घरमहाराष्ट्रहल्ली कोण कोणत्या पक्षात आहे हे देखील कळत नाही

हल्ली कोण कोणत्या पक्षात आहे हे देखील कळत नाही

Subscribe

सध्या भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू असून, उद्या अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ली कोण कोणत्या पक्षात आहे हे कळत नसल्याची कोपरखळी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मारली. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील यांच्या ‘विधान गाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. हल्ली कोण कोणत्या पक्षात आहे हेदेखील कळत नाही. आम्हालादेखील माहीत नसते की आमच्या पक्षात कोण येणार ते. आम्हाला पेपरवाल्यांकडूनच दुसर्‍या दिवशी समजते, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. एवढेच नाही तर अलीकडच्या काळात कुणासोबत फोटो काढायलाही भीती वाटते, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या पुस्तक प्रकाशनाला शरद पवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक दिगग्ज उपस्थित होते. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या ‘विधान गाथा’ या पुस्तकाचे कौतुक केले. विधिमंडळ कामकाजाची नीट ओळख होऊ शकते, असे पुस्तक हर्षवर्धन पाटील यांनी लिहिले आहे, असे सांगत विधान मंडळ कामकाजाच्या हॅन्ड बुक म्हणजे ‘विधान गाथा’ हे पुस्तक असल्याचे त्यांनी सांगितले.

जाणत्या राजांनी घेतला धसका
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार आउट गोइंग सुरू असून, याचा धसका खुद्द जाणता राजा म्हणजेच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतला की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खुद्द शरद पवार यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला तब्येत बरी नसताना हजेरी लावल्याचे पहायला मिळाले. आपण या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहू शकणार की नाही? याची शंका होती. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मला या प्रकाशनाला हजर रहावे लागले, असे पवार खुद्द मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत म्हणाले. काल रात्री माझ्या जिभेचे आणि गळ्याचे ऑपरेशन झाले. डॉक्टरांनी सांगितले बोलू नका म्हणून. पण सध्या महाराष्ट्राचे वातावरण बघितले आणि मी या कार्यक्रमाला गेलो नाही तर पत्रकार छापतील की मी गिरीश महाजन यांच्यासोबत अमित शहा यांना भेटायला गेलो, असे सांगत शरद पवार यांनी सुरू असलेल्या आउट गोइंगवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

मुख्यमंत्री त्यांच्या मनात आहे ते करतात आणि खुल्या दिलाने हसतात – सुशीलकुमार शिंदे
‘भाजपमध्ये सुरू असलेल्या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची पुरती झोप उडाली आहे. देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री असून, त्यांच्या जे मनात आहे ते करतात आणि खुल्या दिलाने हसतात’, असे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

अशोक चव्हाणांची कोपरखळी
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीदेखील कोपरखळी मारली. सध्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. त्यामुळे या पुस्तकाच्या दोन ते तीन आवृत्या काढायला हरकत नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच कुठलाही संसदीय कार्य मंत्री हा मुख्यमंत्र्यांचा विश्वासू असतो, अशी प्रथा आहे, पण आता काय प्रथा आहे हे काही माहीत नाही, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी विनोद तावडे यांना लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -