Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र महात्म्य शिवमंदिरांचे : भारतीय स्थापत्य शैली हेमाडपंथी बनावटीचे पुरातन "गोंदेश्वर मंदिर"

महात्म्य शिवमंदिरांचे : भारतीय स्थापत्य शैली हेमाडपंथी बनावटीचे पुरातन “गोंदेश्वर मंदिर”

Subscribe

महाराष्ट्रात पुरातनकालीन हजारो शिवमंदिरे आहेत. त्या प्रत्येक शिवमंदिराची वेगळी अशी ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील हेमाडपंथी गोंदेश्वर महादेव या मंदिराबाबत आज आपण जाणून घेऊ.

नाशिकपासून ३५ किलोमीटरवर हे ठिकाण आहे. भारतीय स्थापत्य शैलीला ज्ञात इतिहास सुमारे सात हजार वर्षांपूर्वींचा आहे. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीची मोहेंजोदडो आणि हडप्पा ही देशातली आद्यसंस्कृती समजली जाते. त्या काळातही भारतीय वास्तुकला उच्चकोटीची असल्याचे, पुरातत्त्व खात्याने केलेल्या उत्खननात आढळून आले आहे. नंतरच्या काळात वास्तूशैलीमध्ये अधिकाधिक विकास होत गेला. आठव्या शतकात तात्कालीन मगध साम्राज्याचा विकास झाला. राजगृह या राजधानीच्या नगरात वास्तुकलेचे विविध प्रकार उदयास आले.

- Advertisement -

चौथ्या शतकात याच प्रदेशात मौर्यांचे साम्राज्य उदयास आले. कपिलवस्तू, कुशीनगर, उरुबिल्व अशी मोठी नगरे उदयास आली. वास्तुकलेला राजाश्रय मिळाल्याने अनेक स्तूप, चैत्य, विहार, स्तंभ आणि गुहामंदिरांची निर्मिती झाली. आधी दगड, नंतर भाजलेल्या विटा आणि नंतर बांधकामामध्ये लाकडाचाही वापर होऊ लागला. मगधमधील वास्तुशैलीचा विस्तार थेट महाराष्ट्रातल्या कण्हेरी (मुंबई) जुन्नर (पुणे जिल्हा), अजिंठा आणि वेरूळ (संभाजीनगर) आणि ) झाला होता. राजमहाल आणि धनिकांचे महाल, समाधी, गिरीदुर्ग आणि भुईकोट, कलात्मकतेनं सजलेल्या विहिरी आणि नद्यांवरच्या घाटांमध्ये ही वास्तुशैली दिसत होती. उत्तरेत एक विशिष्ट शैली प्रमाण मानली जाऊ लागली तर, दक्षिणेत वेगळ्या पद्धतीच्या गोपूर या वास्तुशैलीचा विकास झाला होता. चौथ्या शतकापासूनच मंदिरांवरच्या शिखरांना महत्त्व प्राप्त झाले.

तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव सम्राटांपैकी रामचंद्रदेवराय यांच्या कारकिर्दीत हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत हे १२५९ ते १२७४ या काळात मुख्य प्रधान होते. ते उत्तम वास्तुशिल्पकारही होते. दख्खनच्या पठारावर त्यांनी विकसित केलेल्या शैलीत अनेक मंदिरांची उभारणी झाली. अशी मंदिरे हेमाडपंती म्हणून प्रसिद्ध झाली. हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना म्हणजे वेरुळचे घृष्णेश्वर मंदिर आणि औंढा नागनाथ मंदिर. दगडी बांधकाम करताना चुन्यामध्ये विविध प्रकारची घटकद्रव्ये वापरून तयार केलेल्या दर्जाचा वापर केला जात असे.

- Advertisement -

हेमाडपंथी पद्धत सर्वस्वी वेगळी होती. यात चुन्याचा वापर करण्यात येत नव्हता. दगडांना खाचा आणि खुंट्या करून ते एकमेकांत गुंतवले जात. पायापासून शिखरापर्यंतचे दगड एकमेकांत गुंफले आणि एकसंध रचना उभी केलेली आहे. या पद्धतीमुळे संपूर्ण बांधकाम भक्कम आणि टिकाऊ झालेले आहे. आजही अशी मंदिरे पाहता आणि अभ्यासता येतात. नाशिक जिल्ह्यात सिन्नरमधील गोंदेश्वराचे मंदिर भूमिज पद्धतीचे आहे. यादव राजपुत्र राजगोविंद यांनी हे मंदिर बांधल्याचा इतिहासात उल्लेख आहे. हे मंदिर १२५ फूट लांब आणि ९५ फूट रुंद आहे. प्रकारात एकूण पाच मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन असे म्हटले जाते. गोंदेश्वराचे मुख्य मंदिर मध्यभागी आहे. आवारातीत चारही उपदिशांना पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णूची मंदिरे आहेत.

मुख्य मंदिराचे सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह, असे तीन भाग आहेत. गर्भगृहात शंकराची पिंड आहे. गाभार्‍यावर मंदिराचे नगारा पद्धतीचे शिखर आहे. त्यावर उत्कृष्ट कोरीवकाम करण्यात आले आहे. सभामंडपातील स्तंभ विविध प्रकारच्या नक्षीने सजवण्यात आले आहेत. स्तंभांवर आणि सभामंडपाच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व आणि अप्सरा तसेच रामायण आणि पौराणिक प्रसंग कोरण्यात आले आहेत. मंदिरातील शिल्पकृती त्रिमिती पद्धतीची आहे. परावर्तित प्रकाश आणि सावल्यांमुळे, ती अधिकच उठावदार दिसतात. मुख्य मंदिरासमोर नंदी आहे. मंदिराच्या बांधकामासाठी त्या काळात दोन लाख रुपये खर्च आला होता.

- Advertisment -