांगितले. या मतदारसंघातून यापूर्वी जयवंतीबेन मेहता यांनी संसदेत प्रवेश केला होता. त्यामुळे परंपरागत दक्षिण मुंबईवर भाजपाचा दावा असणार आहे.

(हेही वाचा :Supriya Sule: मेरिट बघून मला पास करा, सुळेचं जनतेला आवाहन; तर ‘अजितदादां’ना दिलं जशास तसं उत्तर )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -