घरमहाराष्ट्रमधुकर पिचड, कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ अखेर भाजपत दाखल!

मधुकर पिचड, कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ अखेर भाजपत दाखल!

Subscribe

अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ आमदारांचा बहुचर्चित भाजप प्रवेश बुधवारी पार पडला.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अखेर आज संपली असून एकूण ७ बड्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी मुलगा वैभव पिचड यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याशिवाय, साताऱ्यातले आमदार शिवेंद्रराजे भोसले, ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर, चित्रा वाध, संदीप नाईक आणि सागर नाईक यांचा समावेश आहे. याशिवाय, हे आमदार ज्या भागातून येतात, तिथले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देखील मोठ्या संख्येनं आज भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ‘विधानसभा निवडणुकांपर्यंत अजून देखील मोठ्या प्रमाणावर प्रवेश होतील’, असं सांगून विरोधकांच्या चिंता अजून वाढवल्या आहेत.

भुजबळ, नाईकांवेळी ईडी नव्हती का?

दरम्यान, या आमदारांच्या प्रवेशावेळी चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर टीका केली. ‘जेव्हा शरद पवार साहेबांनी छगन भुजबळ आणि गणेश नाईक यांना शिवसेनेतून बाहेर काढलं, त्यावेळी त्यांना ईडीची भीती दाखवली होती का?’ असा सवाल पाटील यांनी शरद पवारांना विचारला आहे. ‘ईडीची भीती दाखवायला काय ही सामान्य माणसं आहेत का?’ असं देखील पाटील म्हणाले. ‘या सगळ्यांची कामं वर्षानुवर्ष होत नव्हती. त्या पक्षात राहूनही मतदारसंघाची कामं होत नसतील, तर ते काय करणार? आमच्या जुन्यांची कुणी काळजी करू नये. विधानसभेपर्यंत अजून खूप प्रवेश होतील. या सर्वांना एकच सांगणं आहे की त्यांना त्यांच्या कर्तृत्वानुसार जागा आणि मान-सन्मान मिळेल’, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – हल्ली कोण कोणत्या पक्षात आहे हे देखील कळत नाही!

मधुकर पिचड ऐन वेळी व्यासपीठावर, गणेश नाईकांचा प्रवेश लांबणीवर!

गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित होतं. मात्र, बुधवारी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी अचानक खुद्द मधुकर पिचड हेदेखील व्यासपीठावर हजर होते. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. मात्र, ‘माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते आणि स्वत: मधुकर पिचड हे देखील भाजप प्रवेश करणार आहेत’, असं वैभव पिचड यांनी स्पष्ट केलं. मात्र, त्याचवेळी गणेश नाईक हे देखील भाजप प्रवेश करणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेलं असताना देखील त्यांचा पक्षप्रवेश मात्र लांबला आहे. यावेळी फक्त संदीप नाईक यांनीच भाजप प्रवेश केला.

शिवसेनेला मुनगंटीवारांचा टोला

दरम्यान, यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला. ‘कालिदास कोळंबकरांना मी विश्वास देतो की ही पार्टी तुमच्या पाठिशी उभी राहील. कालिदास कोळंबकर यांना अनेक जण बोलत होते ‘इकडे या हे बंधन बाधा ते बंधन बाधा’, पण मी कालिदास कोळंबकर यांना सांगितलं की तुम्ही या पक्षात फिट आहात’, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -