घरमहाराष्ट्रगदारोळात विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर, ही तर लोकशाहीची हत्या - देवेंद्र फडणवीस

गदारोळात विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर, ही तर लोकशाहीची हत्या – देवेंद्र फडणवीस

Subscribe

राज्यातील विद्यापीठाशी संबंधित राज्यपालांच्या अधिकारांना कात्री लावणारे विद्यापीठ सुधारणा विधेयक मंगळवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजपच्या सदस्यांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला. चर्चेविनाच हे विधेयक मंजूर करण्याची सरकारची कृती म्हणजे लोकशाहीची हत्या असून या संदर्भात राज्यपालांना भेटून उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत हे विधेयक मांडले. विद्यापीठ सुधारणा विधेयक संयुक्त समितीकडे सहा महिन्यांसाठी विचारार्थ पाठवावे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.मात्र शेवटच्याच दिवशी विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. त्याला भाजपकडून जोरदार विरोध करण्यात आला. यावेळी झालेल्या गदारोळातच हे विधेयक मंजूर करण्यात आले.

- Advertisement -

विधानसभा इतिहासातील काळा दिवस – फडणवीस

विधानसभेच्या इतिहासातील हा काळा दिवस आज पहावा लागल्याचे टीकास्त्र सोडताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, या विधेयकानुसार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आता प्रकुलपती बनणार आहेत. कुलगुरू हे आता फक्त रबरस्टॅम्प असतील. तसेच कुलगुरू निवडीबाबत देखील दोन नावे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रीच राज्यपालांना पाठवणार आहेत.३० दिवसांत राज्यपालांना यापैकी एक नाव निवडावेच लागणार आहे. तसेच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री यांच्याकडे विद्यापीठाचे शैक्षणिक आणि प्रशासकीय अधिकार राहणार आहेत. मग कुलगुरू यांच्याकडे काय राहणार?, असा सवाल फडणवीस यांनी केला.

बाळराजांच्या हट्टासाठी घाई

या विधेयकावर आम्हाला चर्चा करायची होती.आम्ही सुरूवातही केली होती. विधानसभेत सर्वसाधारणपणे विधेयकावर चर्चा होत असते. सत्तेची पाच वर्षे सोडता मी देखील २२ वर्षांत प्रत्येक विधेयकावर बोललो आहे.मात्र आज पहिल्यांदाच असे घाईघाईत विधेयकाला मंजुरी दिल्याचे पाहिले. बाळराजांचाच हट्ट होता की आजच हे विधेयक मंजूर झाले पाहिजे. यासाठीच हा घाट घातला गेला, असा आरोप करत फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले.

- Advertisement -

या विधेयकाच्या विरोधात जानेवारीच्या पहिल्या आठवडयापासून राज्यातील प्रत्येक विद्यापीठात भाजपतर्फे आंदोलन करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी घोषित केले.


हेही वाचा – ‘आजचा दिवस लोकशाहीतला सर्वात काळा दिवस, ठाकरे सरकार पळपुटं’; फडणवीसांची घणाघाती टीका


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -